कोरोना साथीसाठी वटवाघळांना दोष देणं योग्य आहे का?

    • Author, हेलन ब्रिग्स
    • Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी

डॉ. मॅथ्यू बरगॅरेल यांनी पवित्र गुहेत जाण्यासाठी गावातील ज्येष्ठांची परवानगी घेतली. आत्म्यांना समाधानी करण्यासाठी भेटवस्तूही घेतल्या. त्यांनी मास्क आणि तीन थरांचे हातमोजे घातले. दोरीच्या शिडीच्या साहाय्याने गुहेत उतरण्यास त्यांनी सुरुवात केली. तिथं प्रत्येक ठिकाणी वटवाघळांचा तीव्र दर्प पसरला होता. त्यांचं मल-मूत्र ठिकठिकाणी पडलेलं होतं.

अधूनमधून एखादा वटवाघूळ त्यांच्या दिशेने येत बाजूने उडत जायचं.

झिम्बाब्वेच्या या परिसरात लोक वटवाघळांना पंखवाला ड्रॅगन, उडणारा उंदीर किंवा वाईट गोष्टींचं प्रतिक म्हणून संबोधतात. जगातील इतर ठिकाणांप्रमाणेच वटवाघळांबाबत इथं अनेक दंतकथा किंवा अंधश्रद्धा आहेत. पण इकोलॉजिस्ट डॉ. मॅथ्यू यांच्या दृष्टीने तो एक सुंदर आणि अद्भुत जीव आहे.

डॉ. मॅथ्यू यांच्या मते, वटवाघूळ आकर्षक आहे. पण लोकांना त्याच्याबाबत माहिती नाही. लोक अनोळखी गोष्टींनाच जास्त घाबरतात.

वटवाघूळ वाचवण्यासाठी मोहीम

डॉ. मॅथ्यू सिराड येथील फ्रेंच रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये विषाणूंवर संशोधन करत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ झिम्बाब्वेमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करताना ते वटवाघळांच्या गुहेत जातात. तिथं नमुने गोळा करून ते परत येतात.

प्रयोगशाळेत या नमुन्यांचा अभ्यास केला जातो. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत एकाच प्रजातींच्या वेगवेगळ्या कोरोना व्हायरसचा शोध लावला आहे. उदाहरणार्थ सार्स आणि कोव्हिड-19 चा व्हायरस.

हे शोध जगभरात वटवाघळांमधून पसरणाऱ्या व्हायरसची आनुवंशिक बनावट आणि त्याचे गुणधर्म ओळखण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयोगांचा भाग आहेत.

या विषाणूंच्या प्रसारावर तत्काळ प्रतिबंध घालण्यासाठी खबरदारीच्या दृष्टीकोनातून हे सर्व प्रयोग करण्यात येत आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ झिम्बाब्वेच्या डॉ. एलिझाबेथ गोरी सांगतात, स्थानिक लोक नेहमी या वटवाघळांच्या ठिकाणी जात असतात. ते तिथून गुनाओ (एक प्रकारचं खत) गोळा करतात. शेतातील पीकांची वाढ होण्यासाठी या खतांचा उपयोग होतो.

त्यामुळे नेमके कोणत्या प्रकारचे विषाणू वटवाघळांमधून माणसांमध्ये येऊ शकतात, हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं.

वटवाघळांवर काम संशोधन करत असलेल्या तज्ज्ञांनी 'वटवाघळांना दोष देऊ नका' नामक एक मोहीम सुरू केली आहे.

वटवाघळांबाबत विनाकारण असलेली भीती आणि गूढ दूर करण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला आहे.

खरं तर, वटवाघळांना सध्या संरक्षणाची गरज आहे, त्यामुळे या मोहिमेचं महत्त्व अधोरेखित आहे.

जगात सर्वात कमी लेखण्यात आलेला, चुकीचा ठरवण्यात आलेला जीव म्हणजे वटवाघुळ, असं स्पष्ट मत गोरी नोंदवतात.

वटवाघुळ गेल्या कित्येक वर्षांपासून सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने पूर्वग्रहांचा शिकार बनत आले आहेत.

त्यांना मानवावर येणाऱ्या संकटासाठी जबाबदार धरलं जातं. कोरोना काळात तर ही भीती जास्तच वाढल्याचं दिसून येईल.

वटवाघळांबाबत काही गोष्टी

वटवाघुळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे.

कीडे खाणाऱ्या वटवाघळांमुळे अमेरिकेत शेतकऱ्यांचा प्रचंड फायदा होतो. तिथं वटवाघळांमुळे जवळपास साडेतीन अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचं पीक सुरक्षित राहतं.

झाडांच्या 500 हून अधिक प्रजाती परागकणांसाठी वटवाघळांवर अवलंबून आहेत.

क्लायमेट चेंज, शिकार आणि इतर कारणांमुळे वटवाघळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरी समस्या

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. हे नाकारता येणार नाही.

अशा प्रकारचे व्हायरस प्राण्यांमधून मानवात येतात, किंबहुना वटवाघळातून मानवी शरीरात दाखल होतात, याबाबत शास्त्रज्ञांचं मोठ्या प्रमाणात एकमतही आहे.

पण याचा अर्थ आपण विषाणूंच्या प्रसारासाठी वटवाघळांना दोष द्यावा, असं नाही. खरी समस्या मानवाने जंगली जनावरांच्या जगात केलेलं अतिक्रमण ही आहे.

आजारांचं मूळ कारण मानवाकडून निसर्गाच्या होणाऱ्या नुकसानीमध्ये दडलेलं आहे.

जंगल किंवा गवताळ प्रदेश माणून रस्ते बांधण्यासाठी, इतर बांधकामांसाठी किंवा शेतीसाठी करू लागला तर तिथं राहणारे जीव-जंतू मानवी जगात येण्यास प्रवृत्त केले जातील. ते सर्वप्रथम अन्नधान्याच्या शोधात शेतात-गोदामांमध्ये येतील. तिथून त्यांच्यातील विषाणू मानवी शरीरात दाखल होईल.

पोर्तुगालमधील युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टो येथील रिकार्डो रोचा सांगतात, "वटवाघूळ हा प्राणी इतर जनावरांप्रमाणेच रोगांचं वहन करू शकतो, ही गोष्ट नाकारता येणार नाही. आपण वटवाघळांचा बंदोबस्त करण्याच्या गोष्टी करतो. पण इतर पाळीव प्राणी, पक्षी यांच्यातून विषाणू संसर्गाचा धोकासुद्धा तितकाच असतो, हे विसरून चालणार नाही."

दरवर्षी चारपैकी प्रत्येकी तीन संसर्गजन्य आजार प्राण्यांमधूनच मानवांमध्ये येतात, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

2002 मध्ये चीनमध्ये एका गूढ आजाराचा धोका निर्माण झाला होता. त्याला सार्स असं नाव देण्यात आलं. या आजाराने जगभरात 800 जणांचा मृत्यू झाला होता.

2017 मध्ये संशोधकांना चीनच्या युनान प्रांतातील दुर्गम भागातील गुहांमध्ये वटवाघळांची वस्ती आढळून आली होती.

या वटवाघळांमधूनच सार्स व्हायरसचा संसर्ग मानवामध्ये होतो. आगामी काळात अशाच प्रकारचा आजार पुन्हा एकदा पसरू शकतो, असा इशारासुद्धा संशोधकांनी त्यावेळी दिला होता. हा अंदाज नंतर खरा ठरल्याचं दिसून येईल.

डॉ. रोचा यांच्या मते, "कोणत्याही एका किंवा दोन प्रजातींना दोष देण्याऐवजी आपण निसर्गासोबत आपल्या संबंधांबाबत आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे."

वटवाघुळ निसर्गाच्या परिसंस्थेतील एक महत्त्वाचा भाग आहे. मानवासाठी तो अत्यंत उपयोगी आहे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे.

वटवाघळांची गरज

वटवाघूळ पिकांना नष्ट करणाऱ्या किटकांना खातात. परागकणांच्या देवाण-घेवाणीसाठी वटवाघूळ हे महत्त्वाचे ठरतात. यामुळे कोकोआ, व्हॅनिला आणि ड्यूरियन फळांच्या झाडांच्या प्रजनन प्रक्रियेत मदत होते. वटवाघुळ झाडांच्या बिया पर्जन्य वनांमध्ये, रानावनांत पसरवतात. ज्यामुळे जलवायू परिवर्तनाशी निपटण्यास मदत होते.

युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोचे डॉ. डेव्हिड रॉबर्टसन सांगतात, "वटवाघळांना खलनायक म्हणून पाहिल्यास आपल्यालाच गंभीर परिणाम भोगावे लागतील. जनावरांमधून मानवामध्ये आलेल्या विषाणूंसाठी मानवच जबाबदार आहे. मानवाने त्यांच्या जीवनात हस्तक्षेप केल्याने ते इथं दाखल झाले आहेत."

कोरोनाच्या व्हायरस साथीनंतर भारतासह, चीन, ऑस्ट्रेलिया, पेरू आणि इंडोनेशिया यांच्यासारख्या देशांमध्ये वटवाघळांना लक्ष्य केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

कोणतीही माहिती न घेता केलेल्या कारवाईमुळे वटवाघळांच्या अस्तित्वावर गदा येऊ शकते. यामुळे इतर विषाणू पसरण्याचा धोकासुद्धा वाढेल.

युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजचे डग्लस मॅकफेरलेन यांच्या मते, "वटवाघळांच्या अनेक प्रजाती विलुप्त होण्याच्या स्थितीत आहेत. वटवाघळाचं शेकडो वर्षांपासून मानवासोबत सहअस्तित्व आहे. याचा दोघांनाही लाभ झालेला आहे. त्यांच्या नष्ट होण्यामुळे मानवालासुद्धा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)