You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसः स्पेन आता 1 लाख मिंक प्राण्यांना मारणार
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जवळपास 1 लाख मिंक (मुंगुसासारखा दिसणारा एक प्राणी) प्राण्यांची स्पेनमध्ये कत्तल केली जाणार आहे.
स्पेनच्या आरगॉन प्रांतात एका शेतकऱ्याच्या बायकोला मे कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर काही मिंक प्राण्यांनाही लागण झाली. त्यानंतर या महिलेचे पती आणि त्या पाळीव प्राण्याच्या फार्मवर काम करणाऱ्या 6 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या प्राण्याची कत्तल करण्यात येणार आहे.
मिंक प्राण्यांची कातडीला (फर) फार किंमत असते, त्यांची कातडी कमावण्यासाठी अनेक पाश्चात्य देशांमध्ये मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात.
या शेतावरच्या मिंक प्राण्याची तपासणी केल्यानंतर त्यातल्या ज्या प्राण्यांना संसर्ग झाला होता त्यांना वेगळं ठेवण्यात आलं आणि त्यांच्याकडे काटेकोर लक्ष दिलं गेलं, तरीही 13 जुलैला पुन्हा टेस्ट केल्यानंतर या शेतावरच्या 87 टक्के मिंक प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांनी या शेतावरच्या 92,700 प्राण्यांची कत्तल करण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्राणी ज्यांच्या मालकीचे आहेत त्या कंपनीला याची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
स्पेनची राजधानी माद्रिद आणि कॅटलोनिया या प्रांताशिवाय आरगॉनही स्पेनमधला कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट आहे. आरगॉनमध्ये आजवर अडीच लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण आणि 28,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
आरगॉनचे कृषीमंत्री जोक्विन ओलोना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "या प्राण्यांद्वारे कोरोना व्हायरस माणसांमध्ये पसरू नये म्हणून या प्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे."
अर्थात प्राण्यांद्वारे माणसांमध्ये हा व्हायरस पसरू शकतो का, किंवा माणसांव्दारे प्राण्यांना संसर्ग होऊ शकतो का हे अजून स्पष्ट झालेलं नाही असंही ओलोना म्हणाले.
"पण एक शक्यता आहे की शेतात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना याचा संसर्ग झाला होता त्यांच्याकडून अनवधानाने या मिंक प्राण्यांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असू शकते. पण काहींचं असंही म्हणणं आहे की या प्राण्यांकडून माणसांना याची लागण झाली आहे."
प्राण्यांकडून माणसांना लागण होऊ शकते का?
कोरोना व्हायरस आणि प्राणी यांच्यावर आजवर जितका अभ्यास झाला त्यातून एक गोष्ट लक्षात आली आहे की हा व्हायरस काही प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आहे, उदा - कुत्रे आणि मांजरी.
पण प्राण्यांपासून माणसांना संसर्ग होऊ शकतो का याबद्दल अजून पुरेशी माहिती समोर आलेली नाही आणि यावर अजूनही अभ्यास चालू आहे.
जगभरात इतरही ठिकाणी, जिथे मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात अशा ठिकाणहून तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. डेन्मार्क आणि नेदरलँड्समध्ये असं घडलं आहे. या दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर फरचं उत्पादन होतं.
नेदरलँड्समध्येही कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर हजारो मिंक्सची कत्तल केली गेली. डच सरकारला मे महिन्यात मिंकपालनात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची कळाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला.
WHO चं म्हणणं काय?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चं म्हणणं आहे की स्पेनमधले 'हे इन्फेक्शन्स प्राण्यांमधून माणसाला कोरोनाचा संसर्ग होण्याची कदाचित पहिली घटना असेल'.
जपानमधल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना WHO च्या साथरोग तज्ज्ञ मारिया व्हॅन केरकोव्ह म्हणाल्या, " काही व्यक्तींकडून मिंक प्राण्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आणि नंतर याच संसर्ग झालेल्या प्राण्यांमुळे माणसांमध्ये संसर्ग पसरवला, आम्ही यावर अजूनही अभ्यास करतोय. हा संसर्ग कसा झाला, आणि नक्की यात मिंक प्राण्यांची काय भूमिका होती याचा आम्ही शोध घेतोय."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)