कोरोना विषाणूच्या फैलावाचा भारतातमध्ये वेग मंदावतोय का?

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तब्बल 65 लाख कोरोनाग्रस्त आणि 1 लाख मृत्यूंनंतर भारतात कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा वेग मंदावतोय का?

भारतात या महिन्यात दररोज सरासरी 64 हजार कोरोनाग्रस्त आढळत आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात सरासरी 86 हजार कोरोनाग्रस्त आढळले होते.

सप्टेंबर महिन्यातच पूर्वी दररोज सरासरी 93 हजार केसेस आढळत होत्या. राज्यांमध्ये कोरोनाची लागण होऊन मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. यापूर्वीच्या महिन्यांच्या तुलनेत टेस्टिंगची संख्या वाढूनही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं दिसतंय.

ऑगस्ट महिन्यात दररोज 70 हजार टेस्ट व्हायच्या. त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये टेस्टिंगचं प्रमाण खूप वाढलं. ऑक्टोबरमध्ये दररोज 11 लाखांहूनही जास्त टेस्ट होत आहेत. तर सप्टेंबर महिन्यात जवळपास 10,50,000 हजार टेस्ट व्हायच्या.

ही आकडेवारी बघता कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचं दिसतं. मात्र, या आकडेवारीचा अर्थ काढताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं साथरोगतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोरोना
लाईन

कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होणं, सकारात्मक संकेत आहेत. मात्र, त्यावरून कोरोना विषाणूच्या साथीचा वेग मंदावतोय, असा निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात की, एकतर कुठल्याही निष्कर्षापर्यंत येण्यासाठी टेस्टिंगची संख्या वाढणं आणि रुग्णांची संख्या कमी होणं, एवढंच पुरेसं नाही. भारतात ज्या टेस्ट होत आहेत त्यापैकी निम्म्या टेस्ट या रॅपिड अँटिजेन टेस्ट आहेत.

त्या कमी वेळेत निकाल देणाऱ्या आणि स्वस्त आहेत. मात्र, त्यांची विश्वासार्हताही कमी आहे. काही रुग्णांमध्ये तर या रॅपिड अँटिजेन टेस्टची विश्वासार्हता 50% इतकीच आहे.

या उलट RT-PCR टेस्ट अधिक विश्वासार्ह आहे. या चाचणीत स्वॅब सॅम्पलमधून जेनेटिक मटेरियल वेगळे करून चाचणी करतात. मात्र, ही टेस्ट महागडी आहे. शिवाय, याचे निकाल यायलाही जास्त वेळ जातो.

बीबीसीशी बोलताना विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जलील म्हणाले, "रॅपिड टेस्टिंगच्या चुकीच्या निकालांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसतीये की खरंच लागण होण्याचं प्रमाण घटतंय, हे सांगणं कठीण आहे."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या मते सरकारने एकूण किती PCR टेस्ट केल्या आणि किती रॅपिड टेस्ट केल्या, याची आकेडवारी उपलब्ध करून दिली तरच यावर ठामपणे काही सांगता येईल.

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. श्रीनाथ रेड्डी यांच्या मते भारतात 'ऑन डिमांड टेस्टिंग' सुरू झाली आहे. कदाचित हेच कारण असावं की, लक्षणं नसणाऱ्या लोकांमध्येही टेस्टिंगचं प्रमाण वाढलं असावं. असं असलं तरी अनेक अँटीबॉडी सर्व्हे आणि इतर रिपोर्ट्सवरून भारतात टेस्ट न केलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्याही खूप जास्त असल्याचं दिसतं.

कोरोना विषाणूच्या जागतिक संकटावर बारकाईने लक्ष ठेवून असलेले मिशिगन विद्यापीठातले बायोस्टॅटिस्टिक अँड एपिडेमिओलॉजीचे प्राध्यापक डॉ. भ्रमर मुखर्जी यांच्या मते भारतात आतापर्यंत 12 ते 13 कोटी लोकांना कोरोना विषाणूची लागण झालेली असावी. ही संख्या भारतीय लोकसंख्येच्या जवळपास 10 टक्के इतकी जास्त आहे.

भारतात झालेल्या वेगवेगळ्या अँटीजेन टेस्टवरून आतापर्यंत 9 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसतं. सरकारी आकडेवारीपेक्षा ही संख्या तब्बल 15% जास्त आहे.

डॉ. मुखर्जी म्हणतात, "विषाणूच्या फैलावाची वणव्याशी तुलना केली तर हा वणवा पसरण्यासाठी अजून बरंच जंगल शिल्लक आहे. मात्र, या आगीचा वेग कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यामुळे आपली आरोग्य व्यवस्था मजबूत करायला वेळ मिळेल."

पण मग भारतात कोरोना विषाणूची लागण होण्याचा वेग मंदावला की नाही, हे कसं कळणार?

डॉ. रेड्डी यांच्या मते मृत्यूची आकडेवारी मिळवून याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणतात, "कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत असली तरी मृत्यू होणाऱ्यांच्या 7 दिवसांच्या 'मूव्हिंग अव्हरेज'वरून विषाणूचा फैलाव कमी होतोय की नाही, हे सांगता येईल. यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे."

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये शास्त्रज्ञ अॅडम कचारस्की म्हणतात की, कुठल्याही जागतिक आरोग्य संकटाचे चार टप्पे असतात - सुरुवात (स्पार्क), वाढ (ग्रोथ), शिखर (पीक) आणि घसरण (डिक्लाईन). बरेचदा हे टप्पे अनेकदा येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

युकेमध्ये 2009 साली जेव्हा स्वाईन फ्लूची साथ आली होती त्यावेळी उन्हाळ्यात ती वाढली, जुलैमध्ये तिचा पीक होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली.

कोव्हिड-19चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असलेल्या देशांचं उदाहरण घेऊया - अमेरिका, यूके, रशिया आणि फ्रान्स. संसर्गजन्य आजारतज्ज्ञांच्या मते कॅम्पस पुन्हा सुरू झाल्यानंतर अमेरिका आता तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. अमेरिकेतल्या 22 प्रांतांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ बघायला मिळाली. तर इतर देशांमध्ये दुसऱ्यांदा रुग्णसंख्येने शिखर गाठल्याचं दिसतंय.

डॉ. मुखर्जी म्हणतात की, दिलासादायक चित्र वाटत असलं तरी ते 'क्षणिक आणि अल्पकालिक' आहे. भारतात लवकरच सण सुरू होतील. तेव्हा लोक एकमेकांना जास्त भेटतील. त्यावेळी एका 'सुपरस्प्रेडर इव्हेंटने' विषाणू संक्रमणाचं चित्र दोन आठवड्यात पालटू शकतं.

ते म्हणतात, "हे (रुग्णांची संख्या कमी होणं) आजार नियंत्रणात येत असल्याचे संकेत नाहीत किंवा ही दिलासादायक बाबही नाही. जगाच्या निम्म्या लोकसंख्येला लागण होईपर्यंत आपल्याला या 'पॉझ, रिस्टार्ट अँड ड्राईव्ह'ची सवय करून घ्यावी लागणार आहे. हे एक दुर्दैवी वास्तव आहे."

त्यामुळे एक गोष्ट गाठ बांधून ठेवा - मास्क वापरा, सतत हात स्वच्छ धुवा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर रहा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)