You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Miss Universe: कृष्णवर्णीय महिलांसाठी हे वर्ष महत्त्वाचं का आहे?
जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाच सौंदर्यस्पर्धांसाठी यंदाचं वर्षं खूप खास ठरलं. कारण या पाचही स्पर्धांमध्ये कृष्णवर्णीय तरुणींनी बाजी मारली आहे. सौंदर्यस्पर्धांच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे.
जमैकाची टोनी - अॅन सिंग ही 69 व्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेची विजेती ठरली. 111 देशांतील स्पर्धकांना मागे टाकत जमैकाच्या या 23 वर्षीय विद्यार्थिनीने विजय मिळवला. 'मिस वर्ल्ड'चा किताब मिळवणारी टोनी ही चौथी जमैकन तरुणी ठरली आहे.
मानसशास्त्र आणि महिलाविषयक अभ्यासक्रमात पदवी मिळवलेल्या टोनीला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर बनायचं आहे.
स्पर्धा जिंकल्यावर तिनं ट्वीट करुन म्हटलं, "जमैकातल्या सेंट थॉमसमधल्या त्या लहान मुलीसाठी आणि जगभरातल्या सगळ्या लहान मुलींसाठी - स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात घ्या तुम्ही तुमची स्वप्न साकार करायला सक्षम आहात. तुमच्या आयुष्याला अर्थ आहे, ध्येय आहे."
गेल्या आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेच्या झोझिबिनी टुन्झी हिनं 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा जिंकली. आपले नैसर्गिक केस मिरवतानाच या सौंदर्यवतीने इंडस्ट्रीमधील सौंदर्याच्या निकषांवर उघडपणे टीका केली होती.
स्पर्धा जिंकल्यावर तिनं म्हटलं होतं, "मी ज्या जगात लहानाची मोठी झाले तिथे माझ्यासारख्या दिसणाऱ्या मुलीला - माझ्यासारखी कांती आणि केस असणाऱ्या मुलीला - कधीही सुंदर समजलं जायचं नाही."
"मला वाटतं आज याला पूर्णविराम मिळेल. लहान मुलींनी माझ्याकडे, माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसावं, अशी माझी इच्छा आहे."
प्रसिद्ध टीव्ही मुलाखतकार ओप्रा विन्फ्री यांनी ट्वीट करत झोझिबिनीचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं, "अभिनंदन मिस साऊथ आफ्रिका, नवीन मिस युनिव्हर्स @zozutunzi ! मी तुझ्याशी सहमत आहे. आपण आपल्या तरुण मुलींना नेतृत्व कौशल्यं शिकवणं महत्त्वाचं आहे."
त्याआधी याच वर्षात अमेरिकेमध्ये झालेल्या तीन सौंदर्यस्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय तरुणींना मिळाल्यामुळे भेदभावाचे आरोप झालेले होते.
सप्टेंबरमध्ये निया फ्रँकलिनने 'मिस अमेरिका' हा किताब जिंकला. पाठोपाठ कलिआ गॅरिसने 'मिस टीन युएसए' आणि चेस्ली क्राईस्टने 'मिस युएसए' स्पर्धा जिंकली.
1940 च्या दशकापर्यंत 'व्हाईट रेसच्या' म्हणजे गौरवर्णीय नसलेल्या महिलांना 'मिस अमेरिका' स्पर्धेत भाग घेण्यास मनाई होती. त्यानंतर नियमांत बदल करण्यात आला. पण 1970 पर्यंत कृष्णवर्णीय महिला 'मिस अमेरिका' स्पर्धेत सहभागी झाल्या नाहीत.
'मिस वर्ल्ड' स्पर्धेत मिस जमैकाने बाजी मारली आणि सोशल मीडियावर ताबडतोब प्रतिक्रिया उमटल्या.
अमेरिकेतल्या नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील कर्स्टन क्लार्क यांनीही ट्विटरवर याविषयीचं आपलं मत मांडलंय. या महिलांची निवड ही फक्त त्यांच्या सौंदर्यावरूनच नाही तर समाजासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या योजनांवरूनही करण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.
त्यांनी लिहिलंय, "मिस वर्ल्डला डॉक्टर व्हायचंय. मिस युएसए तुरुंगातल्या कैद्यांसाठी काम करते. मिस युनिव्हर्स लैंगिक भेदामुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात काम करते. मिस अमेरिका ही कलेचा पुरस्कार करते. मिस टीन युएसने अपंगत्व असणाऱ्या लोकांसाठी संस्था सुरु केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कृष्णवर्णीय आहेत."
अनेक सौंदर्यस्पर्धांनी गेल्या काही काळामध्ये आपल्या नियमांत बदल केले असून आता या स्पर्धांमध्ये शारीरिक सौंदर्यासोबतच स्पर्धकांनी आतापर्यंत साध्य केलेल्या गोष्टींचाही समावेश केला जातो.
मिस अमेरिका स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या संस्थेने गेल्यावर्षी स्विमसूट कॉन्टेस्ट यापुढे बंद करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना जमैकाच्या टोनी अॅन सिंगने आपण एका विशेष वर्गाचं, जग बदलण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या पिढीचं प्रतिनिधित्त्वं करत असल्याचं म्हटलं होतं.
या सौदर्यंस्पर्धांच्या आयोजकांवर दीर्घकाळापासून वर्णभेद आणि पूर्वग्रह दूषित असल्याचे आरोप होत आले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)