You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तुम्ही सलूनमध्ये कापलेल्या केसांना इथं सोन्याचा भाव आहे'
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, नैरोबीहून
नैरोबीचं सेंट्रल मार्केट मागे टाकलं आणि जरा आडवळणाला गेलं की येतो रिव्हररोड. हा नैरोबीचा डाऊनटाऊन भाग. याला नुसतं टाउनही म्हणतात. इथे येऊ नका, रात्री तर नाहीच नाही अशी तंबी सगळ्या विदेशी पर्यटकांना दिलेली असते, विशेषतः गोऱ्यांना. पण रिव्हररोड नही देख्या तो क्या देख्या असा अस्सल नैरोबीकर विचारणार.
मी सुदैवी, की मला तिकडे भटकायला जाता आलं, तेही रात्रीचं जीवाची नैरोबी करायला. हा भाग म्हणजे दिल्लीच्या पहाडगंज, चांदनी चौक किंवा मुंबईच्या धारावी गल्लीबोळात असणाऱ्या मार्केटची आठवण करून देणारा. थोडासा बकाल, गर्दीचा, चोराचिलटांचं भय. आणि कुठे काय मिळत हे फक्त जाणकारालाच कळणार बाकीचे नुसते येड्यावानी भिरभिरत बसणार.
इथे गेल्यावर एक करायचं, पाठीवरची बॅग गच्च धरायची नाही, म्हणजे चोरीला जाणार नाही. पण जर घट्ट धरलीस, आणि समोरच्याला वाटलं की यात काही मोलाच्या गोष्टी आहेत, मग तुमची बॅग गेलीच म्हणून समजा, माझी सहकारी रूथ सांगत होती.
तशी नैरोबीत माणसं कमी दिसतात, कारण देशाची लोकसंख्याच कमी. पण रिव्हररोडला गेल्यानंतर 'मेरा पिंड ते मेरा देस'ची आठवण होतेच. ही भलीमोठी गर्दी, त्यात टेम्पो, जीभडे भरणारे लोक. नैरोबीत पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या नावाने बोंबच आहे. अनेक प्रायव्हेट मालक आपापल्या बसेस चालवतात. त्यांना मटाटू म्हणतात. आसपासच्या लहानसहान खेड्यांमध्ये जाण्यासाठी ओम्नी टाईप गाड्या किंवा जीभडे.
रस्त्यांवरून चालताना धक्के लागत होते. केनियातली ऑफिसेस असणाऱ्या भागात, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय भागात अत्यंत सुनियोजित असणारा ट्रॅफिक पाहून लाज वाटायची, पण रिव्हररोडला आल्यानंतर घरी आल्यासारखं वाटलं. वेड्यावाकड्या धावणाऱ्या गाड्या, एकमेकांवर ओरडणारे ड्रायव्हर आणि कसाही रस्ता क्रॉस करत पायी चालणारे लोक.
इथल्याच गल्ल्यांमध्ये आहे नैरोबीतल्या फॅशन दुनियेची चावी. इथे असंख्य सलून्स आहेत, आणि आहेत विग्सची दुकानं.
केसांचे वेगवेगळे विग म्हणजे नैरोबीच्या फॅशन करणाऱ्यांसाठी प्राणवायू इतकी महत्वाची गोष्ट. एकेका गल्लीमध्ये रांगेनं असणारी 15-15 दुकानं याची साक्ष देतच होती.
रूथ मला एका गल्लीत घेऊन गेली. जेमतेम दोन माणसं उभी राहू शकतील इतका दुकानांचा आकार, पण त्यातले वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे, टेक्स्चरचे केस पाहून थक्क व्हायला होतं. मानवी इतिहासात माहिती असतील नसतील तेवढे केसांचे प्रकार आणि रंग त्या 10 बाय 10 च्या दुकानात सजवून ठेवले होते.
गल्लीतून जात जात लोक हाक मारून मारून आमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते, या आमच्याकडे, तुम्हाला हवे तसे केस, हव्या त्या रंगात, हव्या त्या ढंगात बनवून देतो, वरून स्पेशल डिस्काउंट पण मिळेल. तिथल्याच एका दुकानात भेटली युनिस. समोर ठेवलेल्या काळ्याभोर लांबसडक विगवर पाणी शिंपडत होती. (आपल्याकडे बेशुद्ध पडलेल्या भाजीला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी मारत ना, तसलाच प्रकार वाटलं मला.)
रूथ मात्र सराईतपणे 'ये दिखाओ, वो दिखाओ. यात हा रंग नाही का, त्यात ते टेक्सचर नाही का' करायला लागली.
मी मात्र अवघडल्या सारखं उभे होते, मग युनिसनेच विचारलं, "तुला नाही आवडलं का काही?"
म्हटलं, "नाही मस्त आहेत गं सगळे, पण मी काय करू यांचं."
आता आश्चर्यचकित व्हायची पाळी तिची होती. "काय करू म्हणजे? घालायचे की. ड्रेसला मॅचिंग, साजेसे केस."
मॅचिंग कानातले ऐकले होते, पण मॅचिंग केस? ही फॅशनची केस माझ्या हाताबाहेर चालली होती.
"म्हणजे घेतात का कोणी हे विग?" मी आपला भारतीय प्रश्न विचारलं, "त्याशिवाय का ही दुकानं भरलीयेत, तिने विचारलं. (तुळशीबागेत दुकान असणार हिचं मागच्या जन्मी!) कदाचित तिला असावी, स्वतःहूनच म्हणाली, तुला विग नको असेल तर समजू शकते मी. तुझे केस छान आहेत. आता मी भोवळ येऊन पडायची शिल्लक होते, माझ्या केसांना शेवटचं, बाकी कोणी सोडा, मी तरी छान कधी म्हणाले होते मला आठवत नव्हतं.
आज दैव आपल्यावर इतकं का खुश झालं, याचा विचार करत असताना ती म्हणाली, "तुम्हा भारतीयांचे केस छान असतात." अच्छा, मी भारतीय आहे म्हणून सरसकटीकरण झालंय होय. मी काही बोलणार तेवढ्यात समोरच्या विगकडे (तोच तो, मगाशी पाणी मारलेला) हात करून म्हणाली, "हे केस पण भारतातून आलेत. भारतीय केसांना इथे खूप मागणी असते."
भारतीय महिलांसारखे केस असणं इथे सौंदर्याचं लक्षण समजलं जातं.आजकाल इथला हा हॉट ट्रेंड आहे. "आमच्याकडे भारतातून खूप केस येतात. खरं सांगायचं तर भारतीय केसांना सोन्यासारखी किंमत आहे इथे. हा जो विग दिसतोय ना, हा 35,000 केनियन शिलिंग्सचा (जवळपास 23 हजार रुपये) आहे. यातला एकूणएक केस खरा आहे. हा विग टिकणार पण जास्त आणि याची काळजी पण खूप घ्यावी लागणार नाही. मुख्य म्हणजे याचा फील खूप सॉफ्ट आहे."युनिस सांगत होती ते काही खोटं नावात. काळेभोर लांबसडक केस होते ते. हात लावला तर खरंच सॉफ्ट होते. अशा केसांसाठी आपण भारतीय बायका मरतो, तर केनियन बायका का नाही म्हणतील याला.
सगळेच विग एवढे महाग आहेत? मी आपला मध्यमवर्गीय प्रश्न विचारला, तिने हसत हसत पलीकडे बोट दाखवलं. "तो दिसतोय ना, ब्लॉन्ड बॉबकटवाला विग, तो 2500 केनियन शिलिंग्सचा आहे. हा दिसतोय, ये 4000 चा, मागे आहेत त्यांची रेंज 3000 पासून सुरु होते."
"मग हा एवढा महागडा विग, आणि हे बाकीचे विग यांच्यात काय फरक", मी विचारलं. "कारण हा खऱ्या केसांचा आहे. खरे केस महाग असतात. हे स्वस्त विग आहेत ना, ते खोट्या केसांचे आहेत, त्यांना सिंथेटिक केस असंही म्हणतात. ते नायलॉनपासून बनवलेले असतात."
युनिसकडे भारतभरातून केस येतात. "आमच्याकडे केस आले कि आम्ही त्यांची वर्गवारी करतो. त्यातले जे सर्वोत्तम क्वालिटीचे असतील ते वेगळे काढतो, मग त्यापेक्षा बरे, ठीकठाक आणि मग सगळ्यात खराब. मग पुन्हा त्या केसांचं त्यांच्या लांबी वरून वर्गीकरण होतं आणि फायनली विग बनतात. आम्ही ते इथेच बनवतो कारण ते आम्हाला स्वस्त पडतं. पूर्वी आम्ही भारतातून डायरेक्ट विग आयात करायचो पण ते खूप महाग जायचं."
भारतीयांच्या खालोखाल पेरुव्हिअन, ब्राझिलियन, मलेशियन अशा बायकांचे केस इथे पॉप्युलर आहेत. हा, एक सांगायचं राहिलं, हे सगळं केस आख्यान फक्त बायाबापड्यांसाठी. पुरुषांना काही स्टाईल वगैरे नाही. मला दिसले तेच अनेक पुरुष चमनगोटावाले. एखादा विशीतला पोरगा केस वाढवून त्याच्या छोट्या छोट्या वेण्या घालून फिरतो.
आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांचे केस मुळातच अति कुरळे आणि राठ. म्हणूनच त्यांना आपल्या भारतीय केसांचं आकर्षण. "भारतीय बायकांचे केस किती मस्त असतात," आता पहिल्यांदाच रूथ आमच्या संभाषणात सहभागी झाली होती, तिला हवा होत वेणीचा लांबसडक शेपटा किंवा त्याचा विग म्हणा, आणि तो काही तिला मनासारखा मिळत नव्हता. मनात म्हटलं, बाई आमच्या बायांनी शेपटा टाकून वर्ष उलटली आणि तू शेपटा शोधतेस. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.
रुथचे केसही वाईट नाहीत. म्हणजे मला जामच आवडले. तिच्या कुरळ्या केसांच्या तिने बारीक बारीक वेण्या घातल्यात. आणि काही केस जांभळ्या रंगात रंगवलेत. एकंदरच मला नैरोबीतल्या बायकांनी केलेले केसांचे प्रकार आवडले. तिला विचारलं, या वेण्या सुटत नाही का, तर म्हणे माझ्या दोन महिने झाल्या तशाच आहेत. थोड्या सैल झाल्यात.
या अशा वेण्या घालणं इथे खूप पॉप्युलर आहे कारण आफ्रिकेतल्या गरम वातावरणात अति कुरळ्या केसांचा डाला सांभाळणं प्रचंड कठीण काम आहे. सतत घाम येत राहणार, धूळ साठत राहणार आणि त्यांना धुणंही सोपं नाही. म्हणून या बायका पोरी एक वेण्या घालतात किंवा केस अगदीच कमी करतात. चमनगोटा केलेली बाई इथे दुर्मिळ नाही.
आणि म्हणूनच विग इथे लोकप्रिय आहेत. ते लावायची पण विशिष्ट पद्धत आहेत. मुळात विग वापरायचा असेल तर आपले केस एकदम कमी करायचे. जवळपास टक्कल म्हणा ना. मग विग लावायच्या आधी डोक्यावर स्टॉकिंग लावायचा आणि मग वरून विग लावून पक्का करायचा.
केनियामधली कृत्रिम केसांची इंडस्ट्री प्रचंड मोठी आहे. त्याची वार्षिक उलाढाल १४ अब्ज रुपये इतकी आहे.
गरीब श्रीमंत असल्या आयाबायांना आपले केस सुंदर हवे असतात, त्यासाठी विग किंवा हेअर एक्सटेन्शन्स हवे असतात. किबेरा ही केनियातली सगळ्यात मोठी आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. पण तिथेही हेअर सलून्सची रेलचेल आहे.
केनियातला केसांशी संबंधित असणाऱ्या सौन्दर्य प्रसाधनांचा तसंच नैसर्गिक केसांचा विग बनवण्याचा मोठा बिझनेस भारतीय गोदरेज कंपनीकडे आहे. या कंपनीच्या आफ्रिका हेअर विभागाच्या मार्केटिंग हेड असणाऱ्या रूथ मावागांगी केनियन माध्यमांशी बोलताना एकदा म्हटल्या होत्या, "त्या महिलेला वाटतं, कि आपले केस चांगले असतील तर त्याने अनेक दरवाजे उघडतात. इंटरव्यूचा कॉल येतो, बॉयफ्रेंड तिच्यावर फिदा होतो किंवा चांगला नवरा मिळतो. पण मुख्य म्हणजे तिला वाटतं की समाजात आपली किंमत वाढलीये."
मला आपल्या देशातल्या गोऱ्या करणाऱ्या क्रीम्स आठवल्या. कृत्रिम केस असो वा गोऱ्या करणाऱ्या क्रीम्स, दोघांचा हेतू एकच. तुझ्यात काहीतरी कमतरता आहे हे बाईला ठसवून सांगणं.
उशीर झाला होता म्हणून निघालो. युनिसकडचा छोट्या तपकिरी केसांचा विग मला आवडला होता. सिंथेटिक केसांचा होता म्हणून फार महाग नव्हता. पण तरीही घेऊन करायचं काय हा प्रश्न होताच. तिला म्हटलं, "बघ, इथे येण्याआधी मी माझे केस कापले. बऱ्यापैकी वाढले होते. आधी माहित असतं तर इथेच कापले असते आणि तुला दिले असते. त्या बदल्यात हा विग घेऊन गेले असते." दोघी हसलो.
पण असं घडणं अगदीच अशक्य नाहीय. या वीकेंडला तुम्ही सलूनमध्ये किंवा तुमच्या आवडत्या पार्लरमध्ये जरी केस कापले, तरी ते कदाचित काही दिवसांनी केनियाच्या डाउनटाउनमध्ये सापडतील. कारण रूथ म्हटली तसं, तुमच्या (भारतीयांच्या) केसांना इथे सोन्याचा भाव आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)