इजिप्तमध्ये सापडलं 3200 वर्षांपूर्वीचं चीज

प्राचीन इजिप्शियन कबरीचं उत्खनन करत असताना पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडलेला पदार्थ चीज आहे असं जाहीर करण्यात आलं आहे. हे चीज जगातलं सर्वांत पुरातन चीज असावं असं तज्ज्ञ म्हणत आहेत.

काही वर्षांपूर्वी उत्खनन करत असताना टोंब ऑफ टॅहम्समध्ये एक फुटलेली बरणी सापडली होती. या बरणीत पांढऱ्या रंगाचा पदार्थ गोठलेल्या अवस्थेत सापडला होता.

हा पदार्थ खाण्याचाच पदार्थ असावा अशी शक्यता त्यावेळी वाटली होती. आता त्या पदार्थाचा अभ्यास पूर्ण झाला असून हा पदार्थ चीज होता असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हे चीज किमान 3200 वर्षांपूर्वीचं असावं असं त्यांनी म्हटलं आहे.

हा महत्त्वपूर्ण शोध असल्याचं म्हटलं जात आहे. कारण इजिप्तमध्ये चीजचं उत्पादन होत असावं याबद्दल काहीच माहिती उजाडात आली नव्हती. त्यामुळे हे संशोधन महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. हे संशोधन जर्नल ऑफ अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

आम्ही ज्या पदार्थाचा अभ्यास केला तो पदार्थ चीज आहे. कदाचित हे जगातलं सर्वांत पुरातन चीज असावं, असं डॉ. एनरिको ग्रेको यांनी म्हटलं. ग्रेको हे कॅटनिया विद्यापीठाशी संलग्न आहेत. या प्रकल्पात त्यांना कैरो विद्यापीठाच्या संशोधकांचं साहाय्य मिळालं आहे.

हे चीज बकरीच्या किंवा मेंढीच्या दुधापासून तयार करण्यात आलेलं असावं पण त्याचा फ्लेवर कसा होता हे अद्याप आम्हाला समजलं नाही. प्राचीन काळातलं, 'इजिप्शिएन चीज हे खूप खूप आंबट' असावं असं चीज हिस्टोरियन पॉल किंडस्टेड यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं.

या चीजमध्ये बॅक्टेरियाचे अवशेष सापडले आहेत. जर अनपाश्चराइज (निर्जंतुकीकरण न केलेलं) पदार्थ खाल्ल्यानंतर ब्रुसेलॉसिस हा रोग होऊ शकतो. हे बॅक्टेरिया ब्रुसेलॉसिसला कारणीभूत ठरू शकतात. ताप येणं, घाम येणं आणि अंगदुखी ही या आजाराची लक्षणं आहेत. हा आजार अजूनही अस्तित्वात आहे.

प्राचीन इजिप्शिएन शहर मेमफीसचे महापौर टेहम यांच्या कबरीत हे चीज सापडलं होतं.

कैरोजवळच्या सक्कारा भागात ही कबर आहे. 1885 साली पहिल्यांदा या जागेचा शोध लागला होता. नंतर ही जागा वाळूखाली दबली गेली होती. त्यानंतर 2010ला पुन्हा या जागेची माहिती जगासमोर आली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)