You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माळढोक महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात आणि राजस्थानमधूनही नष्ट होण्याच्या मार्गावर?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रातून माळढोक (ग्रेट इंडियन बस्टार्ड) जवळजवळ नामशेष झाल्यानंतर गुजरात आणि राजस्थानमधील माळढोकही वेगानं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असं वन्यजीव अभ्यासकांच म्हणणं आहे.
गवताळ प्रदेश कमी होणं, शिकारी प्राण्यांकडून भक्ष्यस्थानी पडणं, मानवी हस्तक्षेप या कारणांबरोबरच वीजेच्या तारांचाही मोठा धोका माळढोकाला असतो. गुजरात आणि राजस्थानमधील माळढोक विजेच्या उच्चप्रवाही तारांमुळे धोक्यात आले आहेत.
"जगभरात केवळ 150 माळढोक शिल्लक राहिले असावेत. थरच्या वाळवंटात 100 माळढोक पक्षी असून गुजरातमध्ये माळढोकांची संख्या 10 ते 25 यांच्या दरम्यान असावी," अशी माहिती द कार्बेट फाऊंडेशनचे संचालक आणि वन्यजीव अभ्यासक केदार गोरे यांनी दिली आहे.
द कार्बेट फाऊंडेशन ही संस्था वन्यजीव आणि पक्षांच्या संवर्धनासाठी काम करते. तसंच त्याचा अभ्यास सुद्धा करते.
विजेच्या तारांपासून माळढोकाला नक्की कसा धोका असतो?
माळढोक हा गवताळ प्रदेशात राहात असल्यामुळे उडतानाही त्याची नजर खाली गवताळ प्रदेशात असते. तसेच समोर पाहाण्याची त्याची दृष्टीही अत्यंत अल्प असते. त्यामुळे माळढोकांचे तारांना धडकून अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
जी. आर. मार्टिन आणि जे.एम. शॉ या तज्ज्ञांनी 2010 साली सादर केलेल्या शोधनिबंधामध्ये या पक्ष्यांना समोर पाहाता न आल्यामुळे होणाऱ्या अपघातांबद्दल लिहिलं आहे.
बस्टार्ड कुळातील पक्ष्यांना वीजवाहक तारांचा धोका जगभरात संभवत असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. दरवर्षी दक्षिण आफ्रिकेतील डेनहॅम्स बस्टार्ड प्रजातीचे 30 टक्के पक्षी विजेच्या तारांचा धक्का लागून मृत्युमुखी पडत असल्याचं ए. आर. जेनकिन्स यांनी केलेल्या अभ्यासात दिसून आलं.
त्याचप्रमाणे स्पेनमध्ये 8.5 कि.मी. लांबीच्या वीजवाहक तारांमुळे एका वर्षात ग्रेट बस्टार्ड प्रजातीचे 25 पक्षी मेल्याचे दिसून आले.
वाइल्डलाइफ इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं 80 किमी लांबीच्या वीजवाहक तारांचे वर्षभराच्या काळामध्ये 7 वेळा सर्वेक्षण केलं. यामध्ये तारांमुळे मृत्यू झालेल्या 30 प्रकारच्या प्रजातीच्या 289 पक्ष्यांची कलेवरं सापडली. त्यामध्ये माळढोकांचाही समावेश होता.
आता गुजरात आणि राजस्थानमधील माळढोकांच्या अधिवासातील या विजेच्या तारा जमिनीखालून न्याव्यात अशी मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांनी केली असून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला विनंती करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवली जात आहे.
"सिंहाप्रमाणे गुजरातच्या लोकांनी माळढोकासाठी प्रयत्न करून त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत", असं मत गुजरातमधील वन्यजीव अभ्यासक देवेश गढवी यांनी बीबीसी मराठीकडे व्यक्त केलं.
माळढोकाच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना द कार्बेट फाऊंडेशनचे संचालक आणि वन्यजीव अभ्यासक केदार गोरे म्हणतात, "सर्व प्रकारचा निधी आणि शास्त्रीय अभ्यास उपलब्ध असूनही माळढोकाला नामशेष होण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही ही भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर शरमेची बाब आहे.
दुर्देवाने माळढोकाला राजकारणी, धोरण आखणाऱ्या व्यक्ती, कार्पोरेट क्षेत्र आणि सामान्य लोकांची यापूर्वी फारशी मदत झाली नाही. भरपूर अधिवास, उडण्यासाठी सुरक्षित जागा, विषमुक्त अन्न उपलब्ध करून दिल्यास माळढोकांची संख्या वाढू शकेल".
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात ढोलियामध्ये वन्यप्राण्यांसाठी कार्यरत असणारे राधेश्याम पेमानी बिश्णोई यांनी गेल्या काही वर्षांमध्ये माळढोकांच्या मृत्यूची नोंद केली आहे.
त्याबद्दल ते बीबीसी मराठीला सांगतात, "मी या वर्षभरामध्ये 5 माळढोक पक्षी मेलेले पाहिले. आमच्या जैसलमेर जिल्ह्यात वर्षभरात 6 ते 7 माळढोक मेले असण्याची शक्यता आहे. वीजेच्या तारांना थडकून मेलेल्या माळढोकाची कलेवरं सापडली आहेत.
आमच्या गावाजवळ माळढोक दिसत असूनही स्थानिक लोकांनाही या पक्ष्याची फारशी माहिती नाही. या अज्ञानामुळे माळढोक संवर्धनात अडथळे येत आहेत.
आम्ही स्थानिक लोकांना समजावून माळढोकाच्या अधिवासावर अतिक्रमण होणार नाही याचे प्रयत्न करत आहोत. वीजेच्या तारांबरोबर भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणं किंवा त्यांचं स्थलांतर करणं गरजेचं आहे."
कच्छमधील माळढोकांच्या स्थितीबद्दल कच्छ पश्चिम विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक तुषार पटेल यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
ते म्हणाले, "2017 साली विजेच्या तारांना थडकून एक पक्षी मेल्यानंतर राज्य सरकारने एक राज्यस्तरिय समितीची स्थापना केली. या समितीने पाहाणी करून वीजवाहक तारा जमिनीखालून नेण्याचा उपाय सुचवला होता. त्यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे.
त्यावर कार्यवाही झाल्यास माळढोकांची संख्या 50 ते 60 टक्क्यांनी वाढू शकते. माळढोक मादी वर्षातून एकदाच अंडे देते. त्यामुळे त्यांची संख्या वाढण्यावर मर्यादा येते. त्याचप्रमाणे शिकारी प्राण्यांकडूनही त्यांना धोका असतो."
राजस्थानचा राज्यपक्षी
माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी आहे. या पक्ष्याला राजस्थानमध्ये गोडावण असं म्हटलं जातं. माळढोक गवताळ प्रदेशातील टोळ, किडे, ज्वारी, बाजरी खातात.
राजस्थानच्या राष्ट्रीय मरु उद्यान (डेझर्ट नॅशनल पार्क)मध्ये माळढोक आढळतात. हे राष्ट्रीय उद्यान जैसलमेर आणि बाडमेर जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)