You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या उंदराचा सुवर्ण पदक देऊन गौरव
जमिनीखाली पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांचा वास काढत ते शोधून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या एका अफ्रिकन उंदराचा नुकताच सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.
मगावा, असं या उंदराचं नाव आहे. मगावाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 39 भूसुरुंग आणि 28 स्फोट न झालेला दारुगोळा शोधून, खरंतर हुंगून, काढले आहे. कंबोडियात भुसुरूंगामुळे दरवर्षी शेकडो जणांचे प्राण जातात. अनेकांना अपंगत्व आलं आहे. त्यामुळे त्याने केलेल्या कामाला विशेष महत्त्व आहे.
कंबोडियात कर्तव्य बजावून घातक भूसुरुंग स्फोटकं शोधून काढल्याबद्दल युकेतल्या PDSA या नामांकित प्राणीमित्र संस्थेने मगावाचा सुवर्ण पदक देऊन गौरव केला आहे.
दक्षिण-पूर्व आशियातल्या कंबोडिया या देशात 60 लाख भूसुरुंग असल्याचा अंदाज आहे.
PDSA च्या सुवर्णपदकावर 'प्राणी शौर्य किंवा कर्तव्याप्रती समर्पणासाठी' असे शब्द कोरलेले आहेत. आजवर एकूण 30 प्राण्यांना हे सुवर्णपदक देण्यात आलं आहे. यापैकी मगावा हा एकमेव उंदीर आहे.
बेल्जिअममध्ये नोंदणी करण्यात आलेल्या टांझानियातल्या 'अपोपो' या संस्थेने सात वर्षांच्या मगावाला प्रशिक्षण दिलं आहे. 1990 सालापासून ही संस्था उंदरांना भूसुरुंग आणि टीबी शोधून काढण्याचं प्रशिक्षण देत आहे. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर हे प्रशिक्षित उंदीर कर्तव्य बाजवण्यासाठी सज्ज होतात.
"हा पुरस्कार मिळणं, आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं" अपोपोचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफ कॉक्स यांनी म्हटलं आहे. प्रेस असोसिएशन या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत ते पुढे म्हणतात, "कंबोडियातल्या जनतेसाठी आणि संपूर्ण जगभरात भूसुरुंगाच्या छायेत जगणाऱ्या लोकांसाठीही हे फार महत्त्वाचं आहे."
अपोपोने मगावाविषयी अधिक माहिती देताना सांगितलं, "मगावाचा जन्म तंझानियातला. टांझानियातच तो लहानाचा मोठा झाला. त्याचं वजन आहे 1.2 किलो. "
इतर प्रजातीतल्या उंदरांपेक्षा मगावा मोठा असला तरी भूसुरुंगांचा स्फोट घडवून आणण्याइतपत त्याचं वजन नाही. म्हणजेच मगावा जिवंत भूसुरुंगावरून धावला तरी त्याचा स्फोट होत नाही.
अपोपो कंपनी स्फोटकांमध्ये असलेलं रसायन ओळखण्याचं प्रशिक्षण उंदरांना देते. त्यामुळे भंगार बाजूला सारून स्फोटकं शोधणं त्यांना सोपं होतं. एकदा स्फोटकं सापडली की हे उंदीर तिथला पृष्ठभाग खुरडतात. उंदरांसोबत असलेल्या सहकाऱ्यासाठी ही स्फोटकं सापडल्याची खूण असते.
मगावा केवळ 20 मिनिटात एका टेनिस कोर्टएवढी जागा हुंगून स्फोटकं शोधून काढतो. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती मेटल डिटेक्टरने हे काम करणार असेल तर त्यासाठी 1 ते 4 दिवसांचा वेळ लागू शकतो. मगावा दिवसातून केवळ अर्धा तास काम करतो. तेही सकाळच्या वेळी आणि आता तर मगावाचं निवृत्तीचं वय झालं आहे. PDSA च्या महासंचालिका जॅन मॅकलॉघलिन म्हणतात, "अपोपोमध्ये त्याचं कार्य खरोखरीच अद्वितीय आणि उत्कृष्ट होतं."
प्रेस असोसिएशनशी बोलताना त्या म्हणाल्या, "भूसुरुंगाच्या छायेत राहणारे स्त्री, पुरूष आणि लहान मुलं यांच्या आयुष्यावर मगावाचा थेट परिणाम होतो. तो त्यांचे प्राण वाचवतो. त्याने शोधून काढलेल्या प्रत्येक भूसुरुंगागणिक लोकांच्या जखमी होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी होत असतो."
भूसुरुंग शोधून ती निकामी करण्याचं काम करणाऱ्या HALO या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कंबोडियामध्ये 1979 सालापासून भूसुरुंग स्फोटात 64 हजार लोकांनी आपले जीव गमावले तर 25 हजार लोकांना अपंगत्व आलं आहे.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात कंबोडियातमध्ये गृहयुद्ध पेटलं होतं. त्याच काळात इथल्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले होते. या भूसुरुंगांचा आजही स्फोट होत असतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)