You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नूर इनायत खान : टिपू सुलतानची वंशज ब्रिटनच्या नोटेवर झळकणार?
ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुस्लीम महिलेचं नाव चर्चेत आलं आहे. ज्या टिपू सुलतानने भारतातील ब्रिटिश सत्तेला विरोध केला, त्याची वंशज असलेल्या या महिलेचं नाव चर्चेत येण्याच कारणही खास आहे.
ब्रिटनचं मोठं चलन असलेल्या 50 पाऊंडच्या नोटेवर या महिलेचा फोटो असावा, अशी मोहीम ब्रिटनमध्ये सुरू आहे.
या महिलेचं नाव आहे नूर इनायत खान. नूर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या गुप्तहेर होत्या
ब्रिटिश चलनात 50 पाऊंडची नोट सर्वांत मोठे चलन आहे. २०२०मध्ये प्लास्टिक फॉर्ममध्ये ही नोट उपलब्ध होणार आहे.
बँक ऑफ इंग्लंडने या नोटेवर कोणाची प्रतिमा असावी हे सूचवण्याचं आवाहन केलं आहे.
ब्रिटनमधील काही इतिहासकारांनी आणि लोकप्रतिनिधींनी नूर इनायत खान यांचा फोटो चलनावर असावा, यासाठी मोहीम सुरू केली आहे.
भारतीय वंशाच्या नूर इनायत खान
नूर इनायत खान या टिपू सुलतानच्या वंशातील होत्या. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिशांसाठी गुप्तहेर म्हणून काम केलं होतं.
नूर यांचा जन्म जानेवारी १९१४मध्ये मॉस्कोत झाला. त्यांचे वडील हजरत इनायत खान भारतीय तर आई ओरा रे बेकर अमेरिकेच्या नागरिक होत्या. अमेरिकेत रामकृष्ण मिशनच्या आश्रमात त्या दोघांची भेट झाली होती. हजरत इनायत खान सुफी पंथाचे प्रचारक व संगीतकार होते. ते टिपू सुलतानच्या वंशातले होते.
नूरचं बालपण पॅरिसमध्ये गेलं. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने पॅरिसचा ताबा घेतला, तेव्हा नूरचं कुटुंब लंडनला स्थलांतरित झालं.
त्यानंतर लंडनमध्ये नूर महिलांसाठीच्या हवाई दलात दाखल झाल्या आणि नंतर विशेष मोहिमेवरील अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ही संस्था सुरू केली होती.
राजकन्या ते गुप्तहेर
त्या लंडनहून पॅरिसला जाणाऱ्या पहिल्या महिला रेडिओ ऑपरेटर होत्या. तिथं त्यांनी मॅडेलेइन या गुप्त नावानं तीन महिने काम केलं. नूर यांनी फ्रान्समध्ये त्यांचं गुप्तहेराचं काम सुरूच ठेवलं होतं. ही अटक धोक्याने झाली होती. त्यांच्या एका सहकारी मित्राच्या बहिणीने त्यांची माहिती जर्मन पोलिसांना दिली होती. त्यातून त्यांना अटक झाली.
नूर यांचा जर्मन पोलिसांनी फार छळ केला. पण ब्रिटनच्या गुप्त मोहिमेची कसलीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही. एक वर्ष त्या जर्मनीच्या कैदेत होत्या. त्यानंतर त्यांना दक्षिण जर्मनीतील छळछावणीत पाठवण्यात आलं. तिथंही त्यांचा छळ करण्यात आला. पण त्याचं खरं नावही पोलिसांना कळू शकलं नाही.
ज्या वेळी त्यांना गोळी घालण्यात आली, तेव्हाचे त्यांचे अखेरचे शब्द होते, लिबर्ते (मुक्ती)!
मृत्यूच्या वेळी नूर यांचं वय 30 वर्षांची होतं.
नूर यांचा ब्रिटनने 'जॉर्ज क्रॉस' या सर्वोच्च सन्मानने गौरव केला आहे. तर 'क्रॉइक्स दे गुएरे' हा सन्मान देऊन फ्रान्सनंही त्यांना गौरवलं आहे. तसंच, २०१४मध्ये ब्रिटनच्या 'रॉयल मेल'ने नूर इनायत खान यांच्यावर टपाल तिकीट जारी केलं होतं.
नूर यांच्या आयुष्यावर लेखिका श्रावणी बासू यांनी 'द स्पाई प्रिसेंस : द लाइफ़ ऑफ़ नूर इनायत खान' हे पुस्तक लिहिलं आहे. तसंच, लवकरच राधिका आपटे या गुप्तहेर राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)