कोरोना व्हायरस: खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमध्ये ठेवल्या 'सेक्स डॉल्स'

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांची जागा सेक्स डॉल्सनी घेतली. स्टेडियमध्ये मॅच सुरू असताना उत्साह वाढवण्यासाठी केलेल्या या उपद्व्यापामुळे दक्षिण कोरियातील फुटबॉल क्लब चांगलाच अडचणीत आला आहे.

कोरोना व्हायरस संक्रमणामुळे जगभरात सगळीकडे लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे. अशावेळी स्टेडियममध्ये प्रेक्षक इतक्यात परततील अशी आशाही नाही. मग स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्यांनी खेळाडूंचा उत्साह कसा वाढेल?

या प्रश्नाचं उत्तर दक्षिण कोरियातील फुटबॉल मॅचदरम्यान शोधण्याचा प्रयत्न एफसी सोल या फुटबॉल क्लबने केला. पण या क्लबचा कित्ता इतर क्लब गिरवतील याची खात्री थोडीच आहे.

झालं असं की, दक्षिण कोरियात फुटबॉल लीगच्या मॅचेस पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. मात्र स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही. प्रेक्षक नसल्याची उणीव भरून काढण्यासाठी एफसी सोलने त्यादिवशी प्लॅस्टिकच्या बाहुल्यांना प्रेक्षक म्हणून बसवलं.

या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग झालं. ही मॅच पाहणाऱ्या फॅन्सना स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या जागी बाहुल्या ठेवलेल्या दिसल्या. यातील अनेक बाहुल्या या 'सेक्स डॉल्स' असल्याचा आरोप फॅन्सनी केला. प्रकरण वाढलं. 'एफसी सोल' मात्र जोर देत राहिलं की त्या सेक्स डॉल्स नसून दुकानात ठेवले जातात तसे 'प्रिमियम मॅनक्वीन्स' (पुतळे) आहेत. पण त्याचवेळी या क्लबने हेही मान्य केलं की, सेक्स डॉल्स तयार करणाऱ्या कंपनीकडून या बाहुल्यांचा पुरवठा करण्यात आला होता.

विशेष म्हणजे स्टेडियममध्ये ठेवलेल्या काही बाहुल्यांच्या हातात सेक्स वेबसाईटची माहिती देणारे फलक होते. दक्षिण कोरियामध्ये पोर्नोग्राफी साईटवर बंदी आहे.

मॅचदरम्यान काय घडलं?

रविवारी के लिग सीझनची पहीली फुटबॉल मॅच होती. ग्वांग्झु एफसी आणि एफसी सोल यांच्यात ही मॅच झाली.

कोरोना व्हायरस संक्रमण टाळण्यासाठी फुटबॉलचं मैदान रिकामं ठेवण्यात आलं होतं.

मॅचच्याआधी डाल्कम कंपनीने स्टेडीयममधील काही रिकाम्या खुर्च्यांवर बाहुल्या ठेवण्याचा प्रस्ताव दिला आणि एफसी सोलने तो मान्य केला. स्टेडियममध्ये ठेवण्यात आलेल्या 30 मॅनक्वीन्सपैकी 25 महिला बाहुल्या होत्या.

या फुटबॉल मॅचचे लाईव्ह प्रसारण पाहणाऱ्या फॅन्सनी सांगितलं की या बाहुल्यांपैकी बहुतांश बाहुल्या सेक्स डॉल्स वाटत आहे. त्यानंतर संबधित क्लबने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्यासंदर्भात दिलगिरीही व्यक्त केली.

क्लबचे अधिकारी ली जी- हुन यांनी बीबीसीशी बोलताना, क्लबने डाल्कम कंपनीची पार्श्वभूमी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी चौकशी केली नव्हती असं सांगितलं. पण क्लबने हेही सांगितलं की, डाल्कम कंपनीने त्या बाहुल्या प्रौढांसाठीचं प्रॉडक्ट नसून 'प्रिमियम मॅनक्वीन्स'च असल्याचं सांगितलं.

ली जी- हुन यांनी मान्य केलं की, त्या बाहुल्या या प्रेक्षकांसारख्याच भासत होत्या. पण त्यांच्या मनात हे चुकूनही आलं नाही की त्या सेक्स टॉईज असू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)