संख्या वाढली म्हणून हत्तींच्या शिकारीचा पर्याय कितपत योग्य?

आफ्रिकेमधल्या गवताळ प्रदेशात तीस-पस्तीस हत्तींचा एक मोठा कळप रमतगमत पाण्याच्या दिशेने जातोय. अचानक कुठून तरी एक हेलीकॉप्टर येतं. हत्ती बिथरून सैरावैरा पळायला लागतात. या गडबडीत लहान पिल्लांना इजा होते. मग त्या हेलीकॉप्टरचा पायलट शिताफीने त्या सगळ्या हत्तींना आधीच ठरलेल्या एका जागी हाकतो. हेलीकॉप्टर थोडं खाली येतं, आणि शार्पशूटर अचूक निशाणा साधत बाण (डार्ट) सोडतात. या बाणांवर या प्राण्यांच्या हालचाली मंदावणारं औषध लावलेलं असतं. लवकरच जीपमध्ये बसून काही बंदूकधारी व्यक्ती येतात.

हाय कॅलीबरची रायफल असणारा एक माणूस गुंगीतल्या हत्तींजवळ जातो आणि सगळ्यात समोर उभ्या असणाऱ्या मोठ्या हत्तीच्या बरोबर डोक्यात गोळी झाडतो.

काही मिनिटांच्या अवधीतच म्हाताऱ्या माद्या, पिल्लं होऊ शकतील अशा तरूण माद्या, तरूण हत्ती आणि पिल्लांचं ते संपूर्ण कुटुंबच ठार केलं जातं.

1970 आणि 80च्या दशकांमध्ये आफ्रिकेत हत्तींची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली की हजारो हत्तींची अशा प्रकारे सर्रास कत्तल केली जाई.

पर्यावरण व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी असं करणं गरजेचं असल्याचं काही संवर्धन तज्ज्ञांचं म्हणणं असलं तरी ही निष्ठूर हिंसा असल्याचं प्राणीप्रेमींचं म्हणणं आहे.

आक्रमक प्रजाती

ज्या प्राण्यांमुळे स्थानिक पर्यावरण संरचनेचा समतोल ढळण्याची भीती असते त्या प्राण्याची संख्या कमी करण्यासाठी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते.

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यामध्ये बर्मीज पायथन या मिश्र प्रजातीच्या अजगरांची विल्हेवाट लावण्यासाठी दरवर्षी शिकारीचं आयोजन केलं जातं.

या प्रकारचे साप तब्बल सात मीटर लांब वाढू शकतात आणि त्यांचं वजन 100 किलोंपेक्षा जास्त असतं. हे साप स्थानिक सस्तन प्राणी आणि पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू शकतात.

फ्लोरिडामधली स्थिती इतकी हाताबाहेर गेली होती, की तिथल्या अधिकाऱ्यांनी भारतामधून गारुड्यांना बोलावून घेतलं होतं.

इंग्लंडच्या नैऋत्येकडे असणाऱ्या लंडी बेटावर उंदरांची कत्तल करण्यात आल्यानंतर तिथल्या मँक्स शीअरवॉटर, पफिन्स आणि गिल्मॉटसारख्या पक्ष्यांची संख्या 15 वर्षांतच तिप्पटीने वाढली.

अशा प्रकारच्या कत्तली योग्य?

पण अनेकदा व्यवस्थित ठरवून केलेली कत्तलही चूकची ठरू शकते.

पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये 2014मध्ये शार्कची अशाप्रकारे कत्तल करण्यात आली. पण यामध्ये बरेचसे लहान शार्कच पकडले आणि अनेक इतर चुकीच्या प्रजातींचे शार्कही मारले गेले.

यावर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातल्या एका कोर्टाने असं जाहीर केलं की शिकारी माशांची कत्तल केल्याने शार्कचे हल्ले होण्याचं प्रमाण कमी होत नसल्याचे भरपूर पुरावे मिळाले असल्याने ग्रेट बॅरियर रीफमध्ये आता यापुढे अशाप्रकारची कत्तल मोहीम राबवता येणार नाही.

जे प्राणी माणसांवर हल्ला करतात हे सिद्ध झालं आहे अशा निवडक प्राण्यांची हत्या करण्याची पद्धत संपूर्ण आशिया आणि आफ्रिका खंडात आहे.

गेल्या वर्षी पश्चिम भारतातल्या महाराष्ट्रामध्ये एक नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं. या वाघिणीने 12 पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला होता आणि तिचे हल्ले थांबवण्यासाठी तिला ठार करणं हा एकच उपाय होता, असं वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पण या वन्यजीव प्रेमींनी या कृतीचा निषेध केला. ही शिकार थांबवण्यासाठी काहींनी कोर्टाकडेही धाव घेतली होती. पण एका शिकारी प्राण्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या गावकऱ्यांच्या आयुष्यांची या शहरी कार्यकर्त्यांना कल्पना नसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.

पण भारताच्या या राष्ट्रीय प्राण्याच्या संरक्षणासाठी गेली अनेक दशकं लढा देणाऱ्या व्याघ्र तज्ज्ञांनी वनखात्याच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. स्थानिक पाठिंबा कायम ठेवण्यासाठी ही कृती गरजेची असल्याचं त्यांनी म्हटलंय.

रोजीरोटी

बोट्सवानामध्ये शिकारीवरील बंदी उठवण्यात आली. मनुष्य आणि हत्ती यांच्यामधील संघर्ष आणि त्याचा लोकांच्या आयुष्य आणि रोजीरोटीवर होणार परिणाम याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

बोट्सवानामध्ये सुमारे 1,30,000 हत्ती असून त्यांच्यासाठी संरक्षित क्षेत्र आहे. पण यापैकी 27,000 हत्ती हे या संरक्षित क्षेत्राच्या बाहेर राहतात आणि त्यांचा मनुष्यवस्तीशी संपर्क येतो. हे हत्ती शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होतं.

हत्ती दररोज सुमारे 270 किलो अन्न खातात आणि ही खादाडी करताना ते झाडं पाडून, पिकं तुडवून भरपूर नासधुस करतात.

यासोबतच शिकारींचं नियमन केल्याने स्थानिकांनाही त्यातून उत्पन्न मिळत असल्याचं अनेक देशांचं म्हणणं आहे.

अर्तक्य पर्याय

पण वन्य जीवनाचं नियोजन करण्यासाठी शिकार हा पर्याय असू शकत नाही. डॉ. पॉला काहुम्बु या नैरोबी स्थित हत्ती अभ्यासक आहेत. एथिकल हंटिंग (नैतिकतेसाठीची शिकार) ही संकल्पनाच त्यांना पटत नाही. ''इतक्या देखण्या प्राण्याचं आयुष्य संपवण्यासाठी झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या आवाजाची मी कल्पनाही करू शकत नाही. मनुष्य - हत्ती वादातून निर्माण झालेले प्रश्न आपण सोडवणं गरजेचं आहे पण हत्तींना मारून टाकणं हे त्याचं उत्तर असू शकत नाही,''त्या म्हणतात.

पण बोट्सवानातील गाबोरोन इथे स्थित असणारे वन्यप्राण्याचे डॉक्टर आणि सल्लागार डॉ. एरिक वेरेयन यांचं मत याच्या अगदी उलट आहे.

''2014 मध्ये पुरशी चर्चा न करता शिकारीवर बंदी घालण्यात आली. स्थानिकांना यातून होणारा तोटा हा पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भरून काढायला मदत करणार असल्याचं सरकारने म्हटलं होतं. पर्यटकांची संख्या आणि त्यातून मिळणारं उत्पन्न वाढलं खरं, पण स्थानिकांना त्याचा फायदा मिळत नव्हता. दुसरीकडे मनुष्य आणि हत्ती यांच्यातल्या अडचणी वाढत होत्या.'' ते म्हणतात.

शूट टू किल

वन्य प्राण्याची बेकायदा शिकार थांबवण्यासाठी देशामध्ये 2013मध्ये शूट-टू-किल म्हणजेच कोणी माणूस शिकार करताना दिसला रे दिसला की त्यालाच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले.

पण यामुळे झांबिया आणि झिम्बाब्वेसारखे शेजारी देश नाराज झाले. कारण यामध्ये या देशांचे नागरिक वनरक्षकांकडून मारले गेले. शिवाय अनेक स्थानिक नागरिकही यात ठार झाले.

''बोट्सवानामधल्या जंगली मांसाचा व्यापार वाढल्याचा वर्ल्ड बँकेचा अहवाल आहे. कारण स्थानिकांनी अजूनही बेकायदेशीररित्या शिकार करणं थांबवलेलं नाही. संवर्धनासाठीची कोणतीही मोहीम ही स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही,'' डॉ. एरिक वेरेयन म्हणतात.

मधमाश्यांच्या पोळ्यांचं कुंपण

जास्तीच्या हत्तींना अंगोलासारख्या शेजारच्या देशांत जाता यावं यासाठी बोट्सवानाने आपली सीमा खुली करणं गरजेचं असल्याचं डॉ. काहुंबू यांचं मत आहे. हत्तींनी शेतात घुसखोरी करू नये यासाठी विजेच्या तारांचं कुंपण आणि मधमाश्यांची पोळी असणारं कुंपण उभारायला बोट्सवानाने सुरुवात करायला हवी असं त्यांना वाटतं.

''कत्तलीचा पर्याय दक्षिण आफ्रिकेत वापरून पाहण्यात आला. त्यांनी हजारो प्राण्यांची कत्तल केली पण त्याचा काही फायदा झाला नाही. तुम्ही जर हत्तींची कत्तल केली तर त्यातून खूप तणाव निर्माण होतो आणि परिणामी मनुष्य आणि प्राण्यांतला संघर्ष वाढतो. शिवाय कत्तलीमुळे उलट प्राण्यांचं प्रजनन जास्त वेगाने होतं.''

हो प्रिटोरिया विद्यापीठातील द कॉन्झर्व्हेशन इकॉलॉजी रिसर्च युनिटच्या मते हत्तीची मादी साधारणपणे 12 वर्षांची असताना पहिल्यांदा पिलू जन्माला घालते आणि 60 वर्षांच्या तिच्या आयुष्यात तिला 12 किंवा जास्त पिल्लं होतात.

संतती नियमन

लहान संरक्षित क्षेत्रांमध्ये असणाऱ्या हत्तींसाठीचा संतती नियमनाचा कार्यक्रम दक्षिण आफ्रिकेत यशस्वीरित्या राबवण्यात आला. हत्तींची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी काही हत्तींना दुसरीकडे हलवण्याचाही प्रयोग करण्यात आला. पहिला पर्याय वेळखाऊ आहे तर दुसरा महागडा आहे आणि त्यासाठी कुशल कामगार आणि पैसा लागतो. गुंगीच्या औषधाचा जास्त वापर किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जातानाच्या तणावामुळेही प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो.

त्यामुळे जास्तीच्या प्राण्यांना ठार मारण्याच्या पर्यायाकडे गरीब देशांमध्ये परवडणारा आणि लवकर लागू होणारा उपाय म्हणून पाहिलं जातं.

शिकारीसाठीचे परवाने स्थानिक जमातींना दिले जातात पण ते हे परवाने हौस आणि मिरवण्यासाठी शिकार करणाऱ्या श्रीमंत परदेशी लोकांना विकतात. एका पूर्ण वाढ झालेल्या हत्तीसाठी 55,000 डॉलर्स मिळू शकतात.

''शिकार कमी प्रमाणात पुन्हा सुरू केली तर त्यातून स्थानिक जमातींना आर्थिक मोबदला मिळेल आणि हत्तींमुळे निर्माण होत असलेल्या समस्याही काही प्रमाणात सुटतील,'' वेरेयन म्हणतात.

''शिकारीसाठीचे परवाने देताना बोट्सवानाने कधीही त्यांची 340 हत्तींची मर्यादा ओलांडली नाही. याशिवाय आणखी 200 ते 300 त्रास देणारे हत्ती स्थानिकांकडून मारले जातात. साधारणपणे 700 हत्तींचा बळी देऊन आम्हाला संवर्धनाच्या या कामाला चांगला पाठिंबा मिळवता येईल.''

महसूल निर्मिती

युगांडामधील वन अधिकाऱ्यांचंही हेच मत आहे.

''शिकार गरजेची आहे. यामुळे प्राण्यांची संख्या काबूत राहते. खासकरून शिकारी प्राण्यांची, '' युगांडा वनखात्याचे संपर्क प्रमुख बशीर हानगी म्हणतात.

युगांडामध्ये शिकार करण्यासाठी आधी शिकाऱ्याला वन खात्याच्या ट्रॅकर्ससोबत काम करून नेमक्या कोणत्या म्हाताऱ्या प्राण्यांची शिकार केली जाऊ शकते, ते ठरवावं लागतं.

"समोर येणाऱ्या कोणत्याही प्राण्याला शिकारी मारू शकत नाहीत."

या शिकारीतून मिळणारा एकूण महसुलापैकी 80 टक्के महसूल हा स्थानिकांना दिला जात असल्याचं ते सांगतात.

पण आफ्रिकेमधील बहुतेक जागी स्थानिकांना ट्रॉफी हंटिंग मधल्या उत्पन्नापैकी 3 टक्क्यांहूनही कमी रक्कम मिळत असल्याचं 2013मध्ये इकॉनॉमिस्ट एट लार्ज या जगभरातील तज्ज्ञ व्यक्तींच्या गटाने म्हटलं होतं.

अधिवासांचा नाश

आशियामध्येही अनेक ठिकाणी मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्षात वाढ झालेली पहायला मिळते. पण या हत्तींना मारून टाकणं हा यावरचा पर्याय असल्याचा विचार अजून तरी केला जात नाही. त्रास देणाऱ्या प्राण्यांना पुन्हा जंगलात पळवून लावण्यात येतं

"रहायच्या जागा नष्ट झाल्याने उपलब्ध अधिवासात हत्तींची गर्दी होते. त्यांना मारून टाकणं हा पर्याय असू शकत नाही," आशियाई हत्तींचा अभ्यास करणाऱ्या डॉ. संजीता पोखरेल म्हणतात.

"हत्ती हे समुदायात राहतात. कळपातला नेमका कोणता सदस्य मारला जातोय आणि त्या कळपातल्या हत्तींचं एकमेकांशी नातं काय आहे हे आपल्याला माहित नसतं." त्या म्हणतात.

बेकायदा शिकार

अधिवास नष्ट होण्याचं संकट प्राण्यांवर तर आहेच. पण बेकायदा शिकारींची टांगती तलवारही जगातल्या अनेक प्राण्यांच्या डोक्यावर आहे.

1930मध्ये आफ्रिकन हत्तींची संख्या 1 कोटी होती. ही संख्या घटून आता फक्त 4 लाख 30 हजार आहे.

वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडनुसार दरवर्षी हस्तीदंतासाठी 20,000 आफ्रिकन हत्तींची बेकायदा शिकार केली जाते. म्हणजे दर 25 मिनिटाला एक हत्ती ठार केला जातो.

सुवर्णमध्य शोधायला हवा

शिकार हा ब्रिटीशांचं जू असून रक्तपिपासू खेळ असल्याचं अनेकांना वाटतं. पण बोट्सवानासारखी जागा जिथे दर 18 लोकांमागे 1 हत्ती असं प्रमाण आहे, तिथे हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

''स्थानिक जमातींकडून केला जाणारा बंडखोर हिंसाचार आता दिसायला लागला आहे. सिंहांना विष देऊन मारलं जातं. सापळ्यांमध्ये अडकून अनेक प्राण्यांचा वेदनादायक मृत्यू होतो. बेकायदा शिकारीही वाढायला लागल्या आहेत," वेरेयन म्हणतात.

''बोट्सवाना सगळ्या पर्यायांचा विचार करत आहे. पण आम्हाला प्राणी आणि माणूस असं दोघांचंही भलं करत सुवर्णमध्य गाठायचा आहे. सध्याच्या परिस्थितीत प्राण्याला गोळ्या घालून मारणं हा मला जास्त मानवतावादी पर्याय वाटतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)