कोरोना : हिवाळ्यात 'फ्लू' चा संसर्ग होण्यामागे काय कारणं आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ऋतू बदलला किंवा तापमानात अचानक बदल झाला की ताप येणारच…दोन-तीन दिवस ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला हमखास होणार. हा ताप म्हणजे साधारण 'फ्लू'…
आपणही 'फ्लू' आहे रे…काळजी नको, असं अनेकदा म्हणतो. 'फ्लू' चा सीझन आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय. जगभरात दरवर्षी लाखो लोक 'फ्लू' ने आजारी पडतात, तर गुंतागुंत वाढल्याने काहींना जीवही गमवावा लागतो.
कोव्हिड-19 आणि 'फ्लू' ची लक्षणं सारखी आहेत. त्यात आता हळूहळू थंडीची चाहूल सुरू झाली आहे. मुंबई, पुण्यात वातावरणात बदल झाल्याने गारवा वाढलाय. तज्ज्ञांच्या मते, थंड वातावरण व्हायरसच्या वाढीसाठी पोषक असतं. थंड वातावरणात व्हायरस जास्तकाळ जगू शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात 'फ्लू' पसरण्याची कारणं आणि व्हायरस कशामुळे पसरतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.
'फ्लू' चा ताप पसरवणारा व्हायरस
'फ्लू' हा श्वसनसंस्थेशी निगडीत असलेला संसर्गजन्य आजार आहे. 'इन्फ्लूएन्झा' व्हायरसरमुळे होणारा हा आजार नाक, घसा आणि काहीवेळा फुफ्फुसांवर आघात करतो.
सामान्यत: हा आजार अतिसौम्य ते तीव्र स्वरूपाचा असतो. मात्र काहीवेळा लोकांचा यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. 'फ्लू' पासून बचावासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये 'फ्लू' ची लस घेण्याची शिफारस डॉक्टर करतात. भारतात 'फ्लू' शॉट्सबाबत अजूनही लोकांना तेवढी माहिती नाही.
जगभरात 'फ्लू' संसर्गाची आकडेवारी
'फ्लू' ची साथ ठराविक काळात येतेच. त्यामुळे आपण याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी जगभरात 50 लाख लोकांना 'फ्लू' चा संसर्ग होतो. तर, जवळपास 2.5 लाख लोकांना 'फ्लू' च्या संसर्गामुळे मृत्यू होतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार 'फ्लू' ची साथ दरवर्षी येत असल्याने व्हायरसमध्ये सतत बदल होत असतात.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-सीरम इन्स्टिट्यूटला लशीची चाचणी पुन्हा सुरू करायला परवानगी
- वाचा- कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत?

"दरवर्षी 'फ्लू' चा व्हायरस झपाट्याने बदलत असल्यामुळे, शरीरात तयार झालेली रोग प्रतिकारक शक्ती, या बदललेल्या व्हायरसचा मुकाबला करू शकत नाही. नवीन व्हायरसला अॅंटीबॉडीज ओळखत नाहीत. ज्यामुळे आपण आजारी पडतो," असं पुण्यातील जनरल फिजिशिअन डॉ. संवेदा समेळ म्हणतात.
'फ्लू' चं इन्फेक्शन वर्षातून फक्त एकदाच होईल असं नाही. एकदा होऊन गेला म्हणजे पुन्हा होणार नाही असं नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर 2-3 वेळा देखील 'फ्लू' चा संसर्ग होऊ शकतो.
हिवाळ्यात 'फ्लू' पसरण्याची कारणं
* सूर्यप्रकाश कमी असल्याने अल्ट्राव्हायलेट (अतिनील) किरणं कमी
* प्रदूषण जास्त असल्याने इन्फेक्शनमध्ये वाढ
* व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) च्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते
* सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात गर्दी आणि भेटीगाठी वाढतात
* अॅलर्जीमुळे सर्दी, खोकला आणि तापाचं प्रमाण जास्त
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हिवाळ्याच्या दिवसात व्हायरस झपाट्याने का पसरतो. याची कारणं लोकांनी लक्षात घेतली पाहिजेत. एकीकडे कोव्हिड-19 तर दुसरीकडे 'फ्लू' याची लक्षणं सारखीच असल्याने लोकांनी खबरदारी घेतली तर आपण आपली सुरक्षा सहजतेने करू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत बीबीसीशी बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदातेंनी म्हटलं, "आपल्या नाकात इन्फेक्शन आणि अॅलर्जी पसरवणाऱ्या घटकांपासून बचावण्यासाठी एक आवरण (Mucosa) असतं. बाहेरील तापमान कमी असल्याने नाकातील तापमानही 4 डिग्रीने कमी होतं. या आवरणात व्हायरस आणि अॅलर्जी पसरवणारे घटक अडकून राहतात. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते."
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, थंडीत श्वसनावाटे थंड हवा शरीरात जाते. दुसरीकडे शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आचुंचित होतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसवर हल्ला करून त्याला मारून टाकू शकत नाही. ज्यामुळे शरीराची बचावात्मक भिंत भेदून व्हायरस शरीरात प्रवेश करतो.
अल्ट्राव्हायलेट किरणाचं प्रमाण कमी
हिवाळा व्हायरसला पोषक असण्याच दुसरं कारण म्हणजे, अतिनील किरणांची तीव्रता कमी असणं. थंडीच्या दिवसात उन्हाळ्याच्या तुलनेत सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे व्हायरस जास्त काळ टिकतात.

फोटो स्रोत, Getty Images
"व्हायरसला मारण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे विषाणू नष्ट होतात. त्यामुळे उन्हाळ्यात व्हायरसला वाढण्यासाठी पोषक वातावरण नसतं.
थंडीच्या दिवसात मात्र सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांची तीव्रता कमी होते. काहीवेळेस सूर्यकिरण पोहोचत नाहीत. त्यामुळे थंड वातावरणात व्हायरस दिर्घकाळ जिवंत राहतो आणि वाढण्यास पोषक परिस्थिती तयार होते," असं डॉ. संवेदा सांगतात.
प्रदूषणामुळे वाढतात फुफ्फुसांचे आजार
मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये आपण थंडीच्या दिवसात धुरक्याची चादर पसरल्याचं पाहतो. हे धुरकं म्हणजे वातावरणातील प्रदूषण. विषारी वायू, धुलीकण आणि श्वसनास अडथळा निर्माण करणारे घटक असलेली हवा आपण आत (Inhale) घेतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे देखील हिवाळ्यात 'फ्लू' चा संसर्ग झपाट्याने पसरण्याचं कारण आहे.
आता हिवाळा येत असल्याने फफ्फुसांचे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे खबरदारी महत्त्वाची असल्याचं, संसर्गजन्ज्ञ आजारतज्ज्ञ डॉ. तृप्ती सांगतात.
'व्हिटॅमिन-डी' चं प्रमाण कमी
भारतात 90 टक्के लोकांच्या शरीरात 'व्हिटॅमिन-डी' ची कमतरता आढळून येते. सूर्यप्रकाशातून आपल्याला मुबलक प्रमाणात 'व्हिटॅमिन-डी' मिळतं. पण घरी किंवा ऑफिसमध्ये बंद खोलीत एसीत काम होत असल्याने सूर्यप्रकाशाशी आपला संपर्क फार कमी येतो. त्यामुळे शरीरातील 'व्हिटॅमिन-डी' चं प्रमाण कमी होतं.
मुंबईतील धारावीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अवनी राऊत 'व्हिटॅमिन-डी' च्या महत्त्वाबाबत सांगतात, "'व्हिटॅमीन-डी' शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. शरीरात 'व्हिटॅमिन-डी' च प्रमाण कमी असेल तर 'फ्लू' चा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
आशिया खंडातील लोकांच्या शरीरात 'व्हिटॅमिन-डी' चं प्रमाण खूप कमी असल्याचं आढळून आलं आहे. जगभरात झालेल्या अभ्यासानुसार, ज्यांच्या शरीरात 'व्हिटॅमिन-डी' चं प्रमाण कमी आहे त्यांना कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्याचं आढळून आलं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
शरीरासाठी व्हिटॅमिन-डी फार महत्त्वाचं आहे. पण, याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. शरीरातील व्हिटॅमिन-डी वाढवण्यासाठी डॉ. अमोल काही सोपे उपाय सांगतात,
* दररोज 15 ते 20 मिनिटं उन्हात बसा
* सकाळी 7 ते 10 या वेळेत कोवळं उन घेण्यासाठी बाहेर किंवा छतावर जा. वर्क फ्रॉम होम असेल छतावर काम करा
* कोवळं उन शरीराला फार गरजेचं आहे
तज्ज्ञांच्या मते, 'फ्लू' पसरण्यासाठी आणखी एक महत्त्वाची पोषक गोष्ट म्हणजे लोकांच्या संपर्कात आलेल्या आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तू.
संपर्काने पसरणार संसर्ग
येणारे दिवस सणासुदीचे आहेत. या काळात मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडतील. कोव्हिड-19 चा लॉकडाऊन जवळपास उठल्याने लोकं कामासाठी प्रवास करतील. त्यामुळे लोकांचा संपर्क वाढल्याने 'फ्लू' च्या संसर्गाची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
"हिवाळ्यात 'फ्लू' चा व्हायरस वस्तूंवर दीर्घकाळ जिवंत रहातो. त्यामुळे ऑफिसच्या डेस्कवर, घरात, ट्रेन, बसने प्रवास करताना वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर व्हायरस खूप वेळ जिवंत राहण्याची शक्यता आहे. या वस्तूंवर असलेल्या व्हायरसशी आपला संपर्क आला तर आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. एसीच्या रूममध्ये हवेत जास्तवेळ सर्क्युलेशनमध्ये राहील. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढेल," असं डॉ. समेळ पुढे सांगतात.
त्याचसोबत, हिवाळ्यात शरीराची चयापचयशक्ती (Metabolism) कमी होते. आहारातून आपल्याला उर्जा मिळते. हिवाळ्यात आहार थोडा कमी होतो. हे देखील रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामागचं एक कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हिवाळ्यात 'फ्लू' च्या संसर्गापासून बचावासाठी डॉ. अवनी राऊत यांनी हे सोपे उपाय सांगितले,
* उष्ण पदार्थाचं सेवन करा. जास्त तेलकट खाऊ नका
* थंड पाणी पिऊ नका. त्यामुळे घसा सुकतो आणि घशातील व्हायरसला वाढण्यासाठी मदत मिळते
* नाक, कान आणि घसा हायड्रेट ठेवा
* घसातील वातावरण गरम ठेवा.
* शक्यतो एसी आणि फॅनच्या खाली बसू नका
थंडीच्या दिवसात वातावरणात उडणारे परागकण नाकावेटे शरीरात जाऊन अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अॅलर्जीमुळे देखील अंगदुखी, सर्दी, खोकला आणि ताप येण्याची शक्यता असते असं तज्ञ सांगतात.
एकीकडे आपण कोव्हिड-19 विरोधात युद्ध लढतोय. तर, हिवाळ्यात झपाट्याने पसरणाऱ्या 'फ्लू' पासूनही आपल्याला संरक्षण करायचं आहे. त्यामुळे हिवाळ्यात फ्लू पसरणाऱ्या कारणांवर नीट लक्ष दिलं आणि काळजी घेतली तर फ्लू पसरण्यापासून आपण रोखू शकतो.
'फ्लू' ची लस मदत करेल
सामान्यांना 'फ्लू' पासून सुरक्षा देण्यासाठी लस उपलब्ध आहे. याला 'फ्लू शॉट्स' असं म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'फ्लू' पासून बचावासाठी लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. 'फ्लू' विरोधातील लशीमुळे 'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात.
"भारतात 'फ्लू' शॉट्सबाबत लोकांमध्ये अजूनही जागरूकता नाही. लोकांपर्यंत याच महत्त्व पोहोचवलं पाहिजे. लस घेतल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी लोकांना फ्लू शॉट्सबाबत माहिती देणं गरजेचं आहे. ज्यामुळे आजार झाला तर गुंतागुंत कमी होण्यास मदत होते," असं डॉ. अमोल सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








