You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसची लागण अंडं किंवा चिकन खाल्ल्याने होते का?
कोरोना व्हायरसने इतर देशांसारखीच भारतातही प्रवेश केला आहे.
याबाबत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, "आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची 28 प्रकरणं समोर आली आहेत." ही प्रकरणं तेलंगण, जयपूर आणि दिल्लीत समोर आली आहेत. त्यांच्यावर सध्या देखरेख ठेवण्यात येत आहे.
जगभरात कोरोना व्हायरसमुळे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका चीनला बसला आहे.
भारतात सरकारने अनेक खबरदारीचे उपाय योजले आहेत. मात्र सामान्य लोकांमध्ये कोरोना व्हायरसबद्दल अनेक प्रश्न आहेत.
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजन शर्मा यांच्याशी बातचीत केली.
राजन शर्मा काय म्हणतात?
- कोरोना व्हायरस मुख्यत: स्पर्शाने पसरतो.
- कोरोना व्हायरसची लागण झाली आहे हे लक्षात येताच रुग्णांना छोट्या छोट्या गटात वेगळं ठेवलं जातं.
- कोरोना व्हायरसची लागण साधारणपणे लहान मुलांना होत नाही.
- ज्या व्यक्तींचं वय 58 पेक्षा जास्त आहे त्यांच्यावर या रोगाचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो.
- गाव- खेड्यात या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता कमी आहे. शहरात मध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोनाची लागण झाली असं नाही.
- वातावरण बदलताच कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवता येतं.
- कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर तातडीने कोणत्याही उपाययोजना करता येत नाही. रोगाची लक्षणं दिसताय डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- चिकन खाल्ल्याने या व्हायरसचा संसर्ग नाही. भारतात ज्या पद्धतीने स्वयंपाक केला जातो त्यावरुन कोणतेच व्हायरस त्यानंतर जगतच नाहीत. चिकन किंवा अंडी खाल्ली तर काहीही अडचण नाही.
- उन्हाळा आल्यावर कोरोना व्हायरसची तीव्रता कमी होईल. तापमान वाढल्याबरोबर कोरोना व्हायरसचा परिणाम कमी होतो.
- सरकारने कोरोना व्हायरस बाधित लोकांसाठी विशिष्ट केंद्रं तयार केली आहेत. लक्षण दिसल्यावर तिथे दाखवावं.
- भारतात इतके धार्मिक मेळावे आयोजित केले जातात, तिथे बरीच गर्दी होते, मात्र तिथे कुणालाही व्हायरसची लागण होत नाही.
- कोरोनापासून बचाव करायचा असेल तर थ्री लेयर्ड मास्कची गरज असते. दुसरा मास्क N-51 असतो. सामान्य लोकांनी साधारण सर्जिकल मास्क घातला तरी सोयीचं आहे.
कोरोना व्हायरसपासून बचाव कसा कराल?
3 मार्चला कोरोना व्हायरसमुळे नोएडाच्या दोन शाळा बंद केल्याची बातमी प्रसारमाध्यमात आल्या होत्या. त्यामुळे कोरोना व्हायरसचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवरही होऊ शकतो हे आता स्पष्ट झालं आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी काय करता येईल?
याविषयी बीबीसी प्रतिनिधी गुरुप्रीत सैनी यांनी नोएडाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनुराग भार्गव यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणतात,
- काही शाळांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. कारण एका शाळेत पाच मुलं कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आले होते.
- पाच मुलांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
- कोरोना व्हायरस सात किंवा आठ तासात नष्ट होतो.
- कोरोना व्हायरस पसरु नये यासाठी शाळांची सफाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
- सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यात अडथळा ही या रोगाची मुख्य लक्षणं आहेत.
- कोरोना व्हायरसचा मुलांवर फारसा प्रभाव पडत नाही. जर एखाद्या व्यक्तीत ती लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरकडे जावं.
- स्वच्छतेची काळजी घ्या. नखं कापलेली हवीत. ज्या लोकांना खोकला झाला आहे त्यांच्यापासून दूर रहावं.
- कोरोना व्हायरसवर कोणताही उपाय नाही. दक्षता हाच त्यावरचा उपाय आहे. गर्दीत जाणं टाळा. जर गेलात तर मास्क लावून फिरा.
- लोकांनी घाबरण्याची गरज नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)