कोरोना काळात सुरू झालेली गोठ्यातली आयटी कंपनी तुम्ही पाहिलीत का?

    • Author, शाहीद शेख
    • Role, बीबीसी मराठीसाठी

आयटी कंपनी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती एक मोठी काचेची इमारत. तिथे पाठीवर सॅक घालून, किंवा खांद्याला लॅपटॉपची बॅग घेऊन, हातात कॉफीचा कप घेऊन गंभीर चेहऱ्याने फिरणारे युवक युवती. या जोडीला बऱ्यापैकी उंची कपडे, परफ्युमचा सुगंध आणि कानाला लावलेल्या स्मार्टफोनवर फाडफाड इंग्रजीत संभाषण करणारे तितकेच स्मार्ट तरुण तरुणी

पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांत अशा अनेक कंपन्या आहेत. अनेक तरुणांचं भविष्य या कंपन्यांमुळे सुरक्षित झालं आहे. त्यामुळे तिथे नोकरी मिळवण्याासाठी अनेक जण धडपडत असतात.

मात्र एका उजाड माळरानावर, गायीच्या गोठ्यात महाराष्ट्रातील काही तरुण एक आयटी कंपनी चालवतात हे सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. तिथेही तेच काम चालतं जे मोठ्या शहरातील कंपन्यांमध्ये चालतं. फक्त जागा वेगळी आणि परिस्थिती वेगळी.

बीड जिल्ह्यातील सांगवी गावात दादासाहेब भगत नावाचा तरुण ही कंपनी चालवतो. मुळात ही कंपनी आधी पुण्यात होती. कोरोनाच्या साथीमुळे त्यांना ही कंपनी बंद करावी लागली आणि त्यांनी थेट गावात गायीच्या गोठ्यातच कंपनी सुरू केली.

गेले पाच सहा महिने दादासाहेब आणि त्याचे काही सहकारी त्या गोठ्यातच राहतात आणि तिथेच झोपतात. कारण तिथे जायचा रस्ता अत्यंत खडतर आहे. म्हणून ते तिथेच राहतात.

ऑनलाईनचा फायदा

इंटरनेट हा आयटी कंपनीचा अविभाज्य घटक आहे. कंपनी सुरू करताना वीज आणि इंटरनेट ही समस्या त्यांना होतीच. पण त्यांनी ती इन्व्हर्टर आणि इतर माध्यमातून सोडवली. कंपनीची जागा थोडी उंचावर असल्याने त्यांना इंटरनेटचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही.

माध्यम ऑनलाईन असल्याने आणि कोरोनाच्या साथीमुळे कोणाला भेटण्याचा प्रश्नच येत नाही. स्काईप आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते क्लायंटशी संवाद साधतात. इथल्या काम करणाऱ्यांना इंग्रजीची मोठी समस्या आहे. हा तिढा कसा सोडवला ते तिथे काम करणाऱ्या अमोल भोसलेने सांगितलं.

अमोल म्हणतो, "आम्ही क्लायंटचे इंग्रजीतले मेसेज मराठीत भाषांतरित करतो. मग मराठीतले मेसेज पुन्हा गुगल ट्रान्सलेट करून इंग्रजीत पाठवतो." असा हा संवाद चालतो. त्यामुळे संवादाची समस्याही येत नाही.

ही कंपनी जेव्हा पुण्यात सुरू होती तेव्हा जो लोक दादासाहेबांबरोबर काम करायचे त्यांना घरुन काम करायला सांगितलं. तसंच गावाकडची काही मुलं त्यांनी शोधली आणि कंपनी पुन्हा एकदा नव्याने सुरू केली. काही मुलं फ्रीलान्स म्हणूनही तिथे काम करतात.

न्हा-पावसाची तमा नाही

लॉकडाऊचा काळ उन्हाळा आणि पावसाळ्याने व्यापला होता. त्या काळात या कंपनीचं काम कसं चाललं हा साहजिक प्रश्न मनात येतोच. पण या दोन्ही ऋतूत कॉम्प्युटर आणि इतर उपकरणांची सुरक्षा करत कामात खंड पडू दिला नाही.

कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. आता या संकटातून वर येऊन पुन्हा आयुष्य आणि व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी सगळेजण धडपडत आहेत. अशा वेळी त्यांना ब्रँडिंगची गरज असते.

त्याचंच डिझायनिंग आणि इतर कामं ही कंपनी करत आहे. त्यामुळे आपली कंपनी संकटात सापडली असताना ती सावरून इतर व्यवसाय सावरण्याचा चंग दादासाहेबांनी बांधला आहे.

आता कंपनीचं काम इथूनच चालवण्याचा त्यांचा मानस आहे. कारण त्यांच्या कामाला लागणाऱ्या सोयीसुविधा त्यांनी निर्माण केल्या आहेत. दादासाहेबांच्या घरी त्यांची पत्नी, मुलं आणि आई वडील असतात. सध्या ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या कामाची माहिती आताा सगळीकडे पसरू लागली आहे.

कोरोनाच्या काळात असे आशेचे किरण कमीच दिसतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)