एका गर्भपातातून मिळवलेल्या पेशींनी 1 कोटी लोकांचे प्राण कसे वाचवले?

पेशी, कोरोना, साथीचे आजार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पेशी
    • Author, झरिया गोरवेट
    • Role, बीबीसी फ्युचर

1960 च्या दशकात मानवी गर्भातील पेशी वापरून अगणित रोगप्रतिकारक लशींची निर्मिती करण्यात आली. पण त्यांच्या वापराच्या संदर्भात नैतिक द्विधावस्थाही निर्माण झाली आहे.

1612 साली पॅरिसमध्ये एक आकर्षक अफवा पसरली- एका माणसाने अमरत्व प्राप्त केल्याची ही अफवा होती.

या माणसाचं नाव होतं निकोलस फ्लेमेल. जवळपास 300 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये जन्मलेल्या फ्लेमेलने किमयेविषयी पुस्तक लिहिल्याचं सांगितलं जात होतं, आणि हे पुस्तक 1612 साली प्रकाशित झालं.

आपण परिस दगड तयार करण्यात यश मिळवल्याचा दावा त्याने पुस्तकात केला होता. धातूला सोन्यात रूपांतरित करणारा आणि जीवनामृत निर्माण करणाऱ्या या दगडाचं मिथक प्रसिद्ध आहे.

फ्लेमेलच्या अमरत्वाची दंतकथा पसरायला लागल्यावर कोणी ना कोणी त्याला कुठेतरी पाहिल्याचंही सांगायला सुरुवात केली. आतापर्यंतच्या सर्वांत बुद्धिमान माणसांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आयझॅक न्यूटनचाही या कहाण्यांवर विश्वास बसला. त्याने हे पुस्तक अतिशय गांभीर्याने वाचलं आणि आपल्या व्यावसायिक कारकीर्दीचा बराच काळ या पुस्तकाच्या आशयाचा अभ्यास करण्यात घालवला.

पण हे काहीच खरं ठरलं नाही. वास्तवातला फ्लेमेल किमयागार नव्हता- त्याने लेखनिक म्हणून काम केलं होतं आणि १४१८ साली वयाच्या 88व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. ते पुस्तक दुसऱ्याच कोणीतरी लिहिलं होतं.

अमरत्वाच्या या शोधप्रक्रियेला 1961 साली आणखी एक फटका बसला. या वेळी फिलाडेल्फियातील एका आधुनिक प्रयोगशाळेने अमरत्वाचा भ्रम फोडला.

आपल्या शरीरामधील सुमारे 32.2 खर्व पेशी स्वतःचे विभाजन करत राहतात, आणि त्यांना संधी मिळाली तर ही विभाजनप्रक्रिया कायमस्वरूपी सुरू राहील, असं वैज्ञानिकांना कित्येक दशकं वाटत होतं.

मग तरुण अमेरिकी वैज्ञानिक लिओनार्ड हेफ्लिक यांनी जगाला धक्का देणारा एक शोध लावला. सर्वसामान्य मानवी पेशी केवळ 40 ते 60 वेळा विभाजित होतात आणि मग त्यांचा हिंसक, पूर्वनिर्धारित मृत्यू होतो. या काटेकोर कमाल संख्येला 'हेफ्लिक मर्यादा' असं संबोधतात आणि त्याचे दोन महत्त्वाचे परिणाम होतात.

एक, आपल्या सध्याच्या आयुर्मानाला केवळ आपली जीवनशैली- आपला आहार, इत्यादींचीच मर्यादा असेल असं नाही. उलट, आपण किती वृद्ध होऊ यासंबंधीची काही अंगभूत मर्यादा निश्चित झालेली असणं शक्य आहे. मानवी शरीरातील पेशींची संख्या आणि पेशींना हेफ्लिक मर्यादा गाठण्यासाठी लागणारा सरासरी वेळ यांचा गुणाकार केला तर 120 वर्षं इतकी आयुर्मर्यादा येते. आत्तापर्यंतचा सर्वांत वयस्कर माणूस ठरलेल्या जिअनी कॅल्मेन्ट 122 वर्षं 164 दिवस इतक्या जगल्या, म्हणजे हेफ्लिक मर्यादेशी बरीचशी सुसंगत अशी आयुमर्यादा त्यांना लाभली.

दोन, वैज्ञानिकांना प्रयोगशाळेत वाढवता येतील अशा पेशी शोधणं अवघड आहे- अनेक औषधं व लशी तयार करण्यासाठीचं हे एक अत्यावश्यक पाऊल असतं. पेशी स्वतः मर्त्य असतात, त्यामुळे त्यांना 'पेट्री डिश'मध्ये त्यांना वाढवलं, तर आज ना उद्या त्यांचं विभाजन थांबून त्या मरण पावतात.

या अडथळ्यावर मात करण्यासाठी सहायक ठरलेल्या पेशींची, आणि स्वीडनमधल्या एका दवाखान्यातील त्यांच्या वादग्रस्त उगमाची ही कहाणी आहे. या पेशी इतक्या विशेष का आहेत? आणि त्यांची उत्पत्ती बघता त्यांच्या वापराचं समर्थन आपण कसं करू शकतो?

लपलेला पेच

हेफ्लिकचा शोध प्रकाशात येण्यापूर्वी वैज्ञानिकांनी विभाजनाची मर्यादा टाळण्यासाठी नवीन प्राण्यांच्या ताज्या पेशी किंवा कर्करोगी पेशी (सुदृढ तंतूच्या नियमाने कॅन्सर चालत नाही, त्यामुळे त्याच्या पेशी अमर्यादपणे वाढत असतात, त्यामुळे त्या पेशी इथे वापरल्या जात) वापरल्या होत्या. पण वैज्ञानिकांना दुसऱ्या मार्गाची आत्यंतिक निकड होती.

अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या पोलिओच्या लशीवर 1960 च्या दशकात एक मोठी आपत्ती आली.

पेशी, कोरोना, साथीचे आजार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या पेशींनी काही कोटींची जीव वाचवला आहे.

काही लशींची निर्मिती पेशींमध्ये रोगट कण वाढवून केली जाते. त्यातून आजार उद्भवू नये यासाठी ते कण नंतर मारून टाकले जातात किंवा दुबळे केले जातात. हे निष्क्रिय कण सक्रिय घटक बनतात- रोगप्रतिकारक यंत्रणेला काय शोधायचे हे याद्वारे शिकवलं जातं.

अनेक दशकं पोलिओची लस माकडाच्या मूत्रपिंडातील पेशींपासून केली जात होती, त्यातील काही पेशी 'सिमियन व्हायरस 40' या विषाणूने संसर्गित झालेल्या होत्या, असं नंतर लक्षात आलं. आजच्या लशींबाबत सखोल चाळणी केलेली असते, आणि त्यांची वाढ ज्या पेशींवर केली जाते त्यातला कोणताही घटक लशीमध्ये आलेला नसतो, पण 1955 ते 1963 या वर्षांदरम्यान उपरोक्त संसर्ग एकट्या अमेरिकेतील सुमारे तीन कोटी लोकांमध्ये पसरला होता.

प्रयोगशाळेतील पेशींच्या साठ्याऐवजी माकडांमधील ताज्या पेशी वापरल्यामुळे हा संसर्ग झाल्याचं मानलं गेलं आणि यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऱ्हीसस माकड या प्रजातीमध्ये 'एसव्ही 40' संसर्ग सर्रास आढळत होता.

हा विषाणू लशीमध्ये आल्याचे काही वैद्यकीय परिणाम झाले का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कधीच लसीकरण न झालेल्या लोकांमध्येही या विषाणूचा आता प्रसार होतोय का, याचंही उत्तर मिळालेलं नाही. हा विषाणू कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो, असं प्रयोगशाळेत आढळलं आहे. मेंदूच्या कर्कगोरापासून लिम्फोमापर्यंत विविध प्रकारच्या कर्करोगांशी या विषाणूचा संबंध असण्याची शक्यता पडताळण्यात आली, पण अजून तरी सकारात्मक अथवा नकारात्मक असा कोणताही निर्णायक पुरावा मिळालेला नाही.

तरीही पेशींचा पर्यायी पुरवठा शोधणं अचानक आवश्यक झालं आहे.

एक निनावी स्त्री

त्यानंतर, 1962 साली हेफ्लिक यांनी आणखी एक शोध लावला. "तो शोध लागला नसता तर, तुम्ही आणि मी कदाचित आता जिवंतही नसतो," असं शिकागोस्थित इलिनॉय विद्यापीठातील जैवलोकसंख्याशास्त्राचे व वार्धक्यशास्त्राचे तज्ज्ञ स्टुअर्ट जे ओल्शान्स्की म्हणाले.

पेशी, कोरोना, साथीचे आजार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोलिओने एकेकाळी अनेकांना क्षतिग्रस्त केलं होतं.

स्वीडनमधील एका निनावी स्त्रीने तीन महिन्यांची गरोदर असताना कायदेशीररित्या गर्भपात करवून घेतला. मेरेडिथ वॉडमन यांनी 'द व्हॅसिन रेस: सायन्स, पॉलिटिक्स अँड द ह्यूमन कॉस्ट्स ऑफ डिफिटिंग डिसिज' या पुस्तकात लिहिल्यानुसार, त्या गर्भाचं दहन करण्यात आलं नाही, ते दफनही केलं गेलं नाही किंवा फेकूनही देण्यात आलं नाही- तर एका निर्जुंतुक हिरव्या कापडात गुंडाळून तो गर्भ वायव्य स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटकडे पाठवण्यात आला.

त्या वेळी हेफ्लिक त्यांना संशोधनासाठी लागणाऱ्या पेशी या संस्थेकडून घेत होते. फिलाडेल्फियातील विस्टार इन्स्टिट्यूटमधल्या त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी काही तंतू विविध काचेच्या बाटल्यांमध्ये 37 अंश सेल्सियस इतक्या तापमानाखाली उबवून ठेवले होते.

पेशींना एकत्र पकडून ठेवणारं प्रथिन सुटं करण्यासाठी त्यांनी एक एन्झाइम वापरलं, त्याचप्रमाणे या विभाजनासाठी गरजेचे घटक असलेलं "वृद्धी माध्यम" द्रवही त्यात घातलं. काही दिवसांनी त्यांच्याकडे पेशींचा एकसलग ताव त्यांच्याकडे तयार झाला.

यांपैकी एक पेशी अखेरीस "डब्ल्यूआय-38" पेशीसमूहामध्ये रूपांतरित झाल्या, त्याला 'विस्टार इन्स्टिट्यूट गर्भ 38' यवरून "डब्ल्यूआय-38" हे संबोधन प्राप्त झालं.

त्यानंतरच्या वर्षांमध्ये या पेशींच्या गोठवलेल्या कुप्या जगभरातील शेकडो प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आल्या. त्यामुळे सध्या डब्ल्यूआय-38 हा जगभरातील सर्वांत जुन्या व सर्वाधिक विस्तृत उपलब्धता असलेल्या पेशीसमूहांपैकी एक आहे.

हेफ्लिक यांनी 1984 साली- काहीसं असंवेदनशीलतेने- नमूद केल्याप्रमाणे, डब्ल्यूआय-38 "ही मतदानयोग्य वयापर्यंत पोचलेली आतापर्यंतची पहिली सर्वसामान्य मानवी पेशी लोकसंख्या आहे." आता पोलिओ, गोवर, गालगुंड, रुबेला, कांजिण्या, नागीण, अडेनोव्हायरस, रेबीज व हेपटायटिस ए यांसारख्या आजारांविरोधात लस बनवण्यासाठी या पेशी नियमितपणे वापरल्या जातात.

या पेशी इतक्या विशेष का आहेत? आणि त्यांच्या वापराचं समर्थन कसं करता येईल?

पेशींचा अमर्याद पुरवठा

या पेशी मर्त्य असल्याचा शोध हेफ्लिक यांनी लावल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, प्रत्येक वेळी पेशींचं विभाजन झाल्यावर त्यातील थोड्या पेशी बाजूला करून गोठवल्या, तर एकाच स्त्रोताकडून तत्त्वतः जवळपास अमर्याद पुरवठा शक्य होतो- एकूण सुमारे 1०,००,००,००,००,००,००,००,००,००,००० (एक खर्व खर्व) इतक्या संख्येने हा पुरवठा असतो.

पेशी, कोरोना, साथीचे आजार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पेशींच्या वापरासंदर्भात वाद आहे.

डब्ल्यूआय-38 या मर्त्य असल्या, तरी त्या संकलित केल्या जात असताना त्यांचं विभाजन तुलनेने कमी वेळा झालेलं असल्यामुळे, त्या हेफ्लिक मर्यादेपर्यंत पोहोचेपर्यंत जास्त काळासाठी वाढवता येऊ शकतात.

बहुतांश डब्ल्यू-38 पेशींमध्ये 50 विभाजनं व्हायची उरलेली असतात, त्यातील प्रत्येक विभाजन पूर्ण व्हायला 24 तास लागतात, त्यामुळे पुन्हा सुरुवात करायची गरज पडेपर्यंत सलग 50 दिवस त्यांची वाढ होऊ शकते.

या पेशींचा शोध लागला त्या वेळी अमेरिकी कायद्यातील एका छोट्या पळवाटेमुळे डब्ल्यूआय-38 पेशी सर्वत्र पसरायला वाव मिळाला. जैव गोष्टींचं पेटन्ट घेणं त्या वेळच्या अमेरिकी कायद्यानुसार शक्य नव्हतं. त्यामुळे या पेशींच्या वापराला कधीच मर्यादा येणार नव्हती, आणि जगभरातील वैज्ञानिकांना मुक्तपणे आपल्या सहकाऱ्यांशी या पेशींचं वाटप करणं शक्य होणार होतं.

अमेरिकेमध्ये शेकडो पेशी समूह उपलब्ध असले, तरी बहुतांश वापर डब्ल्यूआय-38 पेशींचाच होतो. आणखी केवळ एका पेशीसमूहाचा इतपत वापर होतो.

"एमआरसी-5" पेशी आणखी एका तीन महिन्यांच्या गर्भाच्या फुफ्फुसातून मिळवण्यात आल्या. मेडिकल रिसर्च कौन्सिल या संस्थेमध्ये या पेशींचं संकलन झाल्यामुळे संस्थेच्या नावातील अद्याक्षरांवरून पेशीला नाव मिळालं. या वेळी, 1966 साली इंग्लंडमध्ये "मानसिक कारणां"मुळे झालेला एक गर्भपात पेशीसंकलनासाठी उपयुक्त ठरला.

पोलिओ, गोवर, गालगुंड, रुबेला, कांजिण्या, नागीण, रेबीज व हेपटायटिस ए यांसारख्या लशींच्या विकासासोबतच अनेक आरंभिक लशींच्या उत्पादनासाठी डब्ल्यूआय-38 हा पेशीसमूह मूलभूत महत्त्वाचा आहे.

मर्क यांच्या 'मिझल्स, मम्पस व रुबेला (एमएमआर)'चा भाग असलेल्या रुबेला लशीसाठी आणि तेवा यांनी अमेरिकी सैन्यासाठी तयार केलेल्या एडेनोव्हायरस लशीसाठी या पेशींचा वापर आजही होतो.

अखेरीस गर्भ हे पेशींचे शक्य तितके "सर्वांत स्वच्छ" स्त्रोत मानले जातात, कारण बाह्य जगातील एखादा विषाणू त्यांच्या संपर्कात आला असण्याची सर्वांत कमी शक्यता असते, त्यामुळे त्यातून लशीला संसर्ग होण्याची किंवा प्रयोगांच्या निष्कर्षांमध्ये गोंधळ होण्याची शक्यताही कमी होते.

2017 सालपर्यंत या पेशींनी किती जीव वाचवले, याची अचूक मोजणी करायची सूचना हेफ्लिक यांनी ओल्शन्स्की यांना केली. या पेशीसमूहाचा शोध लागला त्या 1960च्या दशकातील काही संसर्गजन्य आजारांचा जागतिक प्रसार किती होता, त्याची 2017 सालच्या संसर्गजन्य आजारांच्या प्रसाराशी तुलना करून ओल्शन्स्की यांनी असा अंदाज बांधला की, डब्ल्यूआय-38 पेशींपासून बनवलेल्या लशींनी आतापर्यंत सुमारे 4.5अब्ज संसर्गांचा प्रतिबंध केला असावा. एकंदरित या पेशींमुळे 1 कोटी 3 लाख जीव वाचले असावेत.

"या आजारांनी ग्रासलेला प्रत्येक जण काही मरत नाही. त्यातून आपण वाचलो तरी आपण अपंग होण्याची शक्यता असते," असं ओल्शन्स्की सांगतात. "माझ्या पत्नीचा व माझा एक अतिशय जवळचा मित्र आहे, त्याला लहानपणी पोलिओ झाला होता, त्याचे परिणाम तो आजही भोगतो आहे."

1979 सालापासून अमेरिकेत पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही, पण बऱ्यापैकी संख्येने लोकांना अजूनही त्या रोगाच्या उपचारोत्तर परिणामांसह जगावं लागतं आहे.

लाखो लोकांमध्ये "पोलिओत्तर लक्षणं" दिसून येतात, त्यांचे स्नायू संथगतीने दुबळे पडतात आणि आकुंचन पावतात. पॉल अलेक्झांडर नावाची एक 74 वर्षीय व्यक्ती अजूनही 'आयर्न लंग'शी जखडलेली आहे. 1952 साली वयाच्या सहाव्या वर्षी या विषाणूने त्यांना अपंग केलं होतं.

परंतु, या पेशीसमूहाच्या उगमासंदर्भात काही वाद आहेत.

पेशी, कोरोना, साथीचे आजार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पेशींच्या वापरावर मर्यादा आहेत.

गर्भपातामधून या पेशी संकलित केल्या गेल्या, याने काही लोकांना अस्वस्थ वाटतं, तर मुळात ज्या स्त्रीच्या गर्भापासून या पेशी आल्या, (तिला वॉडमन यांनी "मिसेस एक्स" असं नाव दिलं आहे) तिने या वापरासाठी संमती दिलेली नव्हती. किंबहुना, अनेक वर्षांनंतर तिला या गोष्टीचा पत्ता लागला. या पेशीचा अधिक तपशीलवार वैद्यकीय इतिहास जाणण्याच्या आशेने कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील कोणीतरी तिला संपर्क साधल्यावर तिला हे सगळं कळलं.

आज पुन्हा असा प्रसंग घडण्याची शक्यता कमी आहे, कारण मानवी तंतूच्याबाबतीत आता अमेरिकेत नियमनं आली आहेत. अशा प्रकारची कोणतीही सामग्री संकलित केल्यावर ती सामायिक नियमांखाली येते- 1981 साली हा नैतिक प्रमाणकांचा संच लागू करण्यात आला. सरकारी निधी मिळण्यासाठी संशोधकांना या प्रमाणकांशी बांधील राहावं लागतं. माहिती देऊन संमती घेणं, ही यातील एक प्रमुख अट आहे.

परंतु, हा नियम गतकालीन घडामोडींना लागू होत नाही, आणि पूर्वी कधीतरी चोरला गेलेला तंतू अजूनही वापरात असल्याची अनेक उदाहरणं आहेत.

हा मुद्दा 2010 साली 'द इम्मॉर्टल लाइफ ऑफ हेन्रिट्टा लॅक्स' या पुस्तकातून पहिल्यांदा सार्वजनिकरित्या मांडला गेला. हेन्रिटा लॅक्स नावाच्या एका आफ्रिकी-अमेरिकी स्त्रीच्या गर्भाशयातील गाठीतून काही पेशी अजाणतेपणी काढल्या गेल्या आणि 1951 साली त्यातून हेला नावाचा लोकप्रिय पेशीसमूह तयार झाला.

आतापर्यंत या पेशींचा वापर 70 हजारांहून अधिक अभ्यासांसाठी झाला आहे आणि गर्भाशयाचे बहुतांश कर्करोग एचपीव्ही विषाणूमुळे होत असल्याचा शोध यातून लागला. लॅक्स यांच्या पेशींमुळे जे काही साध्य झालं, त्याबद्दल त्यांच्या वंशजांना एकंदरित अभिमान वाटत असला, तरी यातून त्यांच्या कुटुंबाऐवजी इतरांनी लाभ घेतल्याची टीकाही काहींनी केली आहे (द इम्मॉर्टल सेल्स ऑफ हेन्रिटा लॅक्स, याबद्दल अधिक जाणून घ्या).

जनुकीय मर्मदृष्टी

किफायतशीर जनुकीय क्रमनिर्धारणाचं आगमन झाल्यामुळे या प्रश्नातील नैतिक उल्लंघनाचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. मानवी पेशीसमूहांमध्ये मानवी गुणसूत्रं असतात- आणि डब्ल्यूआय-38 मध्ये त्या गर्भाच्या मातेची 50 टक्के गुणसूत्रं असतात. या पार्श्वभूमीवर हा पेशीसमूह खाजगीपणासंदर्भातील धोका निर्माण करण्याची शक्यताही काहींनी वर्तवली आहे.

कोणत्याही व्यक्तीच्या जनुकीय क्रमनिर्धारणामधून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आजाराचे धोके, वांशिकता, बुद्धिमत्ता व संभाव्य आयुर्मान या सगळ्याबद्दलची मर्मदृष्टी मिळू शकते. किंबहुना, संबंधित व्यक्तीला माहिती देऊन तिची संमती घेतली, तरीही मानवी तंतू अशा रितीने वापरण्यासंदर्भातील नैतिकतेबाबत वाद होतोच- कारण, जनुकीय सामग्री कौटुंबिक स्वरूपाची असते, त्यामुळे असा निर्णय केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर इतर अनेक नातलगांवर परिणाम करणारा ठरण्याची शक्यता असते.

यावरचा एक उपाय हा असू शकतो की, जनुकीय माहिती कधी व कशी वापरली जाईल, यासंबंधीच्या निर्णयात संबंधित संपूर्ण कुटुंबालाच सहभागी करून घ्यावं. हेला पेशीसमूहाच्या वेळी हे साधण्याचा थोडा प्रयत्न झाला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने 2013 साली लॅक्स यांच्या नातलगांशी या मुद्द्यावर समजुतीचा करार केला, पूर्ण जनुकीय माहिती उपलब्ध व्हावी यासाठी कोणी विनंती केली, तर त्याची पडताळणी करण्यासाठी तीन कुटुंबसदस्यांसह एक समिती स्थापन करण्यात आली. तोवर एका जर्मन चमूने त्या कुटुंबाची संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणा इंटरनेटवर प्रकाशित केली होती.

अशा चिंता व्यक्त होत असल्या, तरी त्यातून होणारे लाभ अधिक मोठे असल्याचं मानलं जातं. इतर वेळी गर्भपाताला विरोध करणाऱ्या अनेक धार्मिक संघटनांनीही काही पर्याय उपलब्ध नसेल तेव्हा गर्भपातातील पेशी वापरून लस उत्पादन करायला पाठिंबा दिला आहे. यात कॅथलिक चर्चचाही समावेश आहे. परंतु, लशीसाठी पर्यायी स्त्रोत शोधणं गरजेचं आहे, असं मतही चर्चने व्यक्त केलं.

अनेक पेशीसमूहांचा भयंकर उगम आणि त्यातून मिळणारे लाभ यांच्यातील संबंधांचं बहुधा सर्वाधिक लक्षणीय उदाहरण म्हणून रुबेला लशीचा विचार करता येईल. आत्तापर्यंत ही लस डब्ल्यूआय-38 पेशींपासून बनवली जात असली तरी, सुरुवातीला या लशीचा विकास केला जात असताना अनेक भिन्न गर्भपातांमधील गर्भाच्या पेशींचा मोठा वापर त्यात झाला होता- यातील अनेक गर्भपात होण्याचं मूळ कारणच हे होतं की, संबंधित मातेला या विषाणूची लागण झाली होती.

रुबेलाचे गरोदरपणाच्या काळात अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात, जन्मापूर्वीच बालकाचा मृत्यू होणं व गर्भस्त्रावर यांसारखे हे परिणाम असतात. एखाद्या स्त्रीला आधीच संसर्ग झाला असेल, तर न जन्मलेल्या बालकाला तिच्यामुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता 90 टक्के असते. त्यातून संबंधित बालकाला "जन्मजात रुबेलाची लक्षणं" दिसू शकतात आणि मेंदूला इजा होण्यापासून ते कमी ऐकू येण्यापर्यंत इतरही अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.

"पेशीसमूह वापरला नाही, तर त्याचे कोणते नैतिक परिणाम होतील, त्याचा विचार आपण करायला हवा," असं ऑल्शन्स्की म्हणतात. "विषाणूप्रतिबंधक लस विकसित करण्याच्या साखळीमधील हा एक कळीचा दुवा आहे, हे लक्षात घ्यायला हवं."

फ्लेमेल यांचं पुस्तक प्रकाशित होऊन चार शतकं उलटली आहेत, परंतु आत्तापर्यंत कोणी 300 वर्षंही जगलेलं नाही, अमरत्वाचं गुपित शोधणं तर दूरच. ही फ्लेमेलच्या चाहत्यांना निराश करणारी वस्तुस्थिती आहे.

हेफ्लिक मर्यादा ही सध्या लोकांसाठीची एक ठोस सीमा दिसत असली, तरी वैज्ञानिकांसाठी ती समस्या उरलेली नाही. पेशींच्या संदर्भात यावर मात करण्याचे प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत, आणि त्यामुळे वादग्रस्तरित्या का होईना आपल्यातील अनेकांना जिवंत राहायला सहाय्य झालेलं आहे. अमरत्वावरच्या संशोधनातून मात्र असं काही साधलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)