You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रानंतर ऑस्ट्रेलियातही प्लास्टिक बंदी
महाराष्ट्रात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तर जगभरातही काही देशांत प्लास्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. आता ऑस्ट्रेलियातील रिटेल कंपन्यांनी प्लास्टिकवर बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. यातून रिटेल स्टोअरमध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांच्याचा वादाचे प्रसंग घडत आहेत.
युनायटेड किंगडमसह 60 देशांत पुनर्वापर करता न येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात कचरा कमी करण्याच्या उद्देशाने सहापैकी 4 राज्यांत प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार प्लास्टिकचा वापर करणाऱ्या रिटेल कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे.
या वीकेंडपासून या बंदीची अंमलबजावणी सुरू झाली. बंदी नंतर रिटेलमधील स्टोअरमधील कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. एका स्टोअरमध्ये एका ग्राहकाने दुकानदाराची कॉलर पकडली तर दुसऱ्या एका ग्राहकाने ही बंदी म्हणजे भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला.
ऑस्ट्रेलियातील वूलवर्थ या सुपर बजारच्या चेनने 20 जूनपासून प्लास्टिकवर बंदी घातली. त्याऐवजी पुनर्वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या विकायला सुरुवात केली आहे.
पण ग्राहकांच्या रोषामुळे या स्टोअरने 8 जुलैपर्यंत पुनर्वापर करण्याजोगी प्लास्टिक पिशव्या मोफत द्यायला सुरुवात केली.
"हा बदल पचवण्याठी ग्राहकांना सहकार्याची गरज आहे," असं वूलवर्थ चे व्यवस्थापकीय संचालक क्लेर पीटर्स यांनी सांगितलं.
कोल्स या दुसऱ्या रिटेल चेनने रविवारी अतिरिक्त बिल काऊंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना ही बंदी समजवून सांगण्यासाठी अधिक कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
रिटेल स्टाफ युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांना कर्मचाऱ्यांशी सभ्यपणे वागण्याची आवाहन केली आहे.
"या बदलामुळे ग्राहकांमध्ये रोष आहे याची आम्हाला कल्पना आहे. मात्र दुकानदारांशी गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही," असं द शॉप डिस्ट्रिब्युटिव्ह अँड अलाईड एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव गेराड ड्वायर यांनी म्हटलं आहे.
या युनियनने आतापर्यंत 132 कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे, त्यातील 57 जणांनी त्यांना वाईट वागणूक मिळाल्याचं म्हटलं आहे.
समुद्रात किती प्लास्टिक आहे?
जगातील समुद्रात 80 लाख टन प्लास्टिक जमा होतंय. संयुक्त राष्ट्रांनी 2022पर्यंत पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबण्याचं आवाहन केलं आहे.
नद्यांमधून वाहत येणार प्लास्टिक समुद्रात जातं. एका अभ्यासानुसार समुद्रात 95 टक्के प्लास्टिक अशा पद्धतीनं येतं. यापैकी आठ नद्या आशियातील आहेत.
बहुतांश प्लास्टिक चीनमधून येतं. परंतु इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम हे देशही प्लास्टिकच्या प्रदूषणात आघाडीवर आहे.
आकडेवारीनुसार अमेरिकेत प्लास्टिकचा वापर दरवर्षी प्रतिव्यक्ती 120 किलो इतका आहे तर हेच प्रमाण यूकेमध्ये 76 किलो आणि स्वीडन 18 किलो इतका आहे.
जगभरातील स्थिती काय आहे?
गेल्या डिसेंबरमध्ये 193 देशांनी समुद्रात प्लास्टि जाणार नाही यासाठी कटीबद्ध असल्याचं म्हटलं आहे. पण याला कोणतही कायदेशीर बंधन नाही आणि वेगवेगळ्या देशांनी स्वतंत्र योजना आखल्या आहेत.
40 देशांनी पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. चीन, बांगलादेश आणि 15 आफ्रिकन देशांत त्यासाठी दंड आकारला जात आहे.
इतर यूकेसह इतर काही देश प्लास्टिकचे स्ट्रॉ, कॉटन बड या उत्पादनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)