You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनं : जगात आता किती सोनं शिल्लक राहिलंय?
- Author, जस्टीन हार्पर
- Role, बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज
मुळात सोनं हे मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे. अखेर, सोनं हे खाणीतून मिळणारं धातू असल्याने ते कधी संपणार, हासुद्धा प्रश्न उपस्थित होतो, मुळात जगभरातील खाणींमध्ये किती सोनं उरलं आहे?
पीक गोल्ड
तज्ज्ञ पीक गोल्ड या संकल्पनेबाबत नेहमी बोलताना दिसतात. खाणीतून एका वर्षात जितकं जास्त सोनं बाहेर काढता येईल, तितकं आपण काढलं. म्हणजे आपण त्याची मर्यादा गाठली, असा त्याचा अर्थ होतो.
वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या माहितीनुसार, 2019 मध्ये जगभरात 3 हजार 531 टन सोन्याचं उत्खनन करण्यात आलं. 2018 या वर्षापेक्षा हे प्रमाण एका टक्क्याने कमी होतं. 2008 नंतर पहिल्यांदाच हे प्रमाण कमी झालं.
या आकडेवारीबाबत अधिक सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बीबीसीने वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या प्रवक्त्या हॅना, ब्रँडस्टेटर यांच्याशी संपर्क साधला.
त्या सांगतात, "येत्या काही वर्षांमध्ये खाणीतून होणारा सोन्याचा पुरवठा संथगतीने किंवा कमी प्रमाणात होऊ शकतो. सध्या उपलब्ध असलेला सोन्याचा साठा संपत चालला आहे. नवीन ठिकाणांचा शोधही दुर्मिळ बनला आहे. अत्यंत कमी प्रमाणात संथ किंवा कमी होऊ शकतं. तरी मोठ्या प्रमाणात सोन्याचं उत्खनन होताना दिसतं."
पीक गोल्ड स्थिती आल्यानंतरही लगेचच सोन्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता नाही. पुढची अनेक वर्ष हळूहळू टप्प्याटप्प्याने सोन्याचं उत्पादन कमी होऊ शकतं.
मेटलडेली वेबसाईटच्या रॉस नॉर्मन यांच्या मते, खाणकाम एका प्रमाणबद्ध पद्धतीने केलं जाणारं काम आहे. पण कधीच असं होताना दिसत नाही."
किती सोनं शिल्लक?
खाणकाम कंपन्यांच्या साधारणपणे दोन प्रकारे जमिनीतील सोन्याचं वर्गीकरण करतात.
रिझर्व्ह (राखीव) - सध्य उपलब्ध सोन्याचा साठा आणि दरानुसार आर्थिकदृष्ट्या लाभदायक.
रिसोर्स (स्रोत) - पुढील काळात खाणीच्या शोधानंतर होऊ शकणारा आर्थिक लाभ
स्रोत मोजण्यापेक्षा खाणीतील सोन्याचा राखीव साठा जास्त अचूकपणे मोजता येऊ शकतो.
US जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, जगभरात जमिनीच्या पोटात सुमारे 50 हजार टन सोन्याचा साठा असल्याचा अंदाज आहे.
आजपर्यंत जगभरातील खाणींमधून 1 लाख 90 हजार टन सोन्याचं उत्खनन झालं आहे.
या आकडेवारीचा ढोबळमानाने विचार केल्यास सुमारे 20 टक्के सोनं अजूनही खाणींमध्ये शिल्लक आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोन्याच्या नव्या खाणींपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य होऊ शकतं. या ठिकाणांपर्यंत आपण आजपर्यंत जाऊ शकलेलो नाही.
आजचं सर्वात आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट डेटा मायनिंग यांच्या मदतीने उत्खनन प्रक्रिया सोपी होऊ शकते. खाणकाम प्रक्रिया सहज-सोपी बनवणं, तसंच आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक ठरण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.
काही ठिकाणी रोबोटिक्सचा वापर करून खाणकाम केलं जात आहे. येत्या काळात या कामात आणखी जास्त तंत्रज्ञान वापरात येईल, अशी अपेक्षा आहे.
मोठी संसाधनं
जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेत विटवॉटर्सरँड बसीन याठिकाणी आहे. आतापर्यंत जगभरात उत्खनन झालेल्या सोन्यापैकी 30 टक्के सोनं या खाणीतून बाहेर काढण्यात आलं आहे.
याशिवाय, इतर प्रमुख खाणींमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सुपर पिट, ऑस्ट्रेलियातील न्यूमाँट, इंडोनेशियातील ग्रासबर्ग आणि अमेरिकेतील नेवाडा खाण यांचा समावेश होतो.
सध्या सोन्याचं सर्वाधिक उत्खनन चीनमध्ये केलं जातं. पाठोपाठ कॅनडा, रशिया आणि पेरू हे देश सोन्याचं उत्खनन करतात.
कंपन्यांबाबत विचार करायचा झाल्यास नेवाडामधील बॅरीक गोल्ड्स ही कंपनी सोन्याचं सर्वाधिक उत्खनन करते. एका वर्षात जवळपास 35 लाख औंस इतक्या सोन्याचं उत्पादन कंपनीकडून केलं जातं.
सोन्याच्या नव्या खाणींचा शोध लागत असला तरी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा असलेल्या खाणी दुर्मिळ आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.
त्यामुळे जुन्या खाणींमधूनच सोन्याचं बहुतांश उत्पादन येतं. गेली कित्येक वर्षे याच खाणींमधील सोनं वापरात आहे.
खाणकामातील समस्या
मोठ्य़ा प्रमाणात खाणकाम करणं ही अत्यंत खर्चिक बाब आहे. त्यासाठी जमिनीवर आणि जमिनीखाली वापरली जाणारी यंत्रं, तज्ज्ञांचं पथक आदी गोष्टींची आवश्यकता असते.
आजमितीस, जगातील 60 टक्के खाणकाम जमिनीवर चालतं तर उर्वरित काम जमिनीखाली केलं जातं.
नॉर्मन सांगतात, "सध्याच्या काळात खाणकाम अत्यंत कठीण बनलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील मोठ्या व जुन्या, स्वस्त उत्पादन मिळणाऱ्या खाणीतील सोनं संपण्याच्या मार्गावर आहे.
चीनमधील सोन्याच्या खाणी तुलनेने लहान आहेत. त्यामुळे इथं खर्च जास्त येतो.
सोनं शोधण्यासाठी जगात अत्यंत कमी जागा उरल्या आहेत. यामध्ये पश्चिम आफ्रिकेसारखा अशांत भाग आहे.
विक्रमी दरवाढ
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली. याचा अर्थ सोन्याच्या खाणकामात वाढ झाली, असा होत नाही.
सोन्याच्या दरात नेहमीच चढउतार होत असते. बँडस्टेटर यांच्या मते, "गुंतवणुकीचं प्रमाण पाहता सोन्याच्या किंमतीनुसार उत्पादन किती घ्यावं हे ठरत नाही. उत्पादनाच्या प्रमाणाचं नियोजन करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे."
शिवाय, सोन्याची दरवाढ ही कोरोना लॉकडाऊन काळात झाली होती. अशा स्थितीत सोन्याचं उत्खनन करणं कठीण होतं.
या काळात खाणी एकतर बंद तरी होत्या किंवा पूर्ण क्षमतेने सुरू नव्हत्या.
जागतिक साथीच्या काळात सोन्याचा दर वाढण्याचं कारण म्हणजे गुंतवणूक. या काळात गुंतवणूकदारांनी आपला पैसा गुंतवण्याचा खात्रीशीर आणि सोपा मार्ग म्हणून सोन्यात गुंतवणूक केली. याचा परिणाम सोन्याचे दर प्रचंड वाढत गेले.
चंद्रावरचं सोनं
जमिनीत किती सोनं आहे, हे मोजणं कठीण आहे. पण सोनं मिळवण्याचा तो एकच मार्ग नाही.
चंद्रावरही सोनं असल्याचं सांगितलं जातं.
पण इथलं सोनं मिळवणं तुलनेत प्रचंड अवघड आहे. तरी याठिकाणी खाणकाम करून सोनं काढून आणल्यास सध्याच्या सोन्याच्या दरापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याची किंमत असेल.
अंतराळ तज्ज्ञ सिनिएड ओसुलिवन यांच्या मते, "चंद्रावर सोनं उपलब्ध आहे, हे आपल्याला माहीत असूनही ते सोनं काढणं आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या योग्य नाही. तुम्हाला सोन्याच्या विक्रीतून जितके पैसे मिळतील, त्याच्या कितीतरी जास्त पटींनी त्याचा उत्पादनखर्च असेल."
त्याचप्रमाणे अंटार्क्टीक खंडात काही ठिकाणी सोनं उपलब्ध आहे. तिथल्या बिकट हवामानामुळे ते काढणंही आपल्याला आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.
समुद्राच्या तळाशी काही ठिकाणी सोनं असू शकतो. पण ते काढणं परवडणारं नाही.
सोन्याची एक चांगली बाजू म्हणजे, याचा पुनर्वापर होऊ शकतो. नैसर्गिक वायू, तेल यांच्याप्रमाणे हे पूर्णपणे संपून जाणार नाही. त्याचा पुन्हा पुन्हा वापर करणं आपल्याला शक्य आहे. त्यामुळे जगात सोन्याची टंचाईच जाणवेल, अशी शक्यता सध्या तरी नाही.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही सोनं मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यांचाही पुनर्वापर शक्य आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सोनं काढून त्याचा पुनर्वापर करण्याचं प्रमाणही पूर्वीपेक्षा वाढलं आहे, हे विशेष.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)