जो बायडन यांनी आपल्या मुलांसाठी हॉस्पिटलमधून घेतली होती सिनेटरपदाची शपथ

फोटो स्रोत, Getty Images
जो बायडन हे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अमेरिकेच्या सिनेटमध्ये 36 वर्षं आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून 8 वर्षं असा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
पण जो बायडन यांच्या राजकीय कारकीर्दीला वैयक्तिक दुःखाची किनार आहे.
1972 मध्ये पहिल्यांदा सिनेट निवडणूक जिंकल्यानंतर एका कार अपघातात त्यांची पहिली पत्नी नीलिया आणि लहान मुलगी नाओमी यांचा मृत्यू झाला.
त्यांनी आपल्या सिनेटरपदाची शपथ त्यांची मुलं बो आणि हंटर बायडन यांच्या हॉस्पिटल रुममध्ये घेतली होती. हे दोघे त्या अपघातात वाचले होते.
Independent या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये डेमोक्रटिक नॅशनल कन्वेन्शन इथं जो बायडन यांना उपराष्ट्राध्यक्षपदासाठी नामनिर्देशित करताना बो बायडन यांनी भाषण दिले होते. या भाषणामुळे जो बायडन भावुक झाले होते.
बो बायडन यांनी म्हटलं होतं, "आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा वडील नेहमी आमच्यासोबत असायचे. माझ्या सर्वात जुन्या आठवणी त्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांनी कार्यालयात शपथ घेण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांनी म्हटलं होतं की, डेलावेरला दुसरा सिनेटर मिळू शकतो पण माझ्या मुलांना दुसरे वडील मिळू शकत नाहीत."
"टेड केनेडी, माईक मॅन्सफिल्ड, हबर्ट हम्फ्री यांच्यासारख्या ज्येष्ठ त्यांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. म्हणूनच ते हे करू शकले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये माझ्या बिछान्याशेजारीच शपथ घेतली," असंही बो म्हणाले.
1977 मध्ये जो बायडन यांनी जिल जेकब्स यांच्याशी लग्न केलं. बायडन कुटुंबाला पुन्हा एकत्र जोडण्यासाठी त्यांनी मदत केली.
2012 मध्ये बो बायडन यांनी म्हटलं,"आता मला दोन आई आहेत."
2015 साली बो यांचा 46 व्या वर्षी मेंदूच्या कॅन्सरने मृत्यू झाला. त्यांच्याकडे अमेरिकेतल्या राजकारणाचा उगवता तारा म्हणून पाहिले जात होते. 2016 मध्ये डेलावेअर राज्याच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवण्याची त्याची इच्छा होती.
बो याने आपल्याला पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे जो बायडन सांगतात. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर जो बायडन म्हटले, "तो एक सर्वोत्तम व्यक्ती होता."

फोटो स्रोत, Getty Images
बो बायडन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
जो बायडन यांनी आपल्या अभियानांमध्ये आरोग्य विषयक सुविधांना प्राधान्य देण्याचे एक कारण हेही आहे की, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यासंदर्भातले अनुभव घेतले आहेत.
वैयक्तिक आयुष्यातल्या या संकटांचा धीराने सामना करणाऱ्या बायडन यांची एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून प्रतिमा उभी राहिली आहे.
1988 साली त्यांनी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली. पण ब्रिटनच्या लेबर पार्टीचे नेते नील किनॉक यांच्या भाषणातून मजकूर विनापरवानगी वापरल्याचं मान्य करत त्यांनी माघार घेतली होती.
2008 साली त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला, पण नंतर माघार घेत बराक ओबामांनी दिलेली उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली.
डेलवेअरमधून सहा वेळा सिनेटर झालेले बायडन पहिल्यांदा 1972 साली निवडून आले.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक अमेरिकन्ससाठी बायडन यांना मत देण्यासाठी ते डोनाल्ड ट्रंप नाहीत हा एकच निकष पुरेसा होता.
बायडन यांनी या निवडणुकीत आपल्या आजवरच्या प्रतिमेशी सुसंगतच कार्यक्रम मांडला. त्यांचं मध्यममार्गी राजकारण ओबामांचीच धोरणं पुढे घेऊन जाणार आहे.
पण डेमोक्रॅटिक पक्षाची घडण बदलतेय. त्यांच्या नव्या समर्थकांना कररचना, पर्यावरण आणि आरोग्य सुविधांमध्ये मोठे बदल हवेत.
जो बायडन यांची कारकीर्द प्रदीर्घ असूनही बायडन प्रशासन कसं चालवतील याबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका घेणं टाळलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








