You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑस्ट्रेलियात स्ट्रॉबेरी खाऊ नका, त्यात सुई असू शकते
लालचुटूक स्ट्रॉबेरीमध्ये चक्क सुया आढळल्याने ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे.
ऑस्ट्रेलियातल्या सहा राज्यांमध्ये स्ट्रॉबेरीचे असे बॉक्स आढळल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. हा क्रूर आणि विकृत स्वरूपाचा गुन्हा आहे, असं ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्याने सांगितलं.
सुई असलेली स्ट्रॉबेरी खाल्ल्याने एका माणसाला इजा होऊन रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
स्ट्रॉबेरीचा पुरवठा करणाऱ्या विविध ब्रँड्सचे बॉक्सेस परत मागवण्यात आले आहेत. सावधानतेचा उपाय म्हणून आयात केलेल्या स्ट्रॉबेरीची विक्री तूर्तास थांबवल्याचं न्यूझीलंडच्या एका व्यापाऱ्याने सांगितलं.
ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अन्न सुरक्षा प्राधिकरणाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
हे घृणास्पद कृत्य सामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक प्रशासनानंही याप्रकरणाची चौकशी करत आहे मात्र संशयित म्हणून कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही.
फळांशी अशी छेडछाड केल्याचा प्रकार पहिल्यांदा गेल्या आठवड्यात क्वीन्सलँडमध्ये उघडकीस आला होता. त्यानंतर याप्रकाराचं लोण न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया, द ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी, साऊथ ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया या भागांमध्ये पसरलं.
एका ठिकाणी असं घडल्यानंतर अन्य ठिकाणी जाणीवपूर्वक तसंच करण्यात आल्याचं स्ट्रॉबेरी व्यापारी आणि पोलिसांचं म्हणणं आहे.
या विचित्र प्रकारासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीला 100,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं बक्षीस क्वीन्सलँड राज्य सरकारनं म्हटलं आहे.
स्ट्रॉबेरीत सुई टाकण्याचा प्रयत्न एखाद्या माथेफिरू कर्मचाऱ्याचं कृत्य असावं, असं क्वीन्सलँड स्ट्रॉबेरी उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. मात्र याबाबत असा काही अंदाज व्यक्त करणं घाईचं ठरेल, असं पोलिसांनी सांगितलं.
बेरी ऑब्सेशन, बेरी लिसिअस, लव बेरी, डॉनीब्रुक बेरीज, डिलाइटफुल स्ट्रॉबेरीज आणि ओअॅसिस या सहा ब्रँड्सना या विकृतीचा फटका बसला आहे.
दरम्यान, स्ट्रॉबेरी खाण्यापूर्वी कापून बघावी, असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिला आहे.
उत्पादनाचा हंगाम ऐन भरात असताना हा प्रकार घडल्याने यंदाच्या हंगामातल्या स्ट्रॉबेरीच्या खरेदी-विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची भीती स्ट्रॉबेरी उत्पादकांनी व्यक्त केली आहे. स्ट्रॉबेरी व्यवसायाची उलाढाल 13 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढी आहे.
न्यूझीलंडमध्ये निम्म्याहून अधिक स्ट्रॉबेरींचा पुरवठा करणाऱ्या फूडस्टफ्स या कंपनीने ऑस्ट्रेलियातून स्ट्रॉबेरी मागवणं तूर्तास थांबवलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)