अमेरिका : जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी हिंसेची भीती, सुरक्षेत मोठी वाढ

अमेरिकेच्या सर्व 50 राज्यं आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (DC) मध्ये 20 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या 'इनॉग्रेशन'आधी सुरक्षा वाढवण्यात आलीय. याच कार्यक्रमात अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हिंसक निदर्शनांची शक्यता पाहता सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेतील कॅपिटल इमारतीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा तशी स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून अमेरिकेतील नॅशनल गार्डच्या तुकड्या वॉशिंग्टनमध्ये पाठवण्यात आल्यात.

सर्व 50 राज्यांच्या राजधान्यांमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांकडून सशस्त्र मोर्चे निघण्याच्या शक्यतेचा इशारा FBI ने दिलाय.

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामधील नॅशनल मॉलला बंद करण्यात आलंय. कडेकोट सुरक्षेमुळे राजधानीत बॅरिकेडिंग करण्यात आलीय.

अधिकाऱ्यांनी लोकांना आवाहन केलंय की, लोकांनी आपापल्या घरातून हा कार्यक्रम पाहावा.

ट्रंप समर्थकांनी 17 जानेवारी 2021 ला सशस्त्र आंदोलनाची धमकी दिली आहे आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये मोर्चा काढण्याचाही इशारा दिलाय.

मात्र, सुरक्षेचा बंदोबस्त पाहता ट्रंप समर्थकांच्या काही गटांनी या मोर्चापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय.

मेरीलँड, न्यू मेक्सिको आणि यूटाच्या राज्यपालांनी संभाव्य निदर्शनाआधी आणीबाणीच्या स्थितीची घोषणा केलीय. तर कॅलिफोर्निया, पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन, वर्जीनिया, वॉशिंग्टन आणि विस्कॉन्सिन यांनी नॅशनल गार्ड्स तैनात केलेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)