कोरोना व्हायरसची अमेरिकेत दहशत; एकाचा मृत्यू

कोरोना विषाणूचा संसर्ग अमेरिकेतही पोहोचला असून, इथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होऊन जीव गमावलेल्या व्यक्तीचं वय 50 हून अधिक असून, त्यांना आधीही आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासलं होतं.

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची आणखी काही प्रकरणं समोर येऊ शकतात असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. अमेरिका कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या मते इराणहून जाण्यायेण्यावर प्रतिबंध कठोर करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या नागरिकांनी इटली तसंच दक्षिण कोरियात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 57 देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झाली असून, 85,000 प्रकरणं समोर आली आहेत. कोरोना विषाणूंमुळे 3000 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही प्रचंड आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या विषाणूबाबत पहिल्यांदा कळलं होतं.

अमेरिकेत काय होतंय?

वॉशिंग्टनच्या किंग्स काऊंटीमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचं स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूचा धोका असलेल्या कोणत्याही ठिकाणी गेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

वॉशिंग्टनचे गव्हर्नर इनस्ली यांनी राज्यातली वाढती कोरोना प्रकरणं लक्षात घेऊन आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

कॅलिफोर्नियास ऑरेगॉन आणि वॉशिंग्टन या ठिकाणी कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची प्रकरणं वाढत आहेत. ही माणसं कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रात गेलेली नाहीत किंवा तिथलं कोणी या भागात आलेलं नाही.

स्थानिक नर्सिंग होममध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या आरोपांमधील सत्यासत्यतेची पडताळणी करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

27 सर्वसामान्य माणसं आणि किर्कलँड लाईफ केयर सेंटरच्या 25 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं आढळल्याचं किंग काऊंटीचे आरोग्य अधिकारी डॉ. जेफ्रे डचिन यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अमेरिकेत कोरोनाचे 62 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.

चीनमधील वुहान शहरात अमेरिकेच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने घाबरून जाण्याचं कारण नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

अमेरिका या आजाराचा सामना करण्यासाठी तयार आहे. कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही.

निरोगी माणसांना या विषाणूची लागण झाली तर ते बरे होण्याची शक्यता जास्त असते.

इराणहून येण्यावर आणि जाण्यावर कडक प्रतिबंध घालण्यात आल्याची घोषणा माईक पेंस यांनी सांगितलं.

कारण चीननंतर कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग इराणमध्ये झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)