You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चिकनः आपण 'कोंबड्यांच्या जगात' राहतोय, असा झाला चिकनचा जन्म...
- Author, हेलन ब्रिग्स
- Role, बीबीसी न्यूज
तुम्हाला माहितीये, कोणत्याही घडीला आपल्या या पृथ्वीवर 23 अब्ज कोंबड्या असतात. म्हणजे मानवी लोकसंख्येच्या तिप्पट कोंबड्या या जगात आहेत. विक्रीच्या दृष्टीने पैदास करण्यात आलेल्या कोंबड्यांची संख्या वाढल्याने जंगली कोंबड्यांच्या संख्येत घट झाली आहे.
"आज जिवंत असणाऱ्या पक्ष्यांच्या कोणत्याही प्रजातीपेक्षा कोंबड्याची एकूण संख्या अनेक पटींनी जास्त आहे," असं युनिव्हर्सिटी ऑफ लीस्टरमधले भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. कार्यस बेनेट म्हणतात. ते याविषयीच्या संशोधनाचे प्रमुख होते. "आपण कोंबड्यांच्या ग्रहावर राहतो, असं आपणं म्हणू शकतो."
आपल्यामुळे पर्यावरणामध्ये घडत असलेल्या बदलांचं द्योतक या कोंबड्या असल्याचं शास्त्रज्ञ म्हणतात. लंडनमध्ये पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननामध्ये कोंबड्यांची काही हाडं आढळली होती. आज आपण पाहतो तो पक्षी त्या काळातील त्याच्या मूळ वंशजांपेक्षा प्रचंड मोठे बदल झाले असल्याचं संशोधनात आढळलंय. मानवानं कोंबड्या पाळण्यास आठ हजार वर्षांपूर्वी सुरुवात केली.
खरंतर इव्हॉल्यूशन किंवा उत्कांती घडून येण्यासाठी लक्षावधी वर्षांचा कालावधी लागतो. पण कोंबड्यांमध्ये मात्र फार झपाट्याने बदल झाले आहेत.
कोंबड्यांविषयीची आकडेवारी
- 65.8 अब्ज कोंबड्या 2014 मध्ये कापण्यात आल्या. याच वर्षी 1.5 अब्ज डुकरं आणि 0.3 अब्ज गुरांचीही मांसाहारासाठी कत्तल करण्यात आली होती.
- जगभरामध्ये 'फ्राईड चिकन'साठी प्रसिद्ध एका लोकप्रिय ब्रँडचे 25,500 स्टोअर्स आहेत.
- 2006च्या एका आकडेवारीनुसार सध्याच्या एकूण कोंबड्यांपैकी 70 टक्के ब्रॉयलर कोंबड्या या 'Intensively Reared' म्हणजे कृत्रिम पैदास करण्यात आलेल्या असतात.
- या ब्रॉयलर कोंबड्यांचं आयुष्य 5 ते 7 आठवडे असतं.
- इसवी सन 1800 मध्ये मध्ये पॅसेंजर पिजन (Passenger Pigeon) वा जंगली कबुतर हा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा पक्षी होता. या पक्षांची संख्या 30 ते 50 कोटींच्या घरात होती. पण आता ही कबुतराची ही प्रजाती नामशेष झाली आहे.
कोंबड्यांमध्ये कालागणिक कसा बदल घडला, याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी पुरातत्त्व संशोधनाचा आधार घेतला. भूगर्भामध्ये आणि पर्यायवरणामध्ये त्या त्या काळात काय घडलं याचं या कोंबड्या द्योतक असल्याचं ते म्हणतात.
आपण आता Anthropocene काळामध्ये आहोत. म्हणजे असा काळ जेव्हा पर्यावरणामध्ये घडणाऱ्या मोठ्या बदलांसाठी माणूस कारणीभूत असतो.
"माणसाच्या कृत्यांमुळे एकूणच पृथ्वीवरच्या भूभागांत, समुदात, वातावरणात आणि पृष्ठभागात बदल घडलाय. या ग्रहावर असणाऱ्या मिनीवर राहणाऱ्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये माणसांमुळे बदल घडलाय. तसेच बदल आपण सध्या ज्या प्रकारच्या कोंबड्या पहातो, त्यामध्ये घडले आहेत. बदललेल्या जीवशास्त्राच्या या कोंबड्या द्योतक आहेत." डॉ. बेनेट म्हणतात.
"पुढच्या पिढ्यांनी जर आपल्या आत्ताच्या काळातल्या दगडांचा अभ्यास केला तर त्यांना कदाचित त्यामध्ये 'टिन कॅन्स, काचेच्या बाटल्या, आणि प्लास्टिकचे अवशेष मिळतील. आणि या सगळ्यामध्येच कोंबड्यांची हाडंही असतील," त्या म्हणतात.
पृथ्वीवर सध्या असणाऱ्या प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी पाळीव प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
सध्या आढळणारी पाळीव कोंबडी, ही आग्नेश आशियातल्या उष्णकटिबंधात आढळणाऱ्या लाल जंगली कोंबडीच्या वंशाची आहे. साधारण 8,000 वर्षांपूर्वी हा पक्षी अंडी आणि मांसासाठी पाळायला सुरुवात झाली आणि जगभरातमध्ये लवकरच ही पद्धत सगळीकडे रुळली.
आकाराने मोठ्या कोंबड्यांचं उत्पादन करण्यासाठी 1950च्या दशकामध्ये 'चिकन ऑफ टुमॉरो प्रोग्राम' (भविष्यातल्या कोंबड्या योजना) सुरू करण्यात आला. तेव्हापासून या कोंबड्यांमध्ये विलक्षण बदल घडून आले आहेत.
लवकर वजन वाढेल अशा पद्धतीने आता कोंबड्यांची पैदास करण्यात येते. त्यांच्या शरीराकडे पाहून आणि हाडांमधली रसायनं आणि जेनेटिक्स (अनुवंशशास्त्र)वरूनही हे लक्षात येतं.
तर क्वचितच कधीतरी खाल्ली जाणारी 'रोस्ट चिकन' आता जगभरातला एक मोठा व्यवसाय बनली आहे.
रॉयल सोसायटी ओपन सायन्सच्या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)