You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनचा चहावरील एकाधिकार भारतात असा समाप्त झाला
- Author, जफर सैय्यद
- Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद
धिप्पाड अंगकाठीच्या रॉबर्ट फॉर्च्यूनच्या डोक्यावरून जेव्हा एकाने वस्तरा फिरवून त्यांचं मुंडण करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागली.
एकतर त्या वस्तऱ्याला धार नव्हती किंवा तो माणूसच शिकाऊ असावा, कारण त्या क्षणी फॉर्च्यून यांना वाटत होतं की "जणू काही तो माझं मुंडण करत नाहीए, तर डोकं तासतोय."
1848 साली चीनच्या शांघाय शहराजवळ घडलेली ही घटना. फॉर्च्यून हे ईस्ट इंडिया कंपनीचे गुप्तहेर होते. चीनच्या आतल्या प्रदेशात जाऊन तिथे चहाची पानं चोरण्याच्या मोहिमेवर जाण्याचं काम त्यांच्यावर आलं होतं.
मात्र या कामासाठी त्यांना सर्वांत आधी वेश बदलायचा होता. त्यासाठीची पहिली अट म्हणजे चिनी परंपरेप्रमाणे डोक्याचा समोरच्या भागाचं मुंडण करायचं. यानंतर फॉर्च्यून यांच्या डोक्याला एक शेंडी जोडण्यात आली. त्यानंतर त्यांना चिनी पेहराव घालण्यात आला. तसंच त्यांना त्यांचं तोंड बंद ठेवण्याची ताकीदही देण्यात आली होती.
मात्र आणखी एक अडचण होती. फॉर्च्यून यांची उंची सामान्य चीनी व्यक्तीपेक्षा जवळपास फूटभर जास्त होती. त्यावरही एक उपाय काढण्यात आला. "फॉर्च्यून चीनच्या भिंतीच्या पलीकडून आलेले आहेत आणि तिथल्या माणसांची उंची जास्त असते", असं त्यांनी चिनी लोकांना सांगायचं ठरलं.
हे काम खूप धोक्याचं होतं. ते पकडले गेले तर शिक्षा एकच - मृत्युदंड. कारण चहाची शेती हे चीनचं गुपित होतं आणि तिथले राजे शतकानुशतके हे गुपित लपवण्याचा प्रयत्न करत आले होते.
फॉर्च्यून यशस्वी झाले तर चहावर चीनचा हजारो वर्षांपासून असलेला एकाधिकार समाप्त होईल आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी भारतात चहाची शेती करून जगभर तो चहा निर्यात करेल असं नियोजन होतं.
रोज तब्बल दोन अब्ज पेले चहा!
एका संशोधनानुसार पाण्यानंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचं पेय म्हणजे चहा आहे. जगभरात जवळपास दोन अब्ज लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात.
मात्र हे पेय आपल्यापर्यंत कसं पोहोचलं, याचा विचार क्वचितच कुणी करत असेल.
चहाची ही कहाणी एखाद्या रहस्य कथेपेक्षा कमी नाही. ही अशी कथा आहे, ज्यात हेरगिरीचा रोमांच आहे, सुदैवी क्षण आहेत आणि दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.
हवेत उडणारी पानं
चहाची सुरुवात कशी झाली, याबद्दलच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात. त्यातल्याच एका कथेनुसार प्रसिद्ध चिनी बादशाह शिनूंग यांनी स्वच्छतेच्या हेतूनं तमाम जनतेला पाणी उकळून पिण्याचा आदेश दिला.
एक दिवस जंगलात बादशाहसाठी पाणी उकळणं सुरू असताना काही पानं हवेने उडून त्या उकळत्या पाण्यात पडली. शिनूंग ते पाणी प्यायले तेव्हा त्यांना त्या पाण्याची चव तर आवडलीच, शिवाय ते पाणी प्यायलानंतर त्यांच्या शरीरात स्फूर्तीही आली.
ती चहाची पानं होती. ते पाणी प्यायल्यानंतर बादशाहने जनतेलाही चहाच्या पानांचा वापर करून बघण्यास सांगितले. त्यानंतर हे पेय चीनच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं.
पोर्तुगिजांनी चहाचा व्यापार सुरू केला तेव्हा म्हणजे 16व्या शतकात युरोपला सर्वांत आधी चहाची ओळख झाली. एका शतकाच्या आत चहा जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचला. मात्र इंग्रजांना चहा इतका आवडला की तिथे घरा-घरात चहाचा घमघमाट येऊ लागला.
ईस्ट इंडिया कंपनीवर पश्चिमेसाठी लागणाऱ्या प्रत्येक सामानाच्या व्यापाराची जबाबदारी होती. त्यांना चीनकडून महागड्या दरात चहा विकत घ्यावा लागायचा आणि तिथून मोठा सागरी प्रवास करून जगभर पोहोचवला जायचा. मात्र त्यामुळे चहाचे दर खूप वाढायचे.
म्हणून आपण स्वतःच भारतात चहाची शेती करावी, असं इंग्रजांना वाटू लागलं.
यातला सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे चहाचं झाडं कसं उगवायचं आणि त्यापासून चहा कसा मिळवायचा. याविषयी कुणालाच माहिती नव्हती. हेच गुपित जाणून घेण्यासाठी कंपनीने रॉबर्ट फॉर्च्यून यांना चीनमध्ये पाठवलं.
या कामासाठी त्यांना चीनमधल्या त्या भागांमध्ये जायचं होतं, जिथे कदाचित मार्को पोलोनंतर कुठल्याच युरोपीय नागरिकाने पाय ठेवला नव्हता.
फोजियान प्रांतातल्या डोंगरांमध्ये सर्वांत उत्कृष्ट काळा चहा पिकवला जातो, असं त्यांना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या एका साथीदाराला तिथे जायला सांगितलं.
फॉर्च्यून यांनी मुंडण केलं, खोटी शेंडी ठेवली आणि चीनी व्यापाऱ्यांसारखा पेहरावही केलाच. मात्र स्वतःचं एक चीनी नावही ठेवलं - सिंग हुवा.
फॉर्च्यून यांनी उत्तम चहाची रोपं आणि त्याचं बियाणं, याव्यतिरिक्त भारतात शेती करता येईल, असा चहा आणि तो पिकवण्याचं तंत्र शिकून यावं, असे आदेश ईस्ट इंडिया कंपनीने दिले होते. या कामासाठी त्यांना वर्षाला पाचशे पौंड मिळायचे.
मात्र फॉर्च्यून यांचं काम सोपं नव्हतं. त्यांना चहाची शेती कशी करायची, याचं तंत्र तर शिकायचं होतंच. शिवाय तिथून चांगल्या दर्जाच्या चहाची रोपं चोरायची देखील होती.
फॉर्च्यून अनुभवी होते. चहाच्या वेगवेगळ्या जाती बघून थोडीथोडकी नाही तर भरपूर रोपं न्यावी लागतील, याची कल्पना त्यांना लगेच आली. भारतात मोठ्या प्रमाणावर चहाची शेती करण्यासाठी रोपं आणि बियाणं यांची तस्करी करावी लागणार होती. एवढंच नाही तर भारतात चहा पिकवण्यासाठी त्यांना चीनी मजुरांचीही गरज होती.
या काळात त्यांना स्वतःलाच चहाची रोपं लावण्याचा ऋतू, पिक घेणं, पानं सुकवण्याच्या पद्धती अशा गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. साधा चहा नव्हे तर उत्तम दर्जाचा चहा मिळवणं, हा फॉर्च्यून यांचा उद्देश होता.
अखेर अनेक होड्या, पालख्या, घोडे आणि खडतर मार्ग ओलांडत फॉर्च्यून तीन महिन्यांनंतर एका चहाच्या कारखान्यात पोहोचले. पूर्वी काळा चहा आणि हिरवा चहा दोन वेगवेगळ्या झाडांपासून मिळतो, असा युरोपमध्ये समज होता. मात्र दोन्ही प्रकारचा चहा एकाच झाडापासून मिळवतात, हे बघून फॉर्च्यून आश्चर्यचकित झाले.
फॉर्च्यून यांनी तिथे चहा बनवण्याच्या प्रत्येक पद्धतीवर गप्प बसून काम केलं. त्यांना जे समजलं नाही ते आपल्या साथीदाराला विचारायचे.
'चुकी'ने दाखवला नवा मार्ग
फॉर्च्यून यांच्या मेहनतीचं चीज झालं आणि राजाची नजर चुकवून काही रोपं, बियाणं आणि मजूर भारतात नेण्यात ते यशस्वी झाले. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममधल्या डोंगररांगांमध्ये चहाचे मळे फुलवायला सुरुवात केली.
मात्र इथे एक चूक झाली. जी रोपं त्यांनी चीनमधून आणली होती त्यांना चीनमधल्या थंड हवामानाची सवय होती. आसाममधलं उष्ण हवामान त्यांना मानवलं नाही आणि हळूहळू ती सुकू लागली.
सर्व प्रयत्न वाया जाणार एवढ्यात एक विचित्र योगायोग घडला. याला ईस्ट इंडिया कंपनीचं भाग्य म्हणा किंवा चीनचं दुर्भाग्य. मात्र त्याचदरम्यान आसाममध्ये उगवणाऱ्या एका झाडाचं प्रकरण समोर आलं.
हे झाड रॉबर्ट ब्रास नावाच्या स्कॉटिश व्यक्तीने 1823 साली शोधलं होतं. चहाशी साधर्म्य असलेलं हे रोप आसाममध्ये जंगली वनस्पतीप्रमाणे उगवायचं. मात्र यापासून तयार होणारं पेय चहापेक्षा कमी प्रतिचं होतं, असं तज्ज्ञांना वाटायचं.
फॉर्च्यूनच्या रोपांना आलेल्या अपयशानंतर कंपनीने आपला मोर्चा या नव्या रोपाकडे वळवला. संशोधनाअंती फॉर्च्यून यांच्या लक्षात आलं की हे झाड आणि चीनमधल्या चहाच्या झाडांमध्ये बरंच साम्य आहे.
चीनमधून तस्करी करून आणण्यात आलेली रोपं आणि तंत्र आता यशस्वी झाले. त्या विशिष्ट पद्धतीने पीक घेतल्यानंतर लोकांना हा नवा चहा खूप आवडला. आणि अशा प्रकारे कॉर्पोरेट जगतात इतिहासातली बौद्धिक मालमत्तेची सर्वांत मोठी चोरी अपयशी ठरता ठरता यशस्वी झाली.
स्वदेशी चहाच्या यशानंतर कंपनीने आसाममधला मोठा भूभाग भारतीय रोपांच्या पिकासाठी आरक्षित केला आणि व्यापाराला सुरुवात केली. अल्पावधीतच इथल्या उत्पादनाने चीनलाही मागे टाकलं.
निर्यात घटल्याने चीनमधले चहाचे मळे सुकू लागले आणि चहासाठी प्रसिद्ध असणारा देश आता एका कोपऱ्यात ढकलला गेला.
इंग्रजांनी चहा बनवण्याच्या प्रक्रियेत एक नवी सुरुवात केली. चीनमध्ये तर हजारो वर्षांपासून उकळत्या पाण्यात चहाची पानं टाकून चहा बनवला जाई. इंग्रजांनी यात साखर आणि नंतर दूध टाकायला सुरुवात केली.
खरंतर आजही चहामध्ये दुसरा एखादा पदार्थ टाकणं, चीनच्या लोकांना विचित्र वाटतं. इकडे भारतात लोकांनी इंग्रजांच्या इतर अनेक सवयींप्रमाणेच चहाही आपलासा केला आणि घराघरात साखर, दूध टाकून केलेला फक्कड चहा बनू लागला.
अमेरिकी क्रांतीमध्ये भारताची भूमिका
चहाच्या कथेत भारताच्या भूमिकेचा एक पुरावा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985 साली अमेरिका दौऱ्यावेळी सादर केला. काँग्रेसच्या संयुक्त संमेलनाला संबोधित करताना ते म्हणाले, भारतात पिकणाऱ्या चहाने अमेरिकी जनतेच्या ब्रिटनपासून मुक्त होण्याच्या इच्छाशक्तीला हवा दिली होती.
त्यांचा इशारा 1773 सालाकडे होता. त्याकाळी ईस्ट इंडिया कंपनी अमेरिकेत चहाचा व्यापार करायची, मात्र कर भरायची नाही. अखेर एक दिवस संतापून काही अमेरिकी नागरिकांनी बोस्टनच्या बंदरात उभ्या असलेल्या कंपनीच्या बोटींवरच्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या.
ब्रिटन सरकारने याचं सडेतोड उत्तर दिलं. त्यामुळे अमेरिकी नागरिकांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आणि पुढच्या तीन वर्षांत अमेरिका स्वतंत्र झाला.
पण यात राजीव गांधी यांचा एक गैरसमज झाला होता. खरंतर त्याकाळी ईस्ट इंडिया कंपनी चीनकडून चहा घेऊन तो अमेरिकेला विकायची. आणि भारतात चहाची शेती अठराव्या शतकात सुरू झाली नव्हती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)