You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अयोध्येची ती राजकन्या जी झाली कोरियाची राणी'
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांच्या पत्नी किम जोंग-सूक एकट्याच भारत दौऱ्यावर येत आहेत.
दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने ही बातमी दिली आहे. वृत्तसंस्थेनुसार किम जोंग-सूक 6 नोव्हेंबरला अयोध्येत दिवाळीआधी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाला हजेरी लावतील.
किम जोंग-सूक यांची दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांच्याशिवाय एकट्याने परदेश दौरा करण्याची 16 वर्षांतली ही पहिलीच वेळ आहे. चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी त्या 4 नोव्हेंबरला नवी दिल्लीत दाखल होतील. सोमवारी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतील.
मात्र या दौऱ्यादरम्यान किम जोंग-सूक कोरियातलं प्राचीन राज्य असलेल्या कारकचे संस्थापक राजा किम सो-रू यांच्या भारतीय पत्नी राणी हौ यांच्या स्मारकालाही भेट देतील.
राणी हौ यांचं स्मारक अयोध्येत शरयू नदीकाठी आहे.
कोण आहेत राणी हौ?
अयोध्येचे राजकुमार राम आणि त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासाची कथा हजारो वर्षांपासून भारतात सांगितली जाते.
मात्र गेल्या दोन दशकात अयोध्येतून आणखी एका व्यक्तीचा परदेशात जाण्याचा विषय लोकांमध्ये चर्चीला जातोय.
मात्र राजकुमार रामाप्रमाणे ही राजकन्या कधीच अयोध्येत परतली नाही.
चीनी भाषेत लिहिलेल्या सामगुक युसा या दस्तावेजात याचा उल्लेख आढळतो. त्यात लिहिलं आहे की ईश्वराने अयोध्येच्या राजकुमारीच्या पित्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सांगितलं की त्यांनी आपल्या मुलीला त्यांच्या भावासोबत राजा किम सू-रो यांच्याशी विवाह करण्यासाठी किमहये शहरात पाठवावं.
कारक वंश
आज कोरियात कारक वंशाचे जवळपास साठ लाख लोक स्वतःला राजा किम सू-रो आणि अयोध्येच्या राजकन्येच्या वंशाचे असल्याचं सांगतात.
यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या दक्षिण कोरियाच्या लोकसंख्येच्या एक दशमांशापेक्षा जास्त आहे.
दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष किम डेई जंग आणि माजी पंतप्रधान हियो जियोंग आणि जोंग पिल-किम याच वंशाचे होते.
या वंशाच्या लोकांनी ते दगडही सांभाळून ठेवले आहेत, ज्यांच्याबद्दल सांगितलं जातं की अयोध्येच्या राजकन्येने आपल्या समुद्र यात्रेदरम्यान होडी संतुलित ठेवण्यासाठी हे दगड सोबत आणले होते. किमहये शहरात या राजकन्येचा एक मोठा पुतळादेखील आहे.
दक्षिण कोरियात या राजकन्येच्या कबरीवर अयोध्येतून आणलेले दगड लावण्यात आले, असंही सांगितलं जातं.
अयोध्या आणि किमहये शहराचा संबंध 2001 सालापासून सुरू झाला आहे.
कारक वंशाच्या लोकांचा एक गट दरवर्षी फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान या राजकन्येच्या मातृभूमीवर तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अयोध्येत येतो.
कोरियाचे पाहुणे
कोरियाच्या या पाहुण्यांनी शरयू नदीकाठाच्या संत तुलसीघाटाजवळ आपल्या राजकन्येच्या स्मृतीप्रित्यर्थ एक छोटी बागही बनवली आहे.
अयोध्येतली काही प्रमुख मंडळीदेखील आता वेळोवेळी किमहये शहराचा दौरा करतात.
अयोध्येच्या पूर्वीच्या राजघराण्याचे सदस्य बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्र इथे येणाऱ्या कारक वंशांच्या लोकांचं आदरातिथ्य करतात आणि गेल्या काही वर्षांत ते अनेकदा दक्षिण कोरियाला गेले आहेत.
त्यांच्या कुटुंबाचा इतिहास जवळपास शंभर वर्ष जुना आहे, हा भाग निराळा.
बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्र 1999-2000च्या दरम्यान कोरिया सरकारचे प्रमुख पाहुणे म्हणून कोरियाला गेले होते.
अयोध्येकडून अपेक्षा
काही वर्षांपूर्वी बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांनी आपल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्याबाबत बीबीसीशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते, "या आख्यायिकेबद्दल सुरुवातीला माझ्या मनात जरा संशय होता. मी त्यांना सांगितलं देखील की हे थाईलँडचं अयुता असू शकतं. थाईलँडमध्येही एक अयोध्या आहे. मात्र त्यांना पूर्ण विश्वास होता आणि सगळं संशोधन करून ते इथे आले होते."
मिश्र यांच्या मतानुसार कोरियाच्या लोकांच्या अयोध्येबाबत बऱ्याच योजना होत्या. मात्र भारत सरकारने यात फार रस घेतला नाही.
म्हणूनच राणीच्या स्मरणार्थ एक छोटं पार्क उभारून ते लोकही मागे सरले.
गेल्या काही वर्षांत काय घडलं?
- 2015-16मध्ये भारत आणि दक्षिण कोरिया सरकारने एका सहमती पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर राणी हौ यांच्या बागेला मोठं रुप देण्याची योजना बनवण्यात आली होती.
- दक्षिण कोरिया सरकारदेखील या विस्तारीकरणासाठी 8.60 लाख डॉलर्स देईल, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
- अयोध्येतलं राणी हौ यांचं स्मारक कोरियन स्थापत्यशास्त्रानुसार उभारू, असं अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं.
- एप्रिल 2018 मध्ये कोरियाच्या या राणीच्या स्मारकाचं काम राष्ट्रीय हरित लवादाने थांबवलं.
- यानंतर बातमी आली की अयोध्येत रामकथा संग्रहालयाच्या मागे पर्यटन विभागाची अडीच एकर जमीन राणी हौ यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)