You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समलिंगी उंदरांनी दिला पिल्लांना जन्म
- Author, जेम्स गल्लाघर
- Role, बीबीसी आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
चीनच्या विज्ञान अकादमीच्या संशोधकांनी दोन मादी उंदरांपासून पिल्लांना जन्म देण्यात यश मिळवलं आहे.
नर आणि मादीच्या एकत्र येण्यानं प्रजोत्पादनाची प्रक्रिया पार पडते. मात्र हा नैसर्गिक नियम मोडत जेनेटिक इंजनिअरिंग शास्त्रानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
Bimaternal म्हणजेच दोन सुदृढ मादी उंदरांनी पिल्लांना जन्म दिला आहे.
नर उंदरांच्या बाबतीत मात्र निराशा झाली आहे. दोन नर उंदरांपासून प्रजनन घडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र जन्म होताच काहीच दिवसांत पिल्लं दगावली.
प्रयोगामागचं प्रयोजन
आपण संभोग का करतो, या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं.
मनुष्यापासून सर्वच सस्तन प्राण्यांमध्ये शरीरसंबंध ठेवल्यानंतरच बाळाचा जन्म होऊ शकतो. त्यासाठी मादीचं बिजांड तर नराच्या शुक्राणुंची गरज असते.
मात्र सस्तन प्राणी वगळता इतर प्राण्यांना हा नियम लागू होत नाही.
काही मासे, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि काही पक्षी एकटेच प्रजननासाठी सक्षम असतात.
नर-मादी संयोगाशिवायच्या प्रजोत्पादनाची विलक्षण दुनिया
समलिंगी उंदरांपासून पिल्लं जन्माला घालण्यासाठी प्रजोत्पादनाचे कोणते नियम मोडावे लागतील, याचा शोध घेणं, हा चीनच्या शास्त्रज्ञांचा उद्देश होता.
यावरून असे नियम का महत्त्वाचे असतात, हे कळायला मदत होऊ शकते.
फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटचे प्रो. रॉबिन लोव्हल-बज म्हणतात, "हे संशोधन फारच रोचक आहे. तुम्हाला कोंबडी कसं बनवता येईल, याचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत."
(पोल्ट्री फॉर्ममध्ये नर-मादीच्या संयोगाशिवाय कृत्रीमरित्या कोंबड्यांची उत्पत्ती केली जाते.)
अशा प्रकारचं प्रजोत्पादन कसं करता येईल?
थोडक्यात सांगायचं तर आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं दोन माद्यांच्या साथीनं प्रजोत्पादन करणं तुलनेनं सोप होतं. त्यासाठी संशोधकांनी एका मादी उंदराचं बिजांड तर दुसऱ्या मादी उंदराच्या शरिरातील हॅपलॉईड एम्ब्रियॉनिक स्टेम सेल ही एक विशेष पेशी घेऊन प्रजोत्पादनाची प्रक्रिया पार पाडली.
मात्र या दोघांना केवळ एकत्र आणणं पुरेसं नव्हतं.
पिल्लांना जन्म देण्यासाठी बिजांड आणि पेशी यांचं विशिष्ट पद्धतीनं संयुग करणं आवश्यक होतं. त्यासाठी संशोधकांना जिन एडिटिंग नावाचं तंत्रज्ञान वापरावं लागलं. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तीन प्रकारचे डीएनए नष्ट करून दोघांना एकमेकांसाठी अनुरुप करण्यात आलं.
दोन नरांच्या बाबतीत मात्र ही प्रक्रिया जरा किचकट होती.
त्यात एका नर उंदराचा शुक्राणू आणि दुसऱ्या उंदराच्या शरिरातील हॅपलॉईड एम्ब्रियॉनिक स्टेम सेल वापरण्यात आला. बिजांडाची सर्वं नैसर्गिक जनुकीय संरचना बदलण्यात आली. शिवाय सात जिन्स नष्ट करण्यात आले.
संशोधकांच्या हाती काय लागलं?
आई आणि वडिलांकडून आलेले डीएनए किंवा जेनेटिक कोड वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात. त्यामुळे संभोगाची आवश्यकता असते. स्टेम सेलच्या अभ्यासातूनही हेच लक्षात येतं.
आई आणि वडिलांचे डीएनए एकत्र आले नाही तर आपला संपूर्ण विकासाच योग्य पद्धतीने होऊ शकत नाही.
याला जिनोमिक इम्प्रिंटिंग असं म्हणतात. म्हणजेच शुक्राणू आणि बिजांडातील एकाच प्रकारच्या डीएनएचे गुणधर्म वेगवगळे असतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात.
त्यामुळे उंदरांच्या पिल्लांना जन्माला घालण्यासाठी असे गुणधर्म असलेल्या डीएनएचा काही अंश नष्ट करावा लागतो.
हा प्रयोग करणारे डॉ. वी ली सांगतात, "काय शक्य आहे, हे या संशोधनावरून स्पष्ट होतं. दोन मादी उंदरांपासून जन्माल्या आलेल्या पिल्लांमधले दोष दूर करता येतात, असं या प्रयोगातून दिसलं. तसंच दोन नरांपासून बाळ जन्माला घालण्यातल्या अडचणीही पार केल्या जाऊ शकतात."
यापुढे समलिंगी स्वतःच्या बाळाला जन्म देऊ शकतील?
सध्यातरी केवळ उंदीर आणि त्यातही मादी उंदरांमध्येच हे शक्य आहे. मात्र भविष्यात हे शक्य होऊ शकतं, असं ऑकलंड विद्यापीठाच्या डॉ. टेरेसा होम यांना वाटतं. मात्र त्यासाठी खूप वेळ आहे.
त्या म्हणतात, "संशोधकांना समलिंगी जोडप्यापासून सुदृढ बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया विकसित करण्यात यश मिळू शकतं. मात्र नैतिकता आणि सुरक्षितता हे अशाप्रकारच्या प्रजननाच्या मार्गातले मोठे अडसर आहेत."
समलिंगी पालकांच्या पोटी जन्माला येणारं प्रत्येक मूल मानसिक आणि शारिरीकरित्या पूर्णपणे सुदृढ असेल, याची खात्री होत नाही तोवर अशा प्रकारच्या प्रजोत्पादनाला परवानगी मिळणार नाही.
दोन माद्यांनी ज्या पिल्लांना जन्म दिला आहे ती पिल्लं पूर्णपणे सुदृढ आहेत, याबद्दल काहीजण साशंक आहेत.
डॉ. लोव्हल-बज यांनी बीबीसीला सांगितलं, "दोन माद्यांनी जन्म दिलेली पिल्लं सामान्य असतील, याची मला खात्री वाटत नाही. शिवाय अशा प्रकारे यशस्वीरित्या पिल्लांना जन्म देण्याचा दरही खूप कमी आहे."
"अशाप्रकारे बाळ जन्माला घालण्याचा कुणी विचार करेल, असं मला वाटतं नाही."
तर सेक्स संपणार का?
डॉ. लोव्हल-बज म्हणतात, "अजूनतरी नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)