जपानमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर

फोटो स्रोत, Getty Images
प्रगत तंत्रज्ञानासाठी जगात प्रसिद्ध असणारा जपान वृद्धांचा देश म्हणूनही ओळखला जातो. तिथला प्रजनन दर जगात सर्वांत कमी आहे. तरुणांपेक्षा वृद्धांचं अधिक प्रमाण जपानसाठी मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून जन्मदर वाढवून भविष्यात तरुणांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न जपानकडून सुरू आहे. या प्रयत्नात आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला आहे.
जोडीदार शोधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मॅचमेकिंग स्कीम फंड करण्याचा जपान सरकारचा विचार आहे. जपान पुढच्या वर्षीपासून जोडीदार शोधून देण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करणाऱ्या किंवा तसा वापर सुरू करणाऱ्या स्थानिक सरकारांना सवलत देणार आहे.
गेल्या वर्षी जपानमध्ये जन्मलेल्या बाळांच्या संख्येत विक्रमी घट झाली होती. 8 लाख 65 हजारांहून कमी बाळं जन्माला आली होती. त्यामुळे जन्मदर वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी स्थानिक सरकारांना 1 कोटी 9 लाख डॉलर निधी पुरवण्याचा जपान सरकारचा विचार आहे.
जपानमध्ये मॅचमेकिंग एजेंसीचं प्रमाण मोठं आहे. यापैकी काहींनी जोडीदार शोधण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर सुरू केला आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे अधिक उत्तम प्रकारे जोडीदार शोधता येईल, असा विश्वास या कंपन्या व्यक्त करतात. एखाद्या व्यक्तीने स्वतःची इत्यंभूत माहिती दिल्यानंतर कृत्रिम प्रज्ञा त्याच्यासाठी योग्य जोडीदार निवडण्याचं काम करते.
मात्र, सध्या वापरात असलेल्या अनेक सिस्टिम्स केवळ वय आणि उत्पन्न याआधारेच जोडीदार शोधतात. मात्र, फंड मिळाल्यानंतर प्रशासन छंद, आवड, मूल्य या आधारे जोडीदार शोधून देणारे महागडे आणि उच्च प्रतिचे सिस्टिम्स वापरू शकतील, असं स्थानिक प्रसार माध्यमांचं म्हणणं आहे.
एका कॅबिनेट अधिकाऱ्याने एएफपीला सांगितलं, "कृत्रिम प्रज्ञेचा वापर करणारे मॅचमेकिंग प्रोजेक्ट चालवणाऱ्या किंवा असे प्रोजेक्ट सुरू करणाऱ्या स्थानिक सरकारांना सबसिडी देण्याची आमची योजना आहे. अशाप्रकारच्या सहकार्यामुळे देशाचा घटता जन्मदर सुधारता येईल, अशी आम्हाला आशा आहे."

फोटो स्रोत, Getty Images
या शतकाच्या शेवटी जपानच्या लोकसंख्येत मोठी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2017 साली जपानची लोकसंख्या 12 कोटी 80 लाख इतकी होती. या शतकाच्या अखेरपर्यंत लोकसंख्या 5 कोटी 30 लाखांहूनही खाली येईल, असा अंदाज आहे. जपानमधली कार्यशक्तीही (वर्कफोर्स) झपाट्याने कमी होतेय.
मात्र, जन्मदर वाढवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून जोडीदार शोधण्यापेक्षा जास्त प्रभावी उपाय सरकारकडे असल्याचं जपानच्या टेम्पल विद्यापीठात सामाजिक-सांस्कृतिक आणि मनोचिकित्सक डॉ. सचिको होरीगुची यांचं म्हणणं आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या तरुणांना मदत करणे, हा त्यापैकीच एक उपाय.
यासाठी त्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालाचा दाखला देतात. या अहवालानुसार जपानच्या तरुणांमध्ये प्रेमप्रकरणांमध्ये रस कमी होण्याचा संबंध त्यांच्या अल्प उत्पन्नाशी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीशी बोलताना डॉ, होरिगुची म्हणतात, "त्यांना डेटिंगमध्ये रस नसेल तर मॅचमेकिंगचा फारसा उपयोग नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग करायचाच असेल तर घरची कामं, लहान मुलांचा सांभाळ करणारे मात्र स्वस्त रोबो बाजारात आणले पाहिजे."
जपानमध्ये घराबाहेर पडून काम करणाऱ्या मातांना म्हणावा तसा आधार मिळत नाही. तिथे स्त्रीने घरातली सर्व कामं करून नोकरी करावी आणि मुलांचाही सांभाळ करावा, असा एक समज आहे.
त्यामुळे जपानमध्ये स्त्रियांना फुलटाईम नोकरी करणं अवघड जातं. फुलटाईम नोकरीमध्ये महिलांचा टक्का वाढवा, यासाठी प्रयत्न करत असल्याचं जपान सरकारचं म्हणणं आहे. मात्र, दुसरीकडे जपानमधला जेंडर गॅपही वाढतोय.
2018 सालच्या लैंगिक समानतेसंबंधीच्या जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात जपान 153 देशांच्या यादीत 111 व्या क्रमांकावर होता. मात्र, वर्षभरातच जपानची घसरण होऊन तो 121 व्या क्रमांकावर गेला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








