कोरोना व्हायरसचा धारावीतील प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपायोजना सुरू आहेत?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

धारावी...आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी... लोकसंख्या आठ लाखांपेक्षा जास्त....लेदर, जरीच्या कारखान्यांसाठी प्रसिद्ध...इथं शर्ट-जीन्सचे छोटे वर्कशॉप मोठ्या संख्येने आहेत.

धारावी म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर येते गर्दी. अत्यंत दाटीवाटीचा परिसर... एकमेकांना खेटून उभारण्यात आलेली घरं. एकाच्या घरात काय सुरू आहे, हे सहज दुसऱ्याच्या घरात ऐकू येईल अशी परिस्थिती...अरुंद गल्ली आणि 100 स्क्वेअर फुटांच्या घरात राहणारे 10-15 रहिवासी.

आणि सोशल डिस्टन्सिंगपासून कोसो लांब असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळून आले आहेत. ही मुंबईकरांच्या काळजीत भर घालणारी बाब आहे.

धारावीतील रुग्ण...

धारावीत 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीत राहणाऱ्या आणि मुंबईतील खासगी रुग्णालयात कार्यरत डॉक्टरला कोरोनाची लागण झाली तर धारावीत स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचं निदान झालं. हा रुग्ण वरळीच्या जिजामाता नगर परिसरात राहतो.

धारावीत कोरोनाचा संसर्ग पसरला, तर मोठ्या संख्येने लोकांना याची लागण होईल. त्यामुळे प्रशासनासमोर संसर्ग रोखणं मोठं आव्हान आहे.

काय चाललयं धारावीत?

कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी पालिका आणि पोलिसांकडून काय उपाययोजना आखल्या जात आहेत, याचा आढावा बीबीसी मराठीने घेतला.

धारावीचा परिसर मुंबई महापालिकेचे असिस्टंट कमिश्नर किरण दिघावकर यांच्या अखत्यारित येतो. तीन दिवसांपूर्वी धारावीत राहणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आणि मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज झाली.

किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार धारावी परिसरातील दोन इमारती पूर्णत: सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीतून कोणालाही बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची परवानगी नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही रहिवाशांना अत्यावश्यक गोष्टीचा पुरवठा करत आहोत."

धारावीतील कन्टेनमेन्ट झोन

डॉ. बालिगानगर- हा नऊ इमारतींचा समूह आहे. पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. या भागात 300 फ्लॅट आणि 90 दुकानं आहेत. या सोसायटीतून बाहेर जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

पोलिसांनी सर्व गेट सील केले आहेत. वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या गाडीतून लोकांना बाहेर घेवून जाण्यात येतं. या इमारतींपैकी एका इमारतीत राहणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या रुग्णाचे कुटुंबीय आणि त्याच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.

वैभव बिल्डिंग- या इमारतीतील एका डॉक्टरला गुरूवारी (2 एप्रिल) कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हा डॉक्टर एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. या सोसायटीतील 48 फ्लॅट आणि 3 नर्सिंग होम सील करण्यात आले आहेत. लोकांना घराबाहेर येण्यास मज्जाव करण्यात येतोय. पालिकेने संबंधित डॉक्टरचा ज्या लोकांशी संपर्क आला आहे, त्यांची माहिती घ्यायला सुरूवात केलीये.

किरण दिघावकर यांनी सांगितलं, "डॉ. बालिगानगर परिसरातील 2500 लोकांपैकी 132 ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांना अस्थमा किंवा इतर श्वसनसंस्थेचे आजार असल्याची माहिती मिळाली आहे. यांची खास काळजी घेतली जात आहे. नागरिकांना पालिकेकडून जेवणाची पॅकेट्स पुरवण्यात येत आहेत. लोकांची सर्वतोपरी मदत केली जात आहे

हायरिस्क "रेड झोन": कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या घरापासून 100 मीटरपर्यंतचा परिसर हाय रिस्क रेड झोनमध्ये येतो. यामध्ये रुग्णाचे कुटुंबीय, नातेवाईक आणि रोज संपर्कात येणाऱ्यांचा समावेश आहे

लो-रिस्क झोन - कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या घरापासून 200 मीटर पर्यंतचा परिसर, ज्यात इमारतीतील इतर रहिवाशांचा समावेश आहे.

कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या परिसराला पालिकेने 'कंटेनमेंट झोन' घोषित केलं आहे. आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी या परिसरातील लोकांची वर्दळ पूर्णत: बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना रोज घरी लागणाऱ्या वस्तूंचा तुटवडा सहन करावा लागतोय.

प्रशासनाने कंटेनमेंट परिसरातील लोकांसाठी काय उपाययोजना केली आहे. याबाबत बोलताना किरण दिघावकर म्हणाले, "आम्ही परिसरातील मोठ्या किराणा दुकानांशी संपर्क केलाय. या दुकानांना झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत जोडण्यात आलंय. डिलिव्हरी करणाऱ्या मुलांना ट्रेनिंग देण्यात आलं. लोक झोमॅटो आणि स्विगीवरून किराणा मागवू शकतात. लोकांना याबाबत माहिती करून दिली जात आहे. जेणेकरून लोकं ऑनलाईन किराणा मागवतील आणि घराबाहेर पडणार नाहीत."

कंटनमेंट परिसरातील रहिवाशांच्या गरजेप्रमाणे त्यांना दूध, बिस्किट, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांसाठी डायपर्स याचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती दिघावकर यांनी दिली.

धारावी परिसरात मोठ्या संख्येने रहिवासी राहतात. या भागात कोरोनाचा संसर्ग झाला तर, परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे धारावीतील रहिवाशांना इतरत्र ठेवण्याची परिस्थिती उद्भवली तर पालिकेने तयारी केली आहे.

किरण दिघावकर यांच्या माहितीनुसार, धारावी परिसरातील राजीव गांधी स्पोर्ट कॉम्प्लेक्स क्वॉरंटाईन फॅसिलिटी म्हणून बनवण्यात आलं आहे. यात सद्यस्थितीला 300 बेड्स आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास हाय रिस्क कॉन्टॅक्टना या ठिकाणी ठेवण्यात येईल.

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सरकारची डोकेदुखी ठरतेय. त्याचसोबत धारावी, वरळी, गोवंडी, चीता कॅम्प, मानखुर्द, प्रभादेवी यासारख्या परिसरातील झोपडपट्टीत हा व्हायरस पोहोचल्याने सरकारची चिंता आणखी आणखी वाढली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)