You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिनंदन यांची सुटका: नरेंद्र मोदी की इम्रान खान? प्रचार युद्धात कुणाची सरशी?
- Author, सौतिक बिश्वास
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पाकिस्तानमधून भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर काश्मीरमधील हल्ल्यानंतर दोन अण्विक शक्तींत निर्माण झालेला तणाव कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पण या संपूर्ण संकट काळात जी धारणांची लाढाई सुरू होती ती कुणी जिंकली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी?
गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय पायलटच्या सुटकेची घोषणा केली. 'शांतीच्या उद्देशाने' आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
इकडे दिल्लीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शास्त्रज्ञांच्या एका बैठकीला संबोधित करत होते. यावेळी खान यांच्या निवेदनावर त्यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. 'पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे,' असं विधान त्यांनी केलं आणि पुढं म्हणाले, की आता आम्ही खरी कामगिरी करू. त्यांच्या समर्थकांनी या विधानावर जल्लोष केला असला तरी अनेकांना मोदींचं हे वक्तव्य अहंमन्य आणि पंतप्रधानपदाला साजेसं नसल्याचं वाटलं.
मंगळवारी भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हवाई हल्ला करत कट्टरपंथीयांचे प्रशिक्षण कँप उद्ध्वस्त केले. या हल्ल्याला काही तास उलटले असतानाच नरेंद्र मोदींनी एक प्रचारसभा घेतली. 'देश सुरक्षित हातात आहे याची खात्री मी तुम्हाला देतो,' असं विधान या सभेमध्ये बोलताना त्यांनी केलं. हे ऐकल्यावर समोर बसलेल्या गर्दीनं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
अवघ्या 24 तासांच्या आत पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये भारताचं एक लढाऊ विमान पाडण्यात आलं आणि पायलट अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं.
दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्याचा दबाव असताना इम्रान खान यांनी एक पाऊल पुढं टाकत भारतीय पायलटला सोडण्याची घोषणा केली. खान यांच्या रिव्हर्स स्विंगनं केंद्र सरकार आणि भाजपमधील मुत्सद्दी चक्रावून गेले, असं मत भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी आणि सामरिक तज्ज्ञ के. सी. सिंह यांनी व्यक्त केलं. (रिव्हर्स स्विंग हे क्रिकेटमधील बॉल वळविण्याचं एक तंत्र आहे. यामध्ये बॉल बॅट्समनला चकवून आतमध्ये वळतो. इम्रान खान हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होते.)
सुरक्षाविषयक पेचप्रसंग
2014 साली सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदींनी स्वतःची प्रतिमा मोठी करून दाखविण्याचं कौशल्य दाखवलं आहे. त्यातच त्यांना स्तुतिपाठक माध्यमांचीही साथ मिळाली. या माध्यमांनी त्यांच्या राष्ट्रवादी प्रतिमेला अजूनच बळकटी दिली. माध्यमांशी बोलण्यासाठी मोदी सनदी अधिकाऱ्यांना किंवा लष्कराच्या प्रतिनिधींना पुढे का करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला. देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना आणि अनेक अफवांना ऊत आलेला असताना पंतप्रधान समोर येऊन स्वतः लोकांशी संवाद का साधत नव्हते?
भारतातील प्रमुख विरोधी पक्षही हाच प्रश्न विचारत होते. निवडणुकांसंबधीच्या बैठका आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याबद्दल 21 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांवर कठोर टीका केली. आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठ्या सुरक्षाविषयक पेचप्रसंगाला सामोरं जात असताना मोदींनी एका मोबाईल अॅपचंही उद्घाटन केलं. विरोधकांनी यावरही बोट ठेवलं.
पाकिस्ताननं भारताच्या डोळ्यांत धूळ फेकून वेगवान आणि धाडसी प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी भारताचं लढाऊ विमान पाडलं आणि पायलटलाही ताब्यात घेतलं. मात्र लगेचच इम्रान खान यांनी शत्रुत्वाची भावना कमी करत शांततेची भाषा केली आणि भारतीय पायलटला सोडण्याची घोषणाही केली.
"पाकिस्तानी पंतप्रधानांनी संयम दाखवून चर्चेद्वारे मतभेद मिटविण्याची भूमिका घेतली. पायलटला भारताकडे सोपविण्याचा त्यांच्या निर्णयानं अनेकांना आश्चर्यचकित केलं," असं मत के. सी. सिंह यांनी व्यक्त केलं.
या काळात इमरान खान पाकिस्तानी जनतेशी तसंच लष्करी अधिकाऱ्यांशी सातत्यानं संवाद साधत राहिले, माध्यमांसोर येत राहिले. 'इम्रान खान यांचं वर्तन हे एका समजूतदार नेत्याप्रमाणे होते. भारतावर दोषारोप करण्यापेक्षा शत्रुत्व संपविण्यासाठीचे मार्ग कसे खुले करता येतील यावर त्यांनी भर दिला,' असं अनेक भारतीय विश्लेषकही म्हणत आहेत.
नरेंद्र मोदी यांचा तोल मात्र कुठेतरी सुटला. "तुम्ही कोणत्याही पद्धतीनं पाहिलं, तरी पाकिस्तानचा हल्ला हा भारतासाठी आश्चर्याचा धक्का होता," असं इतिहासकार आणि लेखक श्रीनाथ राघवन यांनी म्हटलं. राघवन हे Fierce Enigmas: A History of the United States in South Asia या पुस्तकाचे लेखक आहेत.
14 फेब्रुवारीला पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं पाकिस्तानवर मध्यरात्री हवाई हल्ला केला. तुलनेनं पाकिस्ताननं सकाळच्या उजेडात केलेला हल्ला हा वेगवान आणि धाडसी होता.
'बदला हे धोरण असू शकत नाही'
मोदींच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पाकिस्तानातील कट्टरपंथी संघटनांकडून सुरक्षेला धोका निर्माण झालेला नाही. मोदींचे पूर्वसुरी डॉ. मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांनादेखील या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं होतं. सीमेपलीकडून सुरक्षाव्यवस्थेला निर्माण होणाऱ्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता या नेत्यांमध्येही होती.
मात्र त्यांनी सारासार निर्णय घेऊन तणाव निवळू दिला. "बदला हा धोरणात्मक पर्याय असूच शकत नाही. भावनांच्या भरात आखलेली योजना अपयशी ठरू शकते," राघवन यांनी म्हटलं.
भारतातील अनेक माध्यमं ही अभिनंदन यांची सुटका नरेंद्र मोदींचा विजय असल्याचं म्हणत आहे. फार कमी जण पुलवामा हल्ल्यामध्ये गुप्तहेर यंत्रणांना आलेल्या अपयशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पाकिस्तानी विमानं दिवसाउजेडी भारताच्या हवाई हद्दीत कशी घुसली याबद्दलही सोयीस्कर मौन बाळगण्यात येत आहे.
"भारतीय लष्कराला पाकिस्तान पुरस्कृत कट्टरपंथाला थोपविण्यासाठी आणि आत्मघातकी हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी नवीन धोरण विकसित करण्यात यश आलेलं नाही," असं मत संरक्षण विश्लेषक अजय शुक्ला यांनी व्यक्त केलं.
"दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं आपण भारताची बरोबरी करू शकतो, हे सिद्ध केलं. त्यामुळं आता भारतीय लष्कराला आपली क्षमता वाढविणं भाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांत लष्करासाठी निधीची कमतरता आणि लष्करी सामर्थ्य वाढविण्याकडे केलेलं दुर्लक्ष यांमुळे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी नरेंद्र मोदी लष्कराच्या जीवावर पूर्णपणे विसंबून राहू शकत नाहीत," असंही शुक्ला यांनी म्हटलं.
भारतीय वायुदलानं पाकिस्तानमधील कथित कट्टरपंथी प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या हल्ल्यात नेमकं किती नुकसान झालंय याचीही नेमकी माहिती दिली जात नाहीये. भारतातील माध्यमांनी 300 कट्टरपंथी ठार झाले, अशी आकडेवारी चालवली जात असली, तरी अधिकृतरीत्या याला दुजोरा देण्यात आलेला नाही. एकूण सर्वच बाजूंनी मोदींना काही अवघड प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे.
पण चित्र असंच आहे का? पाकिस्तानमध्ये अनेकांच्या मते इम्रान खान यांनी बाजी मारली आहे. तर भारतातील काही जण मात्र मोदींना श्रेय देत आहेत.
"मोदींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांपेक्षा निश्चितच अधिक आहे. त्यातच मोदींचं माध्यमांवर असलेलं नियंत्रण पाहता ही बाजी त्यांनी गमावली, असं फार कमी जण मान्य करतील. मोदींमुळेच इम्रान खान यांच्यावर दबाव आला आणि त्यांनी भारतीय पायलटला सोडलं, असंच त्यांचे समर्थक म्हणतील," असं स्तंभलेखक आणि Mother Pious Lady - Making Sense of Everyday India या पुस्तकाचे लेखक संतोष देसाई यांनी म्हटलं आहे.
कोणी बाजी मारली, या प्रश्नाचं उत्तर नाही मिळाली तरी या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीला एक रूपेरी किनारही आहे. दोन्ही बाजूंना युद्ध नको असल्याचं दिसतंय, असं मत एमआयटीमधील राज्यशास्त्राचे प्राध्यापक विपीन नारंग यांनी व्यक्त केलं. "भारत आणि पाकिस्ताननी त्यांचा 'क्युबन क्षेपणास्त्र पेच' अनुभवला आहे. एखाद्या चुकीच्या निर्णयानं परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, याचीही त्यांना जाणीव आहे," असं नारंग यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)