कोरोना व्हायरसचा हवेतून संसर्ग होतो? कोरोना हवेत किती काळ सक्रीय असतो?

काही विशिष्ट परिस्थितीत किंवा वातावरणात कोरोना विषाणूचा 'हवेतूनही संसर्ग होत असल्याची' शक्यता नाकारता येत नाही, असं आता जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

बोलताना किंवा श्वासोच्छश्वास करताना शरीराबाहेर पडणाऱ्या अतिसूक्ष्म द्रवाच्या माध्यमातूनही हा विषाणू पसरू शकतो.

या शक्यतेवर शास्त्रीय संशोधनातून शिक्कामोर्तब झाल्यास अस्पेसेस म्हणजेच दारं बंद असलेल्या ठिकाणांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल होऊ शकतात.

कोरोनाबाधित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर पडणारे शिंतोडे वेगवेगळ्या पृष्ठभागांवर पडून ते पृष्ठभाग संक्रमित करतात.

याच कारणामुळे या विषाणूच्या फैलावाला आळा घालायचा असेल तर हात वारंवार साबणाने स्वच्छ धुणे हा प्रभावी उपाय असल्याचं WHO कडून वारंवार सांगण्यात येतं.

हवेतून होणारा संसर्ग म्हणजे काय?

हवेतल्या कणांमध्ये असलेले विषाणू (व्हायरस) किंवा जिवाणू (बॅक्टेरिया) श्वाच्छोश्वासाद्वारे शरीरात जाऊन त्याचा संसर्ग झाल्यास त्याला हवेतून होणारा संसर्ग म्हणजेच एअरबॉर्न ट्रान्समिशन म्हणतात. असे विषाणू किंवा जिवाणू हवेमधल्या कणांमध्ये तासनतास सक्रीय असू शकतात.

हे अतिसूक्ष्म थेंब मोठ्या परिसरात पसरू शकतात.

टीबी, फ्लू आणि न्युमोनिया ही हवेतून पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांची काही उदाहरणं.

बंद खोलीत किंवा गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचा पुरावा याआधी मिळाला होता, असं जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं आहे.

कोरोना विषाणू हवेत कितीकाळ सक्रीय असतो?

आतापर्यंत झालेल्या संशोधनातून असं आढळलं आहे की कृत्रिमरित्या हवेत सोडण्यात आलेले कोरोना विषाणू किमान तीन तास हवेत सक्रीय असतात.

मात्र, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हा प्रयोग प्रयोगशाळेत करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जीवनातल्या वातावरणापेक्षा प्रयोगशाळेतलं वातावरण वेगळं असतं आणि त्यामुळेच प्रत्यक्ष आयुष्यात हे निष्कर्ष वेगळे असू शकतात.

ज्याला 'सुपरस्प्रेडिंग' म्हटलं जातं अशाप्रकारच्या संसर्गावरून या विषाणूची लागण हवेतूनही होऊ शकते, या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

वॉशिंग्टनमधल्या माउंट वर्नोन शहरात एका तरुणीमुळे कमीतकमी 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ते सर्व गाण्याच्या एका कार्यक्रमात एकत्र गायले होते.

विशेष म्हणजे लागण झालेल्या अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमाचंही पालन केलं होतं.

जानेवारी महिन्याच्या शेवटी-शेवटी अशाच प्रकारची एक घटना चीनमधल्या ग्वाँगजू शहरातही घडली होती. तिथे कोरोना विषाणूचा वाहक असलेल्या एका व्यक्तीमुळे तो ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवला, तिथल्या 9 जणांना विषाणूची बाधा झाल्याचा संशय आहे.

शास्त्रज्ञ सांगतात की या 9 जणांपैकी एक व्यक्ती तर त्या विषाणू वाहकापासून तब्बल 6 मीटर अंतरावर बसली होती.

मी काय करावं?

ज्या पद्धतीने एखादा आजार पसरतो त्यावरूनच त्या आजाराला आळा घालण्यासाठीच्या उपाय शोधले जातात.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सध्यातरी वारंवार हात साबणाने किमान 20 सेकंद स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करणे हे उपाय सुचवलेले आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते हे उपाय महत्त्वाचे असले तरी हवेतून होणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी ते पुरेसे नाहीत.

मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यात सध्यातरी कुठल्याही नवीन सुधारणा केलेल्या नाही. असं असलं तरीदेखील Sars-CoV-2 हा विषाणू हवेतून पसरतो का, यावर संशोधन सुरू आहे.

संशोधनानंतर हवेतून होणाऱ्या संसर्गावर शिक्कामोर्तब झाल्यास जागतिक आरोग्य संघटना मास्कचा अधिकाधिक वापर आणि बार, रेस्टॉरंट, सार्वजनिक वाहतूक अशा गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं अधिक काटेकोर पालन यासारख्या नव्या मार्गदर्शक सूचना आखू शकते.

एसीच्या वापरावरही कठोर निर्बंध येऊ शकतात.

WHO मार्गदर्शक सूचनांवर फेरविचार का करतेय?

काही दिवसांपूर्वी 32 देशातल्या 239 शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक खुलं पत्र लिहिलं होतं.

कोरोना विषाणू हवेतूनही पसरू शकतो आणि म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावे, असं या पत्रात म्हटलं होतं.

या पत्रावर स्वाक्षरी करणारे कोलोरॅडो विद्यापीठातले केमिस्ट जोस जिमेंझे म्हणतात, "त्यांनी आमचे पुरावे ग्राह्य धरावे, अशी आमची इच्छा आहे."

ते पुढे म्हणतात, "हा काही WHO संघटनेवर केलेला हल्ला नाही. हा एक शास्त्रीय वाद आहे. मात्र, आम्ही जनतेसमोर गेलं पाहिजे, असं आम्हाला वाटलं कारण यापूर्वी आम्ही त्यांच्याशी बरीच चर्चा केली होती. मात्र, ते ऐकून घ्यायलाही तयार नव्हते."

या पत्राचं उत्तर देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल विभागाच्या प्रमुख बेनेडट्टा अॅलेग्रँझी म्हणाल्या की गर्दी, बंद ठिकाणं किंवा हवा खेळती नसलेल्या जागी कोरोना विषाणू हवेतूनही पसरू शकतो, याचे पुरावे फेटाळता येत नाही.

मात्र, नवीन कुठलेही निर्णय घेण्याआधी आम्हाला या प्रकारे संसर्ग पसरत असल्याचे आणखी ठोस पुरावे तपासायचे आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे आणखी एक सल्लागार डॉ. डेव्हिड हेमेन म्हणाले की या विषाणूचा सामना करण्यासाठी नवीन धोरण आखण्याआधी संघटनेला अधिक व्यापक संशोधनातून ठोस निष्कर्षांची अपेक्षा आहे.

म्हणजेच हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, यावर शिक्कामोर्तब करण्याआधी यादिशेने अधिक व्यापक आणि ठोस संशोधन होण्याची गरज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)