You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात साप चावल्याने 20 वर्षांत 12 लाख जणांचा मृत्यू
सर्पदंशामुळे भारतात गेल्या 20 वर्षांमध्ये जवळपास 12 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
मृत्यू झालेल्यांचं वय 30 ते 60 दरम्यान होतं. यात एक चतुर्थांश मृत्यू मुलांचे झाले आहेत.
या मृत्यूंना रसेल्स वायपर, क्रेट आणि नाग या प्रजातीचे विषारी साप जबाबदार आहे.
असं असलं तरी सापांच्या इतर 12 प्रजातींपासून काही जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्पदंशामुळे अनेकांचा जीव जातो, कारण याप्रकारच्या घटना बहुतेक करून अशा भागात घडतात, जिथपर्यंत वैद्यकीय मदत पुरवणं दुरापास्त असतं.
मान्सूनचा काळ
सर्पदंशाची जवळपास अर्धी प्रकरणं जून ते सप्टेंबरदरम्यान म्हणजेच मान्सूनच्या काळात घडतात. या काळात साप त्यांच्या बिळातून बाहेर पडतात, असं म्हटलं जातं.
बहुतेक घटनांमध्ये साप व्यक्तीच्या पायाचा चावा घेतो.
सायन्स जर्नलच्या ई-लाईफमध्ये प्रसिद्ध झालेला हा शोधनिबंध, भारत आणि जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी एकत्र येऊन तयार केला आहे.
भारताच्या 'मिलिअन डेथ स्टडी' प्रकल्पाच्या आधारे या संशोधनासाठी आकडे मिळवण्यात आल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आशियात आढळणारे रसेल्स वायपर याप्रकारचे साप अत्यंत धोकादायक आहेत.
उंदरांना खाऊन ते पोट भरतात. हे साप मानवी वस्तीच्या आसपास आढळतात.
वैद्यकीय मदतीची गरज
भारतात सापडणारा करेत प्रजातीचा साप दिवसा शांत राहतो. पण, रात्रीच्या वेळेस मात्र तो रौद्र रूप धारण करतो. त्यांची लांबी पाच फूट नऊ इंच इतकी असू शकते.
याशिवाय नाग प्रजातीचे सापही बहुतेक करून रात्रीच हल्ला करतात.
जडी-बुटीचा इलाज
नागाचा दंश इतका धोकादायक असतो, की यामुळे अंतर्गत रक्तपाताची शक्यता असते आणि त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते.
या संशोधनात म्हटलंय की, 2001 ते 2014 दरम्यान सर्पदंशाचे जवळपास 70 टक्के घटना 8 राज्यांत झाल्या आहेत.
यामध्ये बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश (तेलंगणसहित), राजस्थान आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.
या संशोधनानुसार, 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होण्याची शक्यता 250 पैकी एका प्रकरणात असते. पण, काही भागांमध्ये हे प्रमाण 100 पैकी एका प्रकरणातही असू शकतं.
जागतिक आरोग्य संघटना
मान्सूनदरम्यान गावात राहून शेती करणाऱ्या व्यक्तींना साप चावण्याची सर्वाधिक शक्यता असते.
या भागातील लोकांना सापापासून सुरक्षित राहण्याचे पर्याय शिकवायला हवेत. यात रबराचे बूट आणि टॉर्च वापरल्यास धोका कमी होऊ शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
आता सर्पदंशाचा समावेश जागतिक आरोग्यासंदर्भातल्या प्राथमिक बाबींमध्ये केल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
उष्णकटिबंध क्षेत्रातले देश सर्पदंशाच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करत आले आहेत, असंही संघटनेनं म्हटलं आहे.
संघटनेच्या मते, सर्पदंशामुळे जगभरात दरवर्षी 81 हजार ते 1 लाख 38 हजार जणांचा मृत्यू होतो आणि या संख्येच्या तीन टक्के लोक वाचतात खरे, पण त्यांच्यात आरोग्याची काही ना काही समस्या कायम राहते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)