You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : पैशाची गोष्ट - शेअर बाजारात घसरण : मी केलेल्या गुंतवणुकीचं काय करू?
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
मागच्या वर्षीपर्यंत भारतीय शेअर बाजारात सगळीकडे फक्त हिरवळच दिसत होती. निफ्टी किंवा सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक चौखूर उधळत होते. त्यानंतर 2018 साल उजाडलं.
1 फेब्रुवारीला बजेट झालं. आणि तिथून पुढे शेअर बाजाराचा डोलारा खाली येताना दिसतोय. फक्त भारतातच नाही तर जगभरातही, म्हणजे अमेरिकन डाओ जोन्स असेल, जर्मनीत डॅक्स आणि आशियातले निक्केई, हांगसेंगसारख्या निर्देशांकातही सध्या घसरणच सुरू आहे.
ही घसरण थांबणार कधी आणि गुंतवणुकदारांनी अशा वेळी काय करावं, हे आम्ही 5 तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
'म्युच्युअल फंड गुंतवणुकीला मरण नाही'
UTI म्युच्युअल फंडाच्या कार्यकारी उपाध्यक्ष स्वाती कुलकर्णी यांच्यामते शेअर बाजारातल्या घसरणीला जागतिक कारणं जबाबदार आहेत. आणि जागतिक बाजारही सध्या खाली येत आहेत.
"अमेरिकेत वाढत्या व्याज दराची चिंता आहे. त्याच वेळी भारतातही बजेटमध्ये दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% कर लावण्यात आला आहे. या गोष्टी शेअर बाजारासाठी प्रतिकूल आहेत. त्याचा परिणाम म्हणून जगभरात बाजार खाली आले आहेत," असं कुलकर्णी यांनी घसरणीची कारणं स्पष्ट केली.
पण त्याच वेळी एक सकारात्मक गोष्टही त्यांनी सांगितली - भारतीय बाजारात रोखता म्हणजे लिक्विडिटी आहे. त्यामुळे पुन्हा गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे बाजारात येतील, आणि वर्षभरात या धक्क्यातून बाजार सावरेल.
पगारदार नोकरवर्गासाठी त्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. "शेअर बाजारातल्या उतार चढावांवर जालीम उपाय म्हणजे SIPच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक," असं त्यांचं म्हणणं आहे.
'सध्याचा बाजार सेल ऑन रॅली'
अर्थतज्ज्ञ अभिजित फडणीस यांच्याकडून या घसरणीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला.
''या बजेटमध्ये सरकारने शेअर बाजारासाठी सकारात्मक अशी कुठलीही घोषणा केली नाही. लिस्टेड कंपन्यांचे कर कमी झाले नाहीत. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राला बजेटकडून कुठलाही थेट फायदा झाला नाही."
"उलट गुंतवणुकदारांसाठी दीर्घकालीन भांडवली नफा, म्हणजेच Long term capital gain आणला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची अशी नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे," असं डॉ. फडणीस यांनी घसरणीचं पहिलं कारण स्पष्ट केलं.
त्याच बरोबर जागतिक बाजारातल्या घडामोडीही सध्या सकारात्मक नाहीत. त्यामुळे बाजारांची पिछेहाट होत आहे, असं ते सांगतात.
"दीर्घकालीन गुंतवणुकदारांनी (ज्यांची गुंतवणूक वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे) घाबरण्याची काहीच गरज नाही. शेअर बाजार यातून सावरेल. सध्याचा बाजार हा 'सेल ऑन रॅली' म्हणजे आपला शेअर वाढला असेल तर थोडीफार नफावसुली करण्याचा आहे," असं डॉ. फडणीस यांचं मत आहे.
'प्रत्येक दशकातलं आठवं वर्षं बाजारासाठी खराब'
आताच्या घसरणीचं तांत्रिक म्हणजे आकडेवारीवर आधारित कारण समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. शेअर बाजार तज्ज्ञ सचिन कुलकर्णी यांनी शेअर बाजार निर्देशांकाचा मागच्या तीस वर्षांचा आलेखच समोर मांडला.
"1991पासून पाहिलं तर प्रत्येक तीन वर्षांच्या रॅलीनंतर एका वर्षाची घसरण अनुभवायला मिळाली आहे. आताही 2014 ते 2017 हा काळ तेजीचा गेला आहे. त्यानंतर ही घसरण पाहायला मिळते आहे.'
हातातल्या आलेखाच्या आधारावर कुलकर्णी हे बोलत होते. "प्रत्येक दशकातलं आठवं वर्षं खराब गेलं आहे, असं इतिहास सांगतो. यावेळी 9,500 पर्यंतचा तळ निफ्टी निर्देशांक गाठू शकतो," असं सचिन कुलकर्णी यांचं मत आहे.
नवीन गुंतवणूकदारांनी अशा उतार चढावांनी भरलेल्या बाजारापासून दूर राहावं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शेअरची खरेदी पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू करावी, असं ते म्हणतात.
"सराईत गुंतवणूकदारांनी सावध राहावं पण, गुंतवणूक सुरू ठेवायला हरकत नाही. कारण खराब बाजारातही काही शेअर चांगली कामगिरी करत आहेत," कुलकर्णी यांनी हे आवर्जून स्पष्ट केलं.
'देशी गुंतवणूकदार वाढले ही जमेची बाजू'
गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यांच्या व्यावस्थापनासाठी आपल्याकडे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात CDSL नावाची संस्था आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर यांच्या मते ही घसरण जास्तीत जास्त तीन महिने राहील.
"आताची मंदी ही स्वाभाविक मंदी आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या रॅलीनंतर आलेली मंदी आहे. फायदा खूप मिळाला असेल तर गुंतवणुकदार कधीतरी शेअर विकून मोकळा होणार आणि नफा कमावून बाहेर पडणार, या तत्त्वावर आलेली ही मंदी आहे," असं ठाकूर यांनी सांगितलं.
भारतीय बाजारांबद्दल त्यांना आणखी एक गोष्ट सकारात्मक दिसत आहे - "2015 पूर्वी भारतीय शेअर बाजारांमध्ये परदेशी गुंतवणुकदार आणि देशी गुंतवणुकदार यांचं प्रमाण 65:35 असं होतं, म्हणजे परदेशी गुंतवणुकदारांची संख्या जवळजवळ दुप्पट होती. ते प्रमाण आता तीन वर्षांत बरोबर उलटं झालं आहे."
"देशात म्युच्युअल फंडांच्या माध्यामातून शेअर बाजारात होणारी गुंतवणूक वाढते आहे. अशावेळी गुंतवणुकदारांनी जागतिक मंदीला घाबरण्याचं कारण नाही," असं ठाकूर यांना वाटतं.
'निवडक शेअरमध्ये गुंतवणूक फायद्याची'
शेअर बाजार तज्ज्ञ सुरेखा मशरूमवाला यांना आताची घसरण काळजी निर्माण करणारी वाटत नाही. "परकीय संस्थांनी केलेली विक्री, बँकेचे घोटाळे, दीर्घकालीन भांडवली कर, अशा घटनांमुळे सध्या बाजार झाकोळला गेला आहे," असं त्यांना वाटतं.
त्यामुळे सरकारी धोरणं ओळखून जिथं सरकारची गुंतवणूक असेल, अशा कंपन्या निवडण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
"कदाचित पुढचं एक वर्षं गुंतवणूकदारांसाठी कठीण असेल. पण या काळातही निवडक शेअर असे असतील जे चांगली कमाई करून देतील. ते ओळखता आले पाहिजेत," असं मशरूमवाला यांनी सांगितलं.
त्याच बरोबर ज्यांची आधीपासून गुंतवणूक आहे, अशांनाही त्यांनी एक सल्ला दिला आहे. "पुढचं एक वर्षं हे सावधतेचं असेल. पण या वेळेत तुमच्याकडे सध्या असलेले ब्लूचिप शेअर कमी किंमतीत पुन्हा खरेदी करण्याची संधी असेल," असं मशरूमवाला यांना वाटतं.
(वरील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. तेव्हा गुंतवणुकदारांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)