पाकिस्तान : दुसरं लग्न थेट घेऊन गेलं जेलमध्ये

पहिल्या बायकोची परवानगी न घेता दुसरं लग्न केलं म्हणून पाकिस्तानमध्ये एका पुरुषाला 6 महिन्यांची शिक्षा झाली आहे.

लाहौर हायकोर्टानं शाहाजाद साकीब याला 1900 डॉलर्सचा दंड सुद्धा ठोठावला आहे. इस्लाममध्ये चार बायका करण्याची परवानगी असते असा बचाव साकीबनं कोर्टात केला. पण, कोर्टानं तो अमान्य केला.

साकीबनं लेखी परवानगी न घेता दुसरं लग्न केल्याचं त्याची पहिली पत्नी आयेशाबीबी हिनं कोर्टात सिद्ध केलं. पाकिस्तानच्या कौंटुबिक कायद्यानुसार विना लेखी परवानगी दुसरं लग्न करण्यास मनाई आहे.

ऐतिहासिक निर्णय

या निर्णयामुळे पाकिस्तानातल्या बहुपत्नीत्वाच्या पद्धतीला अळा बसेल असं स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं.

यामुळे महिला सबलीकरणाला चालना मिळेल. तसंच या निर्णयामुळे इतरही महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी कोर्टात दाद मागतील असंही स्त्रीवादी कार्यकर्त्यांना वाटतं.

पीस अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या रोमाना बशीर यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं, "एखाद्या स्त्रीनं तिच्यावर झालेल्या अन्यायची दाद मागायला कोर्टाची पायरी चढणं हे कौतुकास्पद आहे. या निर्णयाचा महिला सबलीकरणासाठीही फायदा होईल."

पाकिस्तानात जे पुरुष दुसरं लग्न करतात त्यांना आपल्या पहिल्या बायकोची लेखी परवानगी घेणं गरजेचं असतं. काही पुरूष बऱ्याचदा पहिल्या लग्नानंतर खूप काळानं दुसरं लग्न करतात.

इस्लामिक बाबींवर सरकारला सल्ला देणाऱ्या पाकिस्तानच्या इस्लामिक आयडीओलॉजी काउंसिलनं सरकारच्या कौटुंबिक कायद्यावर बऱ्याचदा टीका केली आहे.

अर्थात या काउंसिलच्या सूचना सरकारला बंधनकारक नसतात. दरम्यान साकिबला हाय कोर्टाच्या या निर्णयाविरूद्ध अपील करण्याचा अधिकार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)