You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसः लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी भारताचा 'एक्झिट प्लॅन' काय असेल?
15 एप्रिलला देशभरातलं लॉकडाऊन संपणार का आणि कामं पूर्वीसारखी परत सुरु होणार की त्याचा कालावधी वाढणार, हा देशातल्या प्रत्येकाच्या मनातला प्रश्न या क्षणी आहे.
केंद्र वा राज्य सरकारांकडून लॉकडाऊन कधी आणि कसं संपणार याबद्दल अधिकृतरित्या काहीही सांगितलं जात नाही. संदिग्धता कायम आहे.
असं म्हटलं गेलं की जगभरात अनेक ठिकाणी जसा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला, तसा भारतासह महाराष्ट्रातही वाढवण्यात येईल. पण जेव्हा याविषयीची चर्चा आणि बातम्या जेव्हा येऊ लागल्या केंद्र सरकारला त्यावर खुलासा करण्यात आला.
'प्रसार भारती'नं ट्विटरवर केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांच्या उल्लेखानं खुलासा करत असं म्हटलं की केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही. पण याचा अर्थ असा आहे का की सरकार 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारच नाही?
त्यासाठी वेगवेगळ्या केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी, विविध विभागांनी, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत केलेल्या विधानांकडे पहावे लागेल.
अधिकृतरित्या कोणीही लॉकडाऊन हटवण्याची वा तो वाढवण्याची घोषणा अद्याप केली नसली तरीही सरकारी धोरण कोणत्या दिशेनं चाललं आहे याचा अंदाज त्यावरून येऊ शकतो.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी कोरोना नियंत्रणाच्या कामाबद्दल चर्चा केली. या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीबाबत विचारणा केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात असं म्हटलं की, "यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी 15 एप्रिलनंतर एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं याचं नियोजन करावं आणि कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील आणि सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असं समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना दिल्या."
यावरून लॉकडाऊन संपवण्याचा निर्णय झाला आहे की तो अधिक वाढवण्याचा हे स्पष्ट होत नाही. तो टप्प्याटप्प्याने संपणार आहे की त्या त्या भागातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीनुसार काही ठिकाणी तो संपेल आणि काही ठिकाणी वाढेल, असे प्रश्न निर्माण होतात.
पण अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मात्र या बैठकीनंतर ट्विट करतांना पंतप्रधान मोदी यांनी 15 एप्रिलला लॉकडाऊन संपेल असं सांगितलं. पण याचा अर्थ असा होत नाही की रस्त्यावर सगळ्यांना मोकळं फिरता येईल, तर सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन हेच कोरोनाशी लढण्यासाठी उपाय असल्याचंही त्यांनी लिहिलं.
खांडू यांच्या या ट्विटनंतर लॉकडाऊन संपणार असल्याचं स्पष्ट झालं आणि तशा बातम्याही सुरु झाल्या. पण त्यानंतर थोड्या कालावधीतच हे ट्विट काढून टाकण्यात आलं. "लॉकडाऊनच्या कालावधीविषयीचं ट्विट ज्या अधिका-यानं केलं त्याची हिंदीची समज मर्यादित आहे. त्यामुळे हे ट्विट काढून टाकण्यात आलं आहे," असा खुलासा खांडू यांना करावा लागला.
पण त्यामुळे प्रश्न अधिकच गडद झाले. लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे पण त्याविषयी लोकांमधलं गांभीर्य कमी होईल म्हणून आत्ताच जाहीर करायचे नाही आहे की सरकारनं अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही आहे?
अर्थात हा निर्णय घेणं हे केंद्र आणि राज्य सरकारांसाठी घेणं अतिशय अवघड आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग देशात किती आणि कसा वाढेल याचा पूर्ण अंदाज येत नाही आहे, त्या आणीबाणीच्या स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा तयार होते आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे होणारं आर्थिक नुकसानही प्रत्येक दिवसागणिक वाढते आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन कायम राहिल का हा प्रश्नावर उत्तर देतांना म्हटलं आहे की, "आम्ही तो अशा प्रकारे शिथिल करू की शेतकरी त्यांचा शेतीमाल बाजारपेठांपर्यंत घेऊन जाऊ शकतील. आम्ही चर्चा करतो आहोत आणि मार्ग शोधायचा प्रयत्न करतो आहोत. पण कर्फ्यू मात्र राहणारच. मी तो पंजाबमध्ये असा लगेच उठवणार नाही. मी कोणतीही तारीख वा वेळ सांगू शकणार नाही. परिस्थिती कशी बदलते याकडे पहावं लागेल. जर ती नियंत्रणात येत असेल तर थोडी शिथिलता देता येईल. पण जर नियंत्रणात येत नसेल तर मात्र आहे ती स्थिती कायम ठेवावी लागेल."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरातली रेल्वे सेवाही थांबविण्यात आली होती. पण लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यानंतर अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या होत्या की रेल्वेने 15 एप्रिलनंतरची तिकीट बुकिंग्ज घेण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून हा अंदाज केला जात होता की 15 एप्रिलपासून लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय झाला असावा. पण गुरुवारी रेल्वे मंत्रालयानं पत्रक काढून हे स्पष्ट केलं की कोणताही नवा निर्णय झालेला नाही आहे आणि 14 एप्रिलनंतरची बुकिंग्ज कधीही थांबविण्यात आली नव्हती.
"लॉकडाऊनचा जो कालावधी आहे, 24 मार्च ते 14 एप्रिल, तो वगळता अन्य कोणत्याही कालावधीसाठी तिकिट आरक्षण कधीही थांबवण्यात आलं नव्हतं. कोणतही तिकीट जास्तीत जास्त 120 दिवस अगोदर आरक्षित करता येतं. त्यामुळं 14 एप्रिलनंतरची बुकिंग्ज ही लॉकडाऊन जाहीर होण्याअगोदरच सुरु होती," असं रेल्वेनं आपल्या खुलाश्यात म्हटलं आहे.
अशा प्रकारच्याही काही बातम्या आल्या होत्या की 15 एप्रिलपासून खाजगी विमान कंपन्यांनाही बुकिंग्स घेण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. पण हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे. "सध्या लॉकडाऊनदरम्यान सगळ्या आंतरदेशीय आणि आंतराष्ट्रीय विमान सेवा 15 एप्रिलपर्यंत बंद आहेत. या कालावधीनंतर या सेवा पुन्हा सुरु करायच्या का याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. जर गरज पडली तर आम्ही प्रत्येक केसनुसार परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय करू," असं पुरी यांनी ट्विट करून सांगितलं.
लॉकडाऊन हटवण्याचा वा न हटवण्याचा निर्णय केव्हाही घेतला तरी भविष्यात त्या निर्णयाचे होणारे परिणाम अटळ आहेत. त्यामुळेच तो निर्णय चुकू नये असं केंद्र आणि राज्य सरकारांची इच्छा आहे. तूर्तास त्याबद्द्ल संदिग्धता असली तरीही ती समजून घेण्यासारखीही आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)