कोरोना व्हायरसः 'या' देशात कोरोनाचं नाव काढलं तरी हातात पडतील बेड्या

जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र, लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक देश वेगवेगळे उपाय राबवताना दिसतोय. यातले काही तुम्हाला थोडे विचित्र वाटू शकतात. मात्र, त्यांचा उद्देश लॉकडाऊन यशस्वी करणं, एवढाच आहे. एक दृष्टीक्षेप टाकूया जगातील लॉकडाऊनच्या अशाच काही अनोख्या पद्धतींवर...

पनामा

सेंट्रल अमेरिकेतील या देशात आतापर्यंत कोरोना विषाणुचे जवळपास एक हजार रुग्ण आढळले आहेत. पनामामध्ये देखील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, इथला लॉकडाऊन इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत जरा वेगळा आहे.

पनामामध्ये जेंडरवर आधारित लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडता येतं. मात्र त्यासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी काही नियम आहे.

उदाहरणार्थ आठवड्यातले काही दिवस स्त्रियांसाठी तर काही दिवस पुरुषांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

महिला सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दोन तासांसाठी घरातून बाहेर पडू शकतात. तर पुरुषांसाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे दिवस ठरवण्यात आले आहेत. रविवारी कुणीही बाहेर पडायचं नाही.

कोलंबिया

कोलंबियामधील काही भागामध्ये लोकांना त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रावरील शेवटच्या क्रमांकाच्या आधारे बाहेर पडायला परवानगी आहे.

उदाहरणार्थ बॅरानकॅबरमेजा भागात राहणाऱ्या ज्या नागरिकांचा आयडी क्रमांक 0, 4, 7 या अंकाने संपतो ते सोमवारी खरेदीसाठी बाहेर पडू शकतात. तर ज्यांच्या आयडी क्रमांक 1, 5, 8 अंकाने संपतो ते मंगळवारी बाहेर पडू शकतात. येणाऱ्या काळात बोलिव्हियामध्येसुद्धा हाच नियम लागू झालेला पहायला मिळू शकतो.

सर्बिया

सर्बियामध्येदेखील लॉकडाऊन आहे आणि लोकांची गर्दी होऊ नये यासाठी तिथे 'डॉग-वॉकिंग' अवर लागू आहे. म्हणजे तिथे रात्री 8 ते 9 ही वेळ कुत्र्यांना फिरवण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.

मात्र या आदेशाला विरोध झाल्यानंतर तो मागे घेण्यात आला. एका पशुवैद्यकाने सांगितलं की कुत्र्यांना संध्याकाळी फेरफटका मारला नाही तर त्यांना अनेक आजार होऊ शकतात. विशेषतः मूत्रपिंडाचे आजार.

त्यामुळे ज्या घरांमध्ये कुत्री आहेत त्यांनाही कुत्र्यांपासून आजार होण्याची शक्यता असते.

बेलारूस

बेलारुसच्या पंतप्रधानांवर काही दिवसांपूर्वी बरीच टीका झाली.

बेलारुसचे अध्यक्ष अॅलेक्झँडर लुकेशेंका यांना जेव्हा विचारलं की देशाला कोरोना विषाणुच्या संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना का करत नाही. तेव्हा ते हसत म्हणाले होते, "मला तर विषाणू दिसत नाहीय."

आईस हॉकीच्या एका सामन्यावेळी एका टिव्ही पत्रकाराने लुकेशेंका यांना विचारलं की हा सामना स्थगित का केला नाही. त्यावर ते म्हणाले होते की या सामन्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही. कारण स्टेडियममधला गारठा विषाणू पसरू देणार नाही.

लुकेशेंको म्हणाले होते, "इथे कुठलाच विषाणू नाही. तुम्ही तो उडताना बघितलेला नाही. हो ना? मीही नाही पाहिलं. बघा. इथे बर्फ आहे. विषाणू मारण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे." युरोपातील इतर राष्ट्रांप्रमाणे बेलारुसने एकही क्रीडा स्पर्धा रद्द केलेली नाही.

स्वीडन

आपल्या शेजारील राष्ट्रांप्रमाणे स्वीडनने अजून तरी फारशी तयारी केलेली नाही. तेथील सरकार निवांत असल्याचं दिसतं. स्वीडनमधली परिस्थिती चांगली आहे, अशातला भाग नाही. स्वीडनमध्ये कोव्हिड-19 आजाराचे साडे चार हजारांहून अधिक रुग्ण आढळलेले आहेत.

जनता जबाबदारीने वागेल आणि योग्य पावलं उचलेल, असं तिथल्या सरकारचं म्हणणं आहे. गेल्या रविवारीपासून स्वीडनमध्ये 50 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मात्र, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या शाळा अजून सुरू आहेत. पब आणि रेस्टॉरंट अजूनही टेबल सर्विस देत आहेत आणि बरेच जण अजूनही सामूहिक कार्यक्रम करत आहेत.

मलेशिया

मलेशियामध्ये अंशतः लॉकडाऊन आहे. दरम्यानच्या काळात सरकारला आपल्या एका वक्तव्यावरून माफी मागावी लागली.

मलेशियातील महिला मंत्रालयातर्फे एक व्यंगचित्र ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात स्त्रियांना सल्ला दिला होता की तुम्ही मेकअप करा, नट्टापट्टा करा मात्र आपल्या जोडीदाराशी भांडू नका.

या व्यंगचित्रावर बरीच टीका झाल्यानंतर सरकारला माफी मागावी लागली. सोशल मीडियावर झालेल्यावर टीकेनंतर सरकारने हे व्यंगचित्र मागे घेतलं.

तुर्कमेनिस्तान

कोरोनाच्या साथीपासून बचावासाठी तुर्कमेनिस्तानमध्ये वेगळी पावलं उचलण्यात आली आहेत. इथे कोरोना विषाणू या शब्दावरच बंदी आहे.

तुर्कमेनिस्तान क्रॉनिकल या वृत्तपत्रातील बातमीनुसार सरकारने त्यांच्या हेल्थ इन्फॉर्मेशन ब्रोशरमधून हा शब्दच काढला आहे. रेडिओ अजतलाईकमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या मते देशात जो कुणी कोरोना विषाणुविषयी बोलताना किंवा मास्क बांधून फिरताना दिसेल त्याला अटक करण्यात येईल.

अधिकाऱ्यांच्या मते तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोनाचा अजून एकही रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे तुर्कमेनिस्तानची सीमा इराणला जोडून आहे आणि इराण कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित झालेल्या देशांपैकी एक आहे.

ऑस्ट्रिया

निरोगी आणि सुदृढ लोकांनी मास्क बांधायची गरज नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. ते एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करत असतील तर मास्क बांधू शकतात. मात्र, ऑस्ट्रियामध्ये सुपर मार्केटमध्ये मास्क बांधणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रिया जगातील चौथा देश आहे ज्याने सार्वजनिक ठिकाणांवर मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी झेक प्रजासत्ताक, स्लोवाकिया आणि हर्जेगोविना या देशांमध्ये मास्क वापरणं बंधनकारक होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)