कोरोना लस: भारतीयांसाठी कोरोनाची 'उष्ण लस' तयार करणं का आवश्यक आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिश्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं.
सर्व लसींची 2 ते 8 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानामध्ये वाहतूक आणि वितरण होत असतं. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात कोव्हिड-19 च्या ज्या लसींवर काम सुरू आहे त्याा शून्य अंश सेल्सिअसच्याही खाली साठवण्याची गरज आाहे.
पण, कोव्हिड-19 वर अशी लस निघाली जी थंड तापमानवर अवलंबून नसेल, जी शीतपेट्यांमध्ये साठवण्याची गरज नसेल आणि ती कुठल्याही तापमानात अतिदुर्गम भागातही पोहोचवता आली तर…
भारतातले काही संशोधक अशी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या लशीला 'उष्ण लस' म्हटलं आहे. ही लस 100 अंश सेल्सिअसवर दीड तास, 70 अंश सेल्सिअसवर 16 तास तर 37 अंश सेल्सिअसवर महिनाभराहूनही अधिक काळ साठवली जाऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे.
राघवन वरदराजन बायोफिजिस्ट आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक आहेत. ते आणि त्यांच्या टीमने या लसीची प्राण्यांवर चाचणी केली आहे.
प्रा. वरदराजन म्हणतात, "या लसीचे चांगले परिणाम आढळून आले आहेत." या लसीच्या मानवी चाचणीसाठी त्यांना निधीची गरज आहे. या लसीसंदर्भातला संशोधन अहवाल अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर जर्नल या या प्रतिष्ठित अमेरिकन बायोलॉजिकल केमेस्ट्री नियतकालिकाने स्वीकारला आहे. नियतकाालिकात हा अहवाल लवकरच प्रकाशित करण्यात येईल.
केंद्राच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप म्हणतात, "या संशोधनानंतर कोल्डस्टोरेज चेनची गरज नसलेल्या या लसीसाठी फंडिंगसाठीचे नवे मार्ग खुले होतील, अशी आशा मला आहे."
उच्च तापमानातही टिकून राहणाऱ्या लशी दुर्मिळ आहेत.
जगात केवळ मिनिंगायटीस म्हणजेच मेंदूज्वर, ह्युमन पॅलिलोमाव्हायर (HPV) आणि कॉलरा या तीन आजारांवरच्या लस 40 अंश सेल्सिअस तापमानातही वापरतात येतात. तसा परवाना त्या लसींना मिळाला आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताही मिळाली आहे.
या लसी दुर्गम भागातही तात्काळ पोहोचवतात येतात आणि त्यामुळे आरोग्य सेवकांवरचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मोठ्या आणीबाणीच्या प्रसंगात या लसी उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ गेल्या वर्षी मोझाम्बिकमध्ये चक्रीवादळ आलं होतं. त्यावेळी ओरल कॉलरा लशीचं मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्स एक्सेस अभियानाचे धोरण सल्लागार ज्युलियन पोटेट म्हणतात, "मर्यादित स्रोत असताना अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या शेवटच्या लोकांपर्यंत लस पोहोचवताना लसीसाठी कोल्ड स्टोरेजची गरज नसेल तर ते खूप सोयीचं पडतं.
मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवताना कमीत-कमी वेळेत वेगवेगळ्या भागांमध्ये लसीचे लाखो डोस पोहोचवायचे असतात. अशावेळी तर कोल्ड स्टोरेजची गरज नसलेली लस खूप उपयुक्त ठरतात."
भारताला कोव्हिड-19 लसीचे 40 ते 50 कोटी डोस मिळतील आणि पुढच्या वर्षी जानेवारी ते जुलै या दरम्यान जवळपास 25 कोटी लोकांना ही लस दिली जाईल, अशी शक्यता आहे.
भारतात गेल्या 42 वर्षांपासून लसीकरण कार्यक्रम राबवला जातो. जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमांपैकी हा एक आहे. याच कार्यक्रमांतर्गत कोव्हिड-19ची लसही दिली जाईल.
भारताच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी विशेषतः नवजात बालकं आणि गर्भवती स्त्रियांचा समावेश असणाऱ्या तब्बल 5 कोटी 50 लाख लोकांना वेगवेगळ्या आजारांसाठीच्या लसीचे जवळपास 39 कोटी डोस दिले जातात.

ही इतकी मोठी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी भारतात लशीसाठी सरकारी मालकीच्या कोल्ड स्टोरेजचे सशक्त जाळे आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून 80 लाखांहून जास्त ठिकाणी डोस पोहोचवता येतात.
लसीला थंड ठेवण्याासाठी छोटे फ्रिझर्स, बर्फाच्छादित रेफ्रिजरेटर्स, रेफ्रिजरेटेड ट्रक, ड्राय बर्फ आणि कोल्ड बॉक्ससारखे कुलंट पॅक्सची गरज असते. अशा प्रकारे लस थंड तापमानात ठेवून दुर्गम भागापर्यंत पोहोचवावी लागते. भारताच्या या लसीकरण मोहिमेत जवळपास 40 लाख डॉक्टर्स आणि नर्सेसचा सहभाग आहे.
फार्मास्युटिकल कोल्ड चेन उत्पादनांमधली मोठी कंपनी असलेल्या ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थैगराजन म्हणतात, "भारतात मोठ्या प्रमाणावर लस आणि लसीकरण मोहिमेचं व्यवस्थापन करण्यात आलं आहे. 2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात ठेवण्यात येणाऱ्या लसीसाठीची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र, लस उणे 40 अंश सेल्सियसवर ठेवायची असेल तर त्यासाठीची व्यवस्था आपल्याकडे नाही."
तापमानाच्या दृष्टीने कोव्हिड-19 लसीचं वर्गीकरण तीन प्रकारे करता येऊ शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. 2-8 अंश सेल्सिअस, उणे 20 अंश सेल्सिअस आणि उणे 70 अंश सेल्सिअस. यासाठी अनेकांना 'अल्ट्रा कोल्ड चेन'ची गरज असेल आणि बऱ्याच देशांसाठी हे मोठं आव्हान ठरणार आहे.
व्यापक लसीकरण मोहिमेसाठी कोल्ड चेन पुरवणं मोठं आव्हान असणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारताकडे 40 टनांची कोल्ड स्टोरेज क्षमता आहे. जगातल्या सर्वाधिक कोल्डस्टोरेज क्षमता असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. मात्र, या क्लोड स्टोरेजमध्ये प्रामुख्याने भाज्या, हेल्थकेअर प्रोडक्ट्स, फुलं आणि केमिकल्स साठवले जातात.
लशीच्या साठवणुकीची आपली बरीचशी क्षमता ही आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करत नाही. उच्च तापमानाच्या संपर्कात येताच लसीची गुणवत्ता ढासळते. तसंच वाहतुकीदरम्यान लस गोठण्याची शक्यता असते. याचीही काळजी घ्यावी लागते.
लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवता येत असली तरी बहुतेश कोल्ड स्टोरेजची साठवण क्षमता ही अर्भकांचं लसीकरण करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. मात्र, आपल्याला संपूर्ण लोकसंख्येचंच लसीकरण करायचं आहे. त्यामुळे ही क्षमता कमी पडेल, अशी काळजी जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
अमेरिका स्थित ड्युक ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्युटचे अँड्री टेलर म्हणतात, "अनेक आव्हानं आहेत आणि ती पार करता येतील. मात्र, लस उपलब्ध असतील का, लसींचे किती डोस किंवा किती कोल्ड स्टोरेजची गरज असेल, याची नेमकी माहिती नसल्यामुळे अनेक देशांसाठी जोमाने तयारीला लागणं कठीण असणार आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








