You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : मेंढपाळच पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 47 शेळ्यांनाही करावं लागलं क्वारंटाईन...
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसीसाठी, कर्नाटकहून
जगातली सरकारं सध्या मोठ्या संख्येने वाढत चाललेल्या कोरोना पॉझिटीव्ह लोकांना क्वारंटाईन करायला जागा कुठून आणायची या पेचात आहेत. लोकांसाठी योग्य त्या सोयीसुविधा उभ्या करताना प्रशासनाचे प्राण पणाला लागले आहेत.
अशात कर्नाटकमध्ये मात्र माणसांऐवजी 47 शेळ्या क्वारंटाईन केल्याची घटना समोर आली आहे.
कर्नाटकातल्या तुमाकुरू जिल्ह्यातल्या चिक्कनयाकानाहल्ली मधल्या गोडेकेरे गावात ही घटना घडली आहे. इथे शेळ्या पाळणारा मेंढपाळच कोरोना पॉझिटिव्ह सापडला, आणि त्यानंतर त्याच्या चार शेळ्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने घाबरलेल्या गावकऱ्यांना वाटलं की या शेळ्यांचा मृत्यू कोव्हिड-19 ने झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसंच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत त्या कळपातल्या सगळ्या शेळ्यांना क्वारंटाईन केलं तसंच त्यांचे स्वॅबही घेतले.
अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वस्त केलं की मृत शेळ्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात येईल, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूचं नक्की कारण समजू शकेल.
कर्नाटकच्या पशुसंवर्धन विभागाचे सचिव पी मणिवन्नम यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही सगळ्या शेळ्यांना क्वारंटाईन करण्याचं मुख्य कारण स्थानिक गावकऱ्यांची भीती घालवणं हे होतं."
सध्या तज्ज्ञांच्या मते प्राण्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकत नाही, पण तरीही आम्हाला कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही शेळ्यांना क्वारंटाईन केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरस झोनोटिक प्रकारात मोडतो. यासारख्या व्हायरसचा संसर्ग प्राण्यांमधून माणसांना होऊ शकतो, पण माणसांमधून प्राण्यांना होत नाही, असंच मत सध्या सगळे पशुवैद्यकीय डॉक्टर्स, तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.
पशुविज्ञानाचे तज्ज्ञ असणारे प्रा. बी. एल. चिदानंदा बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "माणसांकडून शेळ्या, मेंढ्या किंवा आणखी कोणत्या प्राण्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची एकही केस समोर आलेली नाही. गावकऱ्यांची भीती त्यांच्या अज्ञानातून उत्पन्न झालेली आहे. त्यांच्यात जनजागृती करायला हवी.गावकऱ्यांना खुश करायला प्रशासनाने ही पावलं उचलली आहेत.याने काही फायदा होणार नाही."
यावर उत्तर देताना मणिवन्नम यांनी कायसानुर फॉरेस्ट फिव्हर या आजाराचं उदाहरण दिलं. हा आजार मंकी फिव्हर (माकड ताप) म्हणूनही ओळखला जातो. ताप येऊन रक्तस्राव होणाऱ्या या रोगाची साथ अनेकदा दक्षिण भारतात आढळते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)