'या' राष्ट्राध्यक्षाने बनवला आपल्या लाडक्या कुत्र्याचा 19 फुट उंच सोन्याचा पुतळा

तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या आवडत्या प्रजातीच्या कुत्र्याचा भव्य सोन्याचा पुतळा बनवला आहे. म्हणजे एकाप्रकारे त्या देशातला सर्वोच्च मान त्या कुत्र्यांना मिळाला आहे.

गुरबांगुली बेर्डीमुखामदेव यांनी तुर्कमेनिस्तानची राजधानी अशगबात इथे अल्बे या जातीच्या कुत्र्याचा 19 फुट उंच सोन्याच्या पुतळ्याचं अनावरण केलं.

अल्बे ही इथली स्थानिक प्रजाती आहे, ज्यांचा वापर मेंढपाळ करतात. त्यांचा समावेश तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रीय वारश्यातही होतो.

तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी अल्बे प्रजातीच्या कुत्र्यांचं कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या वर्षी त्यांनी एक पुस्तक या कुत्र्यांना समर्पित केलं होतं.

कुत्र्याचा पुतळा कितीही भव्य असला तरी या देशाची बहुतांश जनता मात्र गरीब आणि दुबळी आहे. माध्यमस्वातंत्र्याच्या यादीत या देशाचा क्रमांक शेवटच्या काही देशांमध्ये येतो. हा देश फक्त नॉर्थ कोरियाच्या एक पायरी वरती आहे.

युरेशियानेटनुसार हा पुतळा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रहिवाशी भागात आहे. यावर एक एलईडी स्क्रीन आहे ज्यात या प्रजातीच्या वेगवेगळ्या कुत्र्यांचे व्हीडिओ दाखवले जातात. हा पुतळा बनवायला सरकारला किती खर्च आला हे अजून कळलेलं नाही.

स्थानिक माध्यमांनी या पुतळ्याचं वर्णन करताना म्हटलंय की हा पुतळा या प्रजातीचा अभिमान आणि आत्मविश्वास दर्शवतो. या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी एका लहान मुलाला अल्बे प्रजातीचा कुत्रा भेट देण्यात आला. या कुत्र्याचा समावेश तुर्कमेनिस्तानचे हाताने विणलेले गालिचे, प्राचीन अहल टेके प्रजातीचे शर्यतीचे घोडे यांच्याबरोबर देशाच्या राष्ट्रीय वारशांमध्ये होतो.

राष्ट्राध्यक्ष बेर्डीमुखामदेव यांनी आपल्या अहल टेके घोड्यांविषयी असणाऱ्या प्रेमाविषयीही अनेकदा बोलून दाखवलं आहे. हे घोडे त्यांचं सौदर्य आणि त्यांच्या चपळतेमुळे ओळखले जातात.

2015 साली घोड्यावर बसलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या सोन्याच्या पुतळ्याचंही अनावरण झालं होतं.

बेर्डीमुखामदेव कधीकधी आपल्या मित्रराष्ट्रांच्या नेत्यांना घोडा किंवा कुत्र्याचं पिल्लू भेट देतात. त्यांनी अशा 'भेटी' उझबेकिस्तानचे आता हयात नसलेले राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि कतारचे शेख यांना दिले आहेत.

बेर्डीमुखामदेव यांनी पुतीन यांना भेट दिलेल्या कुत्र्याला जसं हाताळलं त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यांनी त्या कुत्र्याची मानगुट धरून त्याला हवेत उचललं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)