You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्रान खान म्हणतात, 'काश्मीरच्या लोकांना अधिकार असेल पाकिस्तानात राहायचं की स्वतंत्र'
"संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या वचनानुसार, जेव्हा काश्मीरच्या लोकांना त्यांचा अधिकार मिळेल, तेव्हा पाकिस्तानचा भाग बनून राहायचं की स्वतंत्र राहायचं, याबाबतचं स्वातंत्र्य पाकिस्तान सरकार काश्मिरी लोकांना देईल," असा विश्वास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरच्या लोकांना दिला आहे.
पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील कोटली शहरात एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांनी म्हटलं, "जगानं काश्मीरच्या लोकांना 1948मध्ये एक वचन दिलं होतं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मीरमधल्या लोकांना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्यासंबंधी अधिकार मिळणार होता."
"काश्मीरच्या लोकांना जे वचन देण्यात आलं होतं, ते पूर्ण करण्यात आलं नाही, याची जगाला आठवण करून द्यावी लागणार आहे. याच सुरक्षा परिषदेनं ईस्ट तिमोर जे मुस्लीम देश इंडोनेशियाचा एक भाग होता, जिथं ख्रिश्चन जास्त होते, तोच अधिकार ईस्ट तिमोरला दिला होता. जनमत चाचणी घेऊन त्यांना लगेच स्वातंत्र्य देण्यात आलं. मी संयुक्त राष्ट्राला आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांनी पाकिस्तानला दिलेलं वचन पूर्ण केलेलं नाही."
"काश्मिरी लोकांना पाकिस्तानात सहभागी व्हायचं की स्वतंत्र राहायचं, हे ठरवण्याचा अधिकार असेल," असं इम्रान यांनी म्हटलं.
"जेव्हा तुम्हाला हा अधिकार मिळेल आणि जेव्हा काश्मीरचे लोक पाकिस्तानच्या बाजूनं निर्णय घेतील तेव्हा पाकिस्तान तुम्हाला पाकिस्तानचा भाग बनायचंय की स्वतंत्र राहायचं, हे ठरवण्याचा अधिकार देईल. तो तुमचा अधिकार असेल."
ते पुढे म्हणाले, "तुमच्यासोबत फक्त पाकिस्तानच नाही, तर पूर्ण मुस्लीम जग आहे. जर मुस्लीम राजवटी आज काही कारणास्तव तुम्हाला पाठिंबा देत नसतील, तर मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, सगळ्या मुस्लीम जगतातील जनता स्वतंत्र काश्मीरच्या लोकांसोबत आहे."
त्यांनी म्हटलं, "जे लोक मुस्लीम नाही, पण ज्यांना न्याय पसंत आहे, अशी माणसंही म्हणतात की संयुक्त राष्ट्रानं वचन दिल्याप्रमाणे काश्मीरच्या लोकांना अधिकार द्यायला पाहिजे. तुमच्यावर जे अन्याय झालेत आणि होत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला किती त्रास होत असेल, याची कल्पना आम्हा सगळ्यांना आहे. मी सगळ्या व्यासपीठांवर तुमचा आवाज बुलंद करेल आणि करतही आहे. जोपर्यंत कश्मीर स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत मी तुमचा आवाज बुलंद करेल."
भारताचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं, "आमची सत्ता आली तेव्हा आम्ही त्यांना मैत्रीचा संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. काश्मीरचा प्रश्न अत्याचारानं सोडवला जाऊ शकत नाही, असं आम्ही त्यांना समजावलं. जगातील कोणतीही शक्तिशाली सैन्य एका समुहाविरुद्ध जिंकू शकत नाही. जोपर्यंत पूर्ण समाज एकत्र आहे, तोपर्यंत मोठ्यातलं मोठं सैन्य अयशस्वी ठरेल."
इतिहासाचा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटलं, "जगाचा इतिहास आपल्याला सांगतो की अमेरिका सुपर पॉवर आहे, पण व्हिएतनामध्ये मात्र ते जिंकू शकले नाही. व्हिएतनामनं 30 लाख जणांचा जीव गेला आणि शेवटी स्वतंत्र झाले. अफगाणिस्तानचा इतिहासही हेच सांगतो. अल्जेरियात फ्रान्सनं किती अत्याचार केले. पण, एका समुहाविरोधात फ्रान्स जिंकू शकला नाही. भारतानं 9 लाख सैन्य आणलं, त्याहून जास्त आणलं तरी काश्मीरचे लोक तुमची गुलामी कधीच स्वीकारणार नाही."
इम्रान यांनी पुढे म्हटलं, "भारत जर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी गांभीर्य दाखवणार असेल, तर शांततेसाठी आम्ही दोन पावलं पुढे येण्यासाठी तयार आहोत. पण, शांतता आणि स्थिरतेच्या आमच्या इच्छेकडे कुणी आमची कमजोरी म्हणून पाहू नये."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)