You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या कबुतरामध्ये असं विशेष काय आहे की याची किंमत 14 कोटी रुपये आहे?
स्पर्धेत 'शर्यती'साठी वापरण्यात येणाऱ्या बेल्जियमच्या एका कबुतराची विक्री तब्बल 1.6 दशलक्ष युरो म्हणजे, 19 लाख डॉलर्सना करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या या मादी कबुतराचं नाव 'न्यू किम' आहे.
या कबुतराची लिलावात किंमत 200 डॉलर्स निश्चित करण्यात आली होती. मात्र, चीनच्या एका व्यक्तीने रविवारी या कबुतराला 1.6 दशलक्ष युरो म्हणजे, 19 लाख डॉलर्सना विकत घेतलं.
भारतीय रुपयांत याची किंमत तब्बल 14 कोटी 15 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार, या कबुतराचे मालक कुर्त वाउवर यांनी सांगितलं की, ही बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
याआधी, चार वर्ष वयाच्या एका कबुतराची विक्री 14 लाख डॉलर्सना करण्यात आली होती.
रेसिंग चॅम्पियन कबुतर
अरमांडो नावाच्या रेसिंग चॅम्पियन कबुतराला, कबुतरांचा 'लुईस हॅमिल्टन' असं म्हंटलं जातं. 'लुईस हॅमिल्टन' फॉर्म्युला-1 चा चॅम्पियन आहे. निवृत्त झाल्यानंतर 2019 मध्ये त्याची विक्री करण्यात आली होती.
दरम्यान, 'न्यू किम' ने 2018 साली अनेक शर्यती जिंकल्या होत्या. ज्यात 'नॅशनल मिडल डिस्टंस' शर्यतही होती. त्यानंतर 'न्यू किम' देखील निवृत्त झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये कबुतरांच्या शर्यती फार लोकप्रिय झाल्या आहेत. 'न्यू किम' ला विकत घेण्यासाठी चीनच्या दोन व्यक्तींनी लिलावात मोठी बोली लावली होती.
रेसिंग म्हणजेच शर्यतीसाठी वापरण्यात येणारे कबुतर 10 वर्षाचे होईपर्यंत प्रजनन करू शकतात. 'न्यू किम' चा वापर त्याचे नवीन मालक प्रजननासाठी करण्याची शक्यता आहे.
मात्र लिलाव करणाऱ्यांच्या माहितीनुसार, मोठी बोली लावल्यामुळे लिलाव असामान्य झाला आहे.
लिलाव करणारी संस्था पीपीचे सीईओ निकोलस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कबुतरासाठी लावण्यात आलेली या रेकॉर्ड बोलीवर विश्वास बसत नाही. सामान्यत: नर कबुतराची किंमत जास्त असते. याच कारण म्हणजे नर कबुतर जास्त वेळा प्रजनन करू शकतात."
निकोलस म्हणतात, "बेल्जियममध्ये जवळपास 20 हजारच्या आसपास लोक कबुतर पाळतात."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)