You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑस्ट्रेलियात भयंकर दुष्काळ, सरकारने जाहीर केली 29 अब्ज रुपयांची मदत
ऑस्ट्रेलिया आता दुष्काळग्रस्त देश झाला आहे, असं पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी नुकतंच जाहीर केलं.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून आणि त्यांच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी टर्नबुल यांनी 14 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. आतापर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण 57.6 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत जाहीर करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियात अजूनही हिवाळा असला तरी पूर्व भागाला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेचे डेव्हिड ग्रे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या या दुष्काळझळा.
न्यू साऊथ वेल्स प्रांतातल्या वॉलगेट मध्ये एका शेतातलं हे एकमेव झाड तग धरून आहे. पाण्याचं कुंड जवळ असतानाही आजूबाजूची धरणी रखरखीत झाली आहे.
2010 नंतर चांगला पाऊस झालेला नाही, असं या शेताच्या मालकीण मे मॅक्केऑन यांनी सांगितलं.
न्यू साऊथ वेल्सचा 98 टक्के भाग दुष्काळाच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. शेजारच्या क्वीसन्सलँड प्रांतही दुष्काळाने होरपळला आहे. शेतकऱ्यांना आपल्या गाईगुरांसाठी बाहेरून अन्नधान्य मागवावं लागत आहे. यामुळे त्यांचं राहणीमान महागलं आहे.
न्यू साऊथ वेल्स भागात टॅमवर्थ येथील एका शेतात एक गाय पाण्याच्या ठिकाणापासून परत जाताना टिपली तेव्हा बाजूचा रखरखाट आणख गडद वाटतो. "गाईगुरांना खाणंपिणं देणंही अवघड झालं आहे. तेवढं सोडलं तर मी काहीच करू शकत नाही. सगळं जीवन पाण्याअभावी ठप्प झालं आहे", असं शेतकरी टॉम वोलॅटसन यांनी सांगितलं.
न्यू साऊथ वेल्स प्रांतातला गुन्नेडाह धरणाजवळ दुष्काळाने करपलेली ही भुई दुष्काळाची दाहकता तीव्रतेने दाखवते.
सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. "माझं अख्खं आयुष्य या भागात गेलं आहे. हा दुष्काळ बराच काळ टिकणारा आहे", असं अॅश व्हिटने यांनी सांगितलं.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. दुष्काळाने मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी अधिक चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ऑस्ट्रेलियातील बहुतांश भागात अतिशय उष्ण वातावरण होतं. 2002 नंतरचा हा सगळ्यांत भीषण दुष्काळ आहे.
दुष्काळामुळे शेतीला कसा फटका बसतो याचं हे जिवंत उदाहरण. उजवीकडे आहे पाणी मिळालेली शेती. डावीकडे पाण्याअभावी कोरडंठाक पडलेलं खाचर.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. हा दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचा थेट परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)