You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना विषाणू पसरल्याबद्दल धार्मिक पंथाच्या प्रमुखांनी का मागितली माफी?
दक्षिण कोरियात कोरोना व्हायरस पसरल्याबद्दल एका चर्चप्रमुखानं माफी मागितलीय. ली मान-बी असं चर्चप्रमुखाचं नाव आहे.
ली मान-बी हे शिन्चाँन्जी चर्च ऑफ जीसस (Shincheonji Church of Jesus) या धार्मिक पंथाचे प्रमुख आहेत. ते आता 88 वर्षांचे आहेत.
दक्षिण कोरियातल्या 4000 रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे या पंथाचे सदस्य आहेत. त्यामुळं ली मान-बी यांनी भर पत्रकार परिषदेत माफी मागितली.
चीननंतर कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियात आढळलेत.
दक्षिण कोरियात कोरोना व्हायरसची 476 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली असून आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या आता 4212 वर गेलीय. तर मृतांची संख्या 26 वर गेलीय.
ली मान-बी यांच्यावर निष्काळजीपणाचे आरोप लावता येतील का, याविषयीचा तपास करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
"हे जाणूनबुजून करण्यात आलं नसलं तरी अनेकांना याची लागण झाली आहे. आम्ही आमच्यापरीने सर्व प्रयत्न केले पण आम्हाला हे रोखणं जमलं नाही," असं ली मान-बी यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरसची लागण झालेले 3081 रुग्ण हे डिगू (Daegu) शहरातले आहेत आणि इथेच जवळ असणाऱ्या शिन्चाँन्जी चर्चशी यापैकी 73% रुग्ण संबंधित आहेत.
दक्षिण कोरियाची राजधानी सोल (Seoul) मधल्या एक कोटी नागरिकांनी घरुन काम करावं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन शहराच्या महापौरांनी केलंय.
शिन्चाँन्जी चर्च चर्चेत का?
ख्रिश्चन धर्मातील या पंथाच्या लोकांना एकमेकांपासून या विषाणूची लागण झाली आणि त्यानंतर निदान होण्यापूर्वी त्यांनी देशभरात प्रवास केल्याचं म्हटलं जातंय.
शिवाय या पंथातल्या लोकांनी आपल्या संसर्ग झालेल्या सदस्यांची नावं गुप्त ठेवल्याने कोव्हिड 19चा माग काढणं कठीण झाल्याचं सांगण्यात येतंय.
पण आपण सदस्य, विद्यार्थी आणि इमारतींची यादी अधिकाऱ्यांना दिली होती असं चर्चचे प्रवक्ते किम शिन-चांग यांनी बीबीसीला सांगितलं.
"आमच्या सदस्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याने आम्ही ही माहिती जाहीर करायला घाबरत होतो," किम यांनी सांगितलं.
आपण येशू ख्रिस्तांना पुर्नजन्म असल्याचा ली यांचा दावा आहे. बायबलमध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते 1,44,000 लोक सोबत घेऊन स्वर्गात जाणारे 'Promised Pastor' आपण असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
शिन्चाँन्जी चर्चला दक्षिण कोरियात आणि ख्रिश्चन धर्मातही 'कल्ट' (Cult) वा वेगळा पंथ मानलं जातं. परिणामी या गटावर अनेकदा टीका केली जाते, वा त्यांना वेगळी वागणूक मिळते, वा त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो असं किम यांनी बीबीसीला सांगितलं.
जागतिक परिस्थिती
कोरोना व्हायरसमुळे जगभरामध्ये 3000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय. चीनमध्ये आणखी 42 जणांचा बळी गेलेला आहे.
गेल्या वर्षी चीनमधल्या ज्या हुबेई प्रांतातून कोरोना व्हायरसला सुरुवात झाली, तिथेच 90%पे क्षा जास्त मृत्यू झालेले आहेत.
इतर 10 देशांमध्येही या व्हायरसमुळे मृत्यू झाले असून इराणमध्ये 50पेक्षा जास्त तर इटलीमध्ये 30 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय.
जगभरामध्ये 90,000 पेक्षा जास्त केसेसची खात्री पटली असून चीनमधल्या रुग्णांपेक्षा आता चीनबाहेरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
इटलीमध्ये गेल्या 48 तासांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या दुप्पट झाली असल्याची माहिती देशाच्या नागरी सुरक्षा विभागाने रविवारी सांगितलं.
आतापर्यंत इटलीमध्ये 1,694 जणांना प्रादुर्भाव झाला असून किमान 34 बळी गेलेले आहेत.
इटलीमधल्या आपल्या दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला असून त्यांना एकांतात ठेवण्यात आल्याचं अॅमेझॉनने म्हटलंय.
याशिवाय कतार, इक्वडोर, लक्झेम्बर्ग आणि आयर्लंडमध्ये रविवारी कोव्हिड - 19चा पहिला रुग्ण आढळला. तर सोमवारी इंडोनेशियातही पहिल्या रुग्णाची नोंद झाली.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातही पहिला रुग्ण आढळलेला आहे. तिशीतल्या या रुग्ण महिलेला ती नुकतीच इराणला गेलेली असताना या विषाणूचा संसर्ग झाला.
अमेरिकेत आतापर्यंत दोघांचा यामुळे मृत्यू झाला असून वॉशिंग्टन राज्यात दोन्ही बळी गेलेयत.
चीनमधली परिस्थिती
सोमवारी चीनमध्ये 42 रुग्ण मृत्यू पावले. हे सगळे हुबेई प्रांतात आहेत.
याशिवाय 202 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले असून यापैकी फक्त 6 हुबेईच्या बाहेर आहेत.
चीनमध्ये आतापर्यंत 2,912 जणांचा मृत्यू झाला असून 80,000 पेक्षा जास्त लोकांना याची लागण झालीय.
कारखान्यांमधलं कामकाज झपाटयाने कमी झाल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे.
विषाणू संसर्गाची तपासणी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना भोसकून मारल्याबद्दल सोमवारी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा चीनी कोर्टाने दिल्याचं वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिलंय.
WHOचं म्हणणं
या विषाणूचा प्रादुर्भाव आधीपासून आजारी असणाऱ्या आणि 60पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना जास्त होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं रविवारी म्हटलं.
'कोव्हिड 19 चा गंभीर प्रादुर्भाव झालेल्या लोकांसाठी ऑक्सिजन थेरपी अतिशय महत्त्वाची ठरत असल्याने' देशांनी व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवावी असं आवाहन WHOने केलंय.
चीनमधल्या 44,000 प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर यामध्ये वयोवृद्धांचा बळी जाण्याचं प्रमाण मध्यमवयीन रुग्णांपेक्षा 10 पट जास्त असल्याचं आढळलं होतं.
पण बहुतेकांमध्ये या रोगाची सौम्य लक्षणं आढळत असून मृत्यूदर 2 ते 5% असल्याचं WHOने म्हटलंय.
याच्यातुलनेत फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 0.1% असलं तरी या याचा संसर्ग जास्त असतो. दरवर्षी साधारण 4,00,000 लोकांचा यामुळे मृत्यू होतोय.
कोरोना व्हायरसचेच इतर प्रकार - सिव्हिअर अक्यूट रेस्परेटरी सिंड्रोम (SARS), मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही कोव्हिड-19पेक्षा जास्त आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)