You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'भारताला घाबरुन अभिनंदनला सोडण्यात आलं,' पाकिस्तानी खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
पाकिस्तानच्या संसदेतील विरोधी पक्ष मुस्लीम लीग (नवाज) चे खासदार आणि अयाज सादिक यांच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानात सध्या खळबळ माजली आहे.
भारतातही बुधवारी या प्रकरणाशी संबंधित अनेक बातम्या पाहायला मिळाल्या.
'विंग कमांडर अभिनंदन यांना सोडलं नसतं तर रात्री नऊ वाजेपर्यंत भारताने पाकिस्तानवर हल्ला केला असता, असं परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एका बैठकीत म्हटलं होतं," असा दावा सादिक यांनी पाकिस्तानच्या संसदेत केला आहे.
सादिक बुधवारी (28 ऑक्टोबर) संसदेत बोलत होते. ते म्हणाले, "शाह मेहमूद कुरेशी त्या बैठकीत होते, ते मला आठवतं. या बैठकीत येण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. बैठकीत लष्करप्रमुख होते. पण त्यांचे हातपाय कापत होते आणि कपाळाला घाम फुटला होता."
"कृपा करून अभिनंदनला परत जाऊ द्या, नाही तर रात्री नऊ वाजेपर्यंत भारत पाकिस्तानवर हल्ला करेल. भारताने कोणताही हल्ला केला नसता, पण अभिनंदन प्रकरणात यांनी भारतासमोर गुडघे टेकले. यामुळे आम्ही आम्हाला हे सगळं सांगायला भाग पाडू नका."
अयाज सादिक यांच्या भाषणाचा हा व्हीडिओ भारतात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सरदार अयाज सादीक हे काही काळ पाकिस्तानच्या संसदेतील लोकसभेचे अध्यक्षही होते.
भाजपकडून सादिक यांचं भाषण व्हायरल
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा व्हीडिओ ट्वीट करत लिहिलं, "काँग्रेसच्या राजकुमारांना भारतात कुणावरही विश्वास नाही. मग ते आपलं लष्कर असो किंवा आपले नागरिक.
आता त्यांनी पाकिस्तान या त्यांच्या सर्वात विश्वासू देशातलं बोलणं ऐकावं. आता तरी त्यांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा आहे."
भाजपने या व्हीडिओचा चांगलाच उपयोग करून घेतला. हा व्हीडिओ पोस्ट करत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. जे. पी. नड्डा यांचं ट्वीट भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही रिट्वीट केलं आहे.
बुधवारी (28 ऑक्टोबर) भारतात अनेक वृत्तवाहिन्यांनी हा व्हीडिओ प्राईम टाईम शोमध्ये दाखवला. पाकिस्तानातील न्यूज चॅनेलमध्येही सादीक यांचं वक्तव्य चर्चिलं गेलं. त्यांनी असं का म्हटलं, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
बुधवारी पाकिस्तानातील दुनिया न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना अयाज सादिक म्हणाले, "मला वैयक्तिक टीका करायची नव्हती. पण सध्या सत्तेत असलेले लोक आम्हाला चोर आणि मोदींचा मित्र म्हणून संबोधतात. त्यांना उत्तर देणं भाग होतं. या लोकांमध्ये कसलंही गांभीर्य नाही."
यांना संसदेचे नियमसुद्धा माहीत नाहीत. आम्ही या सरकारला काश्मीरच्या मुद्द्यावर प्रत्येक कठीण प्रसंगी पाठिंबा दिला. अभिनंदन प्रकरणातसुद्धा आम्ही सरकारचं समर्थन केलं. पण सरकारनेसुद्धा विरोधी पक्षांचा आदर करावा."
पाकिस्तान सरकारचं स्पष्टीकरण
परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सादिक यांचा आरोप फेटाळून लावला आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.
कुरेशी म्हणाले, "जबाबदार पदांवरचे लोक बेजबाबदार वक्तव्य करत आहेत, याचा मला खेद वाटतो. अभिनंदनला दबावात सोडण्यात आलं असं ते म्हणाले. पाकिस्तानच्या संसदेतील लोकसभेचे माजी अध्यक्ष अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतात, याच अपेक्षा नव्हती."
गुप्त माहितीच्या आधारे सरकारने संसदेतील सगळ्या नेत्यांना विश्वासात घेतलं होतं. पण बैठकीत अभिनंदनवर कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय फायद्यासाठी त्यांनी अतिशय बेजबाबदार विधान केलं आहे. यामुळे मला धक्का बसला आहे."
कुलभूषण प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने फायदा उचलू नये, असंही आपल्याला वाटत असल्याचं कुरेशी म्हणाले.
कुलभूषण आणि अभिनंदन प्रकरणात विरोधक पाकिस्तानची दिशाभूल करत आहे, अशी टीकाही कुरेशी यांनी सादिक यांच्यावर केली.
याप्रकरणी बीबीसी प्रतिनिधी शुमायला जाफरी यांनी पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांच्याशी बातचीत केली.
ते म्हणाले, "तुम्ही पूर्ण भाषण ऐकलात तर त्यात पुलवामा हल्ल्यानंतर घडलेल्या घटनाक्रमाबाबत सांगण्यात आलं आहे. भारतीय माध्यमांतील एका गटाने आपल्या फायद्यासाठी अयाज सादीक यांच्या भाषणातील एक तुकडा उचलून व्हायरल केला.
"हा भारताच्या धूर्त आणि अप्रामाणिक पत्रकारितेचा उत्तम उदाहरण आहे. आम्ही दहशतवादाच्या विरुद्ध आहोत. कोणत्याही स्वरूपात दहशतवादाचा आम्ही निषेध करतो," असं चौधरी म्हणाले.
पाकिस्तानातील सत्ताधारी पक्षाचे नेते अली मुहम्मद खान यांनीसुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली. "भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यासाठी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ, पीपीपी यांच्यासह अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि जेयूआय-एफच्या नेत्यांकडूनसुद्धा सहमती घेण्यात आली होती. अभिनंदन यांची सुटका 'सकारात्मक पुढाकार' या भावनेने करण्यात आली होती." असं ते म्हणाले.
खासदार ख्वाजा आसिफ यांनी इमरान खान सरकार भारताच्या तुष्टीकरणात लागल्याचा आरोप केल्यानंतर याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.
अयाज सादिक यांचं वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करानेही पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली बाजू स्पष्ट केली.
पाकिस्तान एक जबाबदार देश आहे. शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं.
हा पाकिस्तानचा परिपक्व असा निर्णय होता. याला इतर कोणत्याही गोष्टीशी जोडणं निराशाजनक आहे. पाकिस्तानने भारताला पहिल्यांदा आपली ताकद दाखवली आणि नंतर हा निर्णय घेण्यात आला. आपण त्यांना अशी जखम दिली, जी आजसुद्धा भळभळते."
'अभिनंदन पाकिस्तानात मिठाई वाटण्यासाठी आले नव्हते'
या संपूर्ण प्रकरणानंतर आता अयाज सादिक यांनी भारतीय माध्यमांकडे बोट दाखवलं आहे.
भारतीय माध्यमांनीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सादिक यांनी म्हटलं.
भारतीय माध्यमांनी माझं वक्तव्य पूर्णपणे उलटं दाखवलं. अभिनंदन पाकिस्तानात मिठाई वाटण्यासाठी आले नव्हते. ते पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी आले होते. पाकिस्तानने त्यांचं विमान पाडलं, तेव्हाच पाकिस्तानचा विजय झाला होता."
इम्रान खान यांनी खासदारांची बैठक बोलावली पण स्वतःच बैठकीला आले नाहीत. आपण राष्ट्रीय हितासाठी अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यावेळी शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते. पाकिस्तानच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं होतं."
सादिक यांच्या मते, "इम्रान खान यांनी कुणाच्या दबावाखाली निर्णय घेतला, त्यांचा काय नाईलाज होता, याबाबत काहीच सांगितलं नाही. आम्ही अभिनंदनला परत पाठवण्याबाबत सहमत नव्हतो. याची कोणतीच घाई नव्हती. थोडी प्रतीक्षा करता आली असती. भलेही नेतृत्वाने राष्ट्रीय हिताचा उल्लेख करून हा निर्णय घेतला असेल. पण यामध्ये त्यांचा कमकुवतपणा दिसून आला."
पाकिस्तानात इम्रान खान सरकारविरुद्ध विरोधी पक्षांचा हल्लाबोल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विरोधक सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्णय घेत आहेत.
पाकिस्तानात कट्टर विरोधत असलेले PPP आणि PML(N) हे दोन पक्ष इमरान खान सरकारविरोधात एकत्र आले आहेत.
पाकिस्तान सरकार 2021 पर्यंत पडेल, असा दावा PPPचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी केल्याबाबतची बातमी द न्यूजने दिली.
पुलवामा आणि बालाकोट प्रकरणात काय घडलं?
पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 CRPF जवान मारले गेले होते. पाकिस्तानात सक्रीय असलेली कट्टरवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा या हल्ल्यात हात असल्याचा भारताचा आरोप आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. या हल्ल्याच्या उत्तरादाखल पाकिस्ताननेसुद्धा 27 फेब्रुवारी रोजी भारतावर हवाई हल्ला केला होता.
भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन मिग 21 घेऊन निघाले होते. पण पाकिस्तानी वायुदलाच्या हल्ल्यात त्यांचं विमान पडलं.
तिथं पाकिस्तानी लष्कराने अभिनंदन यांना आपल्या ताब्यात घेतलं. विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांचा एक व्हीडिओ पाकिस्तान लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये अभिनंदन जखमी असल्याचं दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावर रक्त पसरलेलं होतं.
या व्हीडिओनंतर भारतात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना सोडण्यात येणार असल्याची घोषणा संसदेत केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)