You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिंगापूर : प्रयोगशाळेत तयार झालेल्या चिकनला मान्यता देणारा पहिला देश
सिंगापूरने प्रयोगशाळेत तयार झालेल्या चिकनला मान्यता दिली आहे. हे चिकन प्राण्यांची कत्तल करून मिळवलेलं नसेल. अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रयोग आहे आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता सॅन फ्रान्सिस्कोस्थित इट जस्ट स्टार्टअपचा प्रयोगशाळेत तयार केलेलं मांस विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुरुवातीला हे मांस नगेट्समध्ये वापरलं जाईल. मात्र हे प्रयोगशाळेत तयार होणारं चिकन बाजारात कधी उपलब्ध होईल हे इट जस्टने स्पष्ट केलेलं नाही.
आरोग्याविषयीची चिंता, प्राण्यांविषयीची काळजी आणि पर्यावरण या मुद्यांविषयी जागरुकता वाढल्याने प्राण्यांची कत्तल करून मिळणाऱ्या मांसाऐवजी पर्यायी पद्धतीने मांस खरेदी करून त्याच्या वापरण्याला प्राधान्य मिळू लागलं आहे.
बॅरक्लेच्या म्हणण्यानुसार, पर्यायी म्हणजेच प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या मांसाची बाजारपेठ येत्या दशकात 140 बिलिअन डॉलर्सची असू शकते. जागतिक मांस उद्योगाच्या 10 टक्के प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या मांसाची बाजारपेठ असू शकते.
फॅक्टरीसदृश वातावरणात मांस तयार करणारे बियाँड मीट आणि इम्पॉसिबल फूड्स हे पर्याय सूपरमार्केट्स आणि रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहेत.
इट जस्टचं वेगळेपण हे की केवळ प्लाँटमध्ये तयार झालेलं मांस नाही पण प्रयोगशाळेत प्राण्यांच्या पेशी विकसित करून तयार केलेलं मांस आहे.
खाद्यपदार्थांच्या जागतिक बाजारपेठेच्या वाटचालीतला हा निर्णायक टप्पा असल्याचं इट जस्टला वाटतं आहे. अन्य देशही सिंगापूरप्रमाणे प्रोसेस्ड मांसाच्या वापराला मान्यता देतील अशी कंपनीला आशा आहे.
गेल्या दशकभरात, डझनवारी स्टार्टअप कंपन्यांनी प्रयोगशाळेत तयार झालेलं मांस बाजारात आणण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या मांसापेक्षा हे मांस नीतीमूल्य पातळीवर आघाडीवर आहे, असा दावा केला गेला आहे.
इस्रायलस्थित फ्युचर मीट टेक्नॉलॉजी आणि बिल गेट्स प्रणित मेमफिस मिट्स या दोन कंपन्या परवडणाऱ्या दरात आणि चवदार असं हे नव्या पद्धतीचं मांस बाजारपेठेत आणण्यासाठी उत्सुक आहेत.
सिंगापूरची शिओक मीट्स कंपनी क्रस्टिकन तयार करण्याच्या कामात गुंतली आहे.
प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या या मांसामुळे पर्यावरणीय फायदे अनेकजण सांगत आहेत. मात्र शास्त्रज्ञांनी या मांसामुळे हवामान बदल प्रक्रियेला हातभार लावला जात असल्याकडे लक्ष वेधलं आहे.
काय आहेत आव्हानं?
मारिको ओ, बीबीसी न्यूज सिंगापूर
खाद्यपदार्थांच्या जागतिक बाजारपेठेच्या वाटचालीतला हा मैलाचा दगड आहे, असं इट जस्ट कंपनीच्या प्रमुखांनी सांगितलं. मात्र या मांसापुढची आव्हानं कायम आहेत.
प्रयोगशाळेत विकसित करण्यात येणारं मांस कंपनीत तयार होणाऱ्या मांसापेक्षा महाग आहे. उदाहरणार्थ, इट जस्टने प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेल्या मांसापासून तयार झालेल्या नगेट्सचं एक पाकीट प्रत्येकी 50 डॉलर्स इतक्या किमतीला उपलब्ध आहे.
ही किंमत आता कमी झाली आहे, मात्र मांसाच्या सर्वसाधारण किमतीपेक्षा ही किंमत जास्तच आहे.
खवैय्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणं या कंपन्यांसाठी महत्त्वाचं आहे. मात्र सिंगापूर सरकारने वापराला मंजुरी दिल्याने जगभरात अन्यत्र कंपनीला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अन्य काही देशही अशा स्वरुपाच्या मांसाला परवानगी देऊ शकतात.
सुरक्षित अन्न?
इट जस्ट कंपनीच्या मांस उत्पादन आणि सुरक्षिततेसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा आढावा सिंगापूर फूड एजन्सीने घेतला.
विविध पातळ्यांवर या मांसाची चाचणी घेण्यात आली. त्यानंतरच हे मांस खाण्यासाठी योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला. म्हणूनच नगेट्समध्ये याच्या वापराला परवानगी मिळाली आहे.
या मांसाकरता नियमन आराखडा तयार करण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये या मांसाची विक्री होण्यापूर्वी सुरक्षिततेचे सर्व निकष पाळले गेले आहेत याची शहानिशा करण्यात येईल, असं सिंगापूर फूड एजन्सीने स्पष्ट केलं.
प्रयोगशाळेतील मांसाच्या वापरासाठी आम्हाला नियामकांकडून जी परवानगी मिळाली आहे ती सिंगापूरमध्ये पहिलीच अशी आहे. जगातलाही हा पहिलाच असा प्रयोग आहे, असं इट जस्टचे सहसंस्थापक जोश टेट्रिक यांनी सांगितलं.
या प्रक्रियेदरम्यान कोणतेही अँटीबायोटिक्स वापरण्यात आलेले नाहीत. पारंपरिक चिकनच्या तुलनेत या मांसामध्ये कमी प्रमाणात जैवशास्त्रीय घटक असतील, असं कंपनीने सांगितलं.
प्रयोगशाळेत तयार झालेल्या उच्च दर्जाच्या मांसाला नियामकांनी परवानगी दिली आहे. प्राण्यांच्या पेशींपासून हे तयार करण्यात आलं आहे. माणसांच्या वापराकरता सुरक्षित असल्याची परवानगी मिळाल्याने सिंगापूरमध्ये छोट्या पातळीवर कमर्शियल लाँच लवकरच करता येईल असं कंपनीने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)