कोरोना व्हायरसच्या परिस्थितीने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना कमकुवत केलंय का?

    • Author, सारा रॅन्सफर्ड
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, मॉस्को

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा कोरोना व्हायरसबाबतचा संयम आता संपताना दिसतोय.

गेल्या सोमवारी त्यांनी संपूर्ण रशियातल्या लाखो मजुरांना फॅक्टरी आणि बांधकामाच्या ठिकाणी काम करण्याची परवानगी दिली. यासोबतच त्यांनी गेले सहा आठवडे रशियात असणारा लॉकडाऊन संपुष्टात आणत असल्याचंही जाहीर केलंय.

इतर निर्बंध कसे आणि कधी हटवायचे याचा निर्णय त्यांनी त्या त्या विभागातल्या नेत्यांवर सोडलाय. देशात विशेषतः मॉस्कोमध्ये कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण अतिशय जास्त असताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पण आयुष्य पूर्वपदावर परत येत असल्याचं गुरुवारपर्यंत पुतिन त्यांच्या सरकारला सांगत होते. सरकारने आता कोरोना व्हायरसशिवाय इतर प्राथमिक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, असं ते म्हणाले होते.

देशाच्या प्रमुखाकडून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे - देशाने कोरोनाला मागे टाकत आता पुढे चालणं सुरू करावं असं राष्ट्राध्यक्षांना वाटतंय.

इतकी घाई कशासाठी?

चॅटम हाऊसचे राजकीय विश्लेषक निकोलाय पेट्रॉव्ह सांगतात, "मला वाटतं की पुतिन त्यांच्या सक्रिय राजकारणातल्या आयुष्यात पहिल्यांदा अशा आव्हानाचा सामना करतायत जे अजिबात त्यांच्या नियंत्रणात नाहीये. या समस्येमुळे त्यांच्या सगळ्या योजना अडकून राहिल्या आहेत."

काही महिन्यांत रशियात घटनेतल्या दुरुस्तीबाबत मतदान होणार होतं. या दुरुस्तीद्वारे पुतीन यांना आणखीन दोनदा सत्तेत राहण्याची परवानगी मिळणार होती.

पण असं होण्याऐवजी 67 वर्षांच्या पुतिन यांनी मॉस्कोबाहेर असणाऱ्या त्यांच्या घरीच थांबून रहावं लागलं. आपली 'अॅक्शन मॅन'ची प्रतिमा कायम राखण्यासाठी ते हॅजमॅट सूट घालून एका कोरोना व्हायरसवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि संक्रमित होण्यापासून थोडक्यात बचावले होते.

ज्या डॉक्टरने त्यांना हॉस्पिटलं दाखवलं होतं त्यालाच नंतर या विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं होतं.

'सेल्फ आयसोलेशन'मध्ये जावं लागल्याने एका मोठ्या स्क्रीनवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुतिन यांना काम करावं लागत होतं.

पुतिन यांचं अप्रूव्हल रेटिंग घसरून 59%वर आलेलं. हे मानांकन चांगलं समजलं जात नाही. जास्त काळ चाललेल्या कॉल्समध्ये पुतिन चिडचिड करताना आणि कंटाळताना दिसले.

निकोलाय पेट्रॉव्ह सांगतात, "पुतिन यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या योजना पूर्ण करायच्या आहेत," याचाच अर्थ की ते घटनेतल्या सुधारणेसाठी होणाऱ्या मतदानाच्या अंमलबजावणीच्या दिशेने जाऊ इच्छितात. याचसाठी सरकारी टीव्ही आणि मोठमोठ्या होर्डिंग्सद्वारे प्रचारही केला जातोय.

कोव्हिड 19 ची परिस्थिती कशी आहे?

व्लादिमीर पुतीन यांनी ज्या दिवशी लॉकडाऊनची औपचारिक घोषणा केली, त्याच दिवशी रशियमामध्ये कोरोना व्हायरसच्या सर्वांत जास्त रुग्णांची नोंद झाली.

तेव्हापासून रोज अधिकृत आकडेवारीत किरकोळ घसरण पहायला मिळालेली आहे. पण तरीही देशातल्या कोरोना बाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या रशिया जगातल्या कोरोनाने सर्वांत जास्त संक्रमित असणाऱ्या देशांच्या यादीत आहे.

मरणाऱ्यांची संख्या एक टक्क्यापेक्षा कमी असण्यावरही राजकारण्यांनी भर दिलेला आहे.

संसदेचे अध्यक्ष व्याशेस्लाव वोलोदिन यांनी बुधवारी म्हटलं होतं, "यावरून लक्षात येतं की अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशातल्या आरोग्यसेवा चांगली आहे."

बुधवारी त्यांनी हे विधान केलं तेव्हा कोरोना व्हायरसमुळे झालेल्या बळींची एकूण संख्या 2212 होती.

ते पुढे म्हणाले, "आयुष्य वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या आपल्या डॉक्टर्सचे आणि राष्ट्राध्यक्षांचे आपण आभार मानायला हवेत." त्यांच्या या विधानाला इतर खासदारांनी समर्थन दिलं.

रशियामध्ये कोव्हिडमुळे मरणाऱ्यांची संख्या कमी असण्याबाबत कायमच संशयही व्यक्त करण्यात आलेला आहे. रशिया मृत्यूंचे आकडे लपवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पण ही 'फेक न्यूज' असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला.

पण एप्रिल महिन्यात मॉस्कोमध्ये झालेल्या मृत्यूंच्या आकड्यावरून असं सूचित होतंय की इथे कोव्हिडमुळे मरणाऱ्यांची संख्या सरकारी आकडेवारीच्या तिप्पट असू शकते.

कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज बांधण्यासाठी एकूण मृत्यूंची आकडेवारी महत्त्वाची आहे. कारण यामध्ये त्या लोकांचाही समावेश आहे ज्यांची चाचणी करण्यात आली नव्हती किंवा ज्यांचा मृत्यू हॉस्पिटलच्या बाहेर झालाय.

एप्रिल महिन्यात मॉस्कोमध्ये सुमारे 1700 मृत्यू झाले. लंडन आणि इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

कोरोनाच्या प्रकरणांपैकी सुमारे 60 टक्के जणांचा मृत्यू हार्ट अॅटॅक किंवा इतर आजारामुळे झाल्याचं मॉस्कोच्या आरोग्य विभागाने म्हटलंय. ही गोष्ट पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्येही स्पष्ट झालेली आहे.

आपण कोणतीही गोष्ट लपवली नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

काय धडा घ्यावा?

कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी रशियाकडे पुरेसा वेळ होता.

आता इथे एका दिवसात 40 हजारांपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. संसर्गाची प्रकरणांचं लवकर निदान करणं आणि रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करणं रशियासाठी फायद्याचं ठरतंय. यामुळेच जास्तीचे मृत्यू टाळता आले. युरोपातल्या अनेक देशांमध्ये मृत्यूंचं प्रमाण इतकं होतं, की शवागारांमध्ये जागाही उरली नव्हती.

कदाचित हा दोन संस्कृतींमधल्या फरकाचाही परिणाम असू शकतो. उदाहरणार्थ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दीर्घकाळ सुरक्षित अंतर ठेवून बैठका घेत होते. आणि नंतर एका टप्प्यावर त्यांना ICU मध्ये दाखल करावं लागलं. तर व्लादिमीर पुतीन यांच्या प्रवक्त्यांना डबल न्युमोनियामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या तीन दिवस आधीपर्यंत त्यांना ताप येत होता.

काम करताना सगळी काळजी घेऊनही आपण कसे आजारी पडलो हे एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिमित्री पेसकॉव्ह यांनी सांगितलं. क्रेमलिनमध्ये एखादा कागदही कोणाला देण्यापूर्वी त्याचं निर्जंतुकीकरण केलं जातंय.

महिनाभरापासून आपण राष्टपती पुतिन यांच्या थेट संपर्कात नसल्याचं पेस्कॉव्ह यांनी सांगितलं.

जबाबदारीचं पालन

क्रेमलिनमध्ये परतणं सुरक्षित असल्याचं पुतिन कधी ठरवणार हे अजून स्पष्ट नाही. बहुतांश लोक अजूनही घरूनच काम करतायत आणि कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेले अनेक निर्बंध अजूनही कायम आहेत.

निर्बंध कधी हटवायचे हे महापौरांच्या हातात आहे आणि महापौर सर्गेई सोबयानिन हे लोकांना फेरी मारण्यासाठी घराबाहेप पडण्याची परवानगी द्यायलाही नकार देत आहेत.

आतापर्यंतचा आपण घेतलेला हा सगळ्यांत कठीण निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा अनेक लोकांच्या 'आरोग्य आणि आयुष्याचा' प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.

रशियातल्या बेरोजगारीचं प्रमाण सतत वाढतंय. ही जागतिक साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत बेरोजगारीचे आकडे दुप्पट झालेले आहेत. दर चार लोकांमागे एकाची नोकरी गेलेली आहे वा जाण्याचा धोका असल्याचं लेवाडा या संस्थेने म्हटलंय.

एक तृतीयांश लोकांच्या पगारात कपात करण्यात आलेली आहे किंवा मग त्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले आहेत.

रशियातले लोक पैशांची फारशी बचत करत नाहीत. आणि लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून मर्यादित मदत मिळतेय. म्हणूनच निर्बंधांवर सूट देण्यासाठीचा दबाव वाढतोय.

राजकीय विश्लेषक लिलीया शेवसोवा म्हणतात, "रशियाच्या नेत्यांना माहिती आहे की 'नो वर्क नो मनी' पॉलिसी कोलमडेल आणि गोंधळाचं वातावरण निर्माण होईल. म्हणूनच त्यांनी साथीच्या अशा काळातच निर्बंध लावले जेव्हा संक्रमण शिगेला पोहोचलेलं नव्हतं."

एखो मॉस्की रेडिओ स्टेशनसाठी लिहीलेल्या ब्लॉगमध्ये ते म्हणतात, "त्यांना कोरोना व्हायरसवर विजय मिळवायचा होता. आणि तो ही वेगाने." पण क्रेमलिनच्या राजकीय इच्छांच्या विरुद्ध हा संसर्ग झपाट्याने रशियाच्या अनेक भागांमध्ये झपाट्याने पसरतोय.

अशीच परिस्थिती कायम राहिली तर रशियाच्या या ताकदवान नेत्यालाही नुकसान रोखणं कठीण जाईल. निकोलाय पेट्रॉव्ह अंदाज व्यक्त करतात, "जरी त्यांना अपेक्षेप्रमाणे घटना दुरुस्तीसाठी मतं मिळाली तरीही पुतिन अजूनही अतिशय कमकुवत असतील आणि हे सत्य बदलणार नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)