You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
39 हजारपट वजन सहन करू शकणाऱ्या या किड्याबद्दल कधी ऐकलंय?
'द डायबॉलिकल आयरनक्लॅड बीटल' हे जगातील सर्वाधिक मजबूत जीवांपैकी एक मानले जातात. खरंतर त्यांच्या नावातच त्यांचा गुणधर्म दडला आहे.
हा किड्यावरील आवरण इतकं टणक असतं की त्याच्यावरून कार गेली तरी त्याच्या शरीराला जरासाही धक्का लागत नाही, असं म्हटलं जातं.
शास्त्रज्ञांचं या विलक्षण किटकावर बराच काळ संशोधन सुरू होतं. आयरनक्लॅड बीटल त्याच्या वजनापेक्षा 39 हजार पट वजन कसं काय सहन करू शकतो, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतला.
या शोधाचा उपयोग मजबूत इमारती बांधण्यासाठी किंवा विमान उद्योग क्षेत्रात केला जाऊ शकतो.
'नेचर' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात याबाबत सांगण्यात आलं आहे.
आयर्व्हिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात कार्यरत असलेले प्राध्यापक डेव्हीड किसेलस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केलं आहे.
द डायबॉटिकल आयरनक्लॅड बीटल (Phloeodes diabolicus) प्रामुख्याने अमेरिका आणि मेक्सिको परिसरात आढळतो. इथं झाडांच्या खोडांमध्ये किंवा दगडांच्या फटींमध्ये हा किडा वास्तव्याला असतो. कोणत्याही किड्यापेक्षा या किड्यामधील बाह्य आवरण सर्वात मजबूत असल्याचं मानलं जातं.
सुरुवातीच्या कीटक-संशोधकांना या प्रजातीची माहिती मिळाली. ते त्यावेळी स्टीलच्या पिना वापरून हा कीटक पकडण्याच्या प्रयत्नात होते. पण त्या कीटकाचं बाह्य आवरण या पिना भेदू शकल्या नाहीत.
या कीटकाची उडण्याची क्षमता गेली तरी तो मृत्यूमुखी पडल्याचा अभिनय करतो. त्यांच्या टणक आवरणामुळे पक्षी त्यांना पकडत नाहीत.
आयरनक्लॅड बीटलच्या बाह्य आवरणाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी मायक्रोस्कोपी, स्पेक्ट्रोस्कोपी आणि मेकॅनिकल टेस्टींगचा उपयोग केला. हे आवरण 149 न्यूटन क्षमतेचं वजन सहन करू शकतं.
कीटकाच्या आवरणाप्रमाणे उत्पादन बनवण्यासाठी प्लॅस्टिक आणि धातूंचा वापर करण्यात आला. बीटलमधील बाह्य आवरणातील घटकांप्रमाणे त्याची रचना करण्यात आली. याचा उपयोग शास्त्रज्ञांना झाला. या घटकांच्या वापराने बनवलेल्या मिश्रणाची क्षमता आणि मजबुती कित्येक पटींनी वाढली होती.
हाडे, दात यांच्यासारख्या नैसर्गिकरित्या मजबूत असलेल्या गोष्टींवरसुद्धा शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू असतं. त्यांचा अभ्यास करून नवं मूलद्रव्य बनवण्याचा विचार शास्त्रज्ञ करताना दिसतात. यांचा उपयोग एखाद्या मजबूत वस्तूची निर्मितीसाठी करता येऊ शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)