You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना स्थलांतर: रस्त्याच्या कडेला झाली प्रसुती, तासाभराने पुन्हा तिची पायपीट
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डोक्यावर सामानाचं गाठोडं, कडेवर लहानगी लेक आणि मागे आणखी तीन लहान मुलं. यापैकी सगळ्यात मोठं मूल सात वर्षांचं. शकुंतला आणि राकेश यांचं कुटुंब नाशिकहून पायी चालत मध्य प्रदेशातल्या सतनामधल्या गावी जायला निघालं.
असे हजारो मजूर सध्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला निघालेले आहेत. पण त्यांच्यात आणि या कुटुंबातला फरक म्हणजे शकुंतला गर्भवती होत्या. गरोदरपणाचा नववा महिना सुरू होता आणि खूप मोठा पल्ला गाठायचा होता.
हे कुटुंब जिथे काम करायचं तिथलं सगळं अन्न संपलं, मुलांची उपासमार होऊ लागली. रोजंदारीवर काम करणाऱ्या राकेश यांना दिवसाचे 400 रुपये तर शकुंतलांना दिवसाचे 300 रुपये मिळायचे.
कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन महिनाभरापेक्षा जास्त चालला आणि इतक्यात तो उठण्याची चिन्हं दिसेनात.
'कोणताच पर्याय नसल्याने चालत निघालो'
नाशिकमधले काही मजूर गावी जायला निघाले होते. परत जाणारा हा दुसरा जथ्था होता. परिस्थितीसमोर हार पत्करत शकुंतला आणि त्यांचे पती राकेश यांनी या गटासोबत पायी चालत आपल्या 'उचेहरा' या गावी परतायचं ठरवलं.
शकुंतला सांगतात, "10-15 दिवसांनी बाळ होईल, असं मला वाटलं होतं. इतक्यात होईल असं वाटलं नव्हतं. खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू संपल्या होत्या. सगळं नशिबाच्या हवाली करत आम्ही शेवटी निघालो."
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
राकेश सांगतात, "आम्ही सकाळी निघालो. रस्त्यात लोकांनी आम्हाला बिस्किटं, खाण्याच्या वस्तू - पाणी दिलं. आम्ही चालत राहिलो. आमच्यासोबत स्त्री - पुरुष मिळून 18 जण होते. त्यांच्यासोबत मुलंही होती. संध्याकाळ होईपर्यंत आम्ही जवळपास 60 किलोमीटर चाललो. माझ्या पत्नीने कळा येत असल्याचं सांगितलं. प्रसुती होणार असं तिला वाटत होतं. पण तिथे ना कोणतं हॉस्पिटल होतं, ना नर्स, ना कोणी सुईण."
'मूल घरी कुठेही झालं तरी आमच्यासाठी सारखीच गोष्ट'
शकुंतला सांगतात, "आमच्या या गटातल्या महिलांनी मला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाखाली नेलं आणि काहीच वेळात माझ्या मुलीचा जन्म झाला. या बायकांनी बाळाची नाळ कात्रीने कापली आणि साडीने बाळाला स्वच्छ करून माझ्याकडे दिलं. आम्ही साधारण तासभर आराम केला आणि पुन्हा चालायला लागलो."
पण बाळाला काही होईल किंवा आपल्या जीवाला धोका असू शकतो, अशी भीती वाटली नाही का?
या प्रश्नाचं उत्तर देताना शकुंतला म्हणाल्या, "माझ्या चार मुलांची उपासमार होत होती. गरीब माणसानं मेहनत केली नाही तर पैसे कसे मिळणार? मूल घरी जन्माला येऊ दे किंवा नाही. आमच्यासाठी ही सारखीच बाब आहे."
पण आपल्याला भीती वाटल्याचं राकेश सांगतात. आईला काही झालं तर चार मुलांचं काय होईल, याची काळजी त्यांना लागून राहिली होती. पण बाळ - बाळंतीण सुखरूप असल्याने आता त्यांचा जीव भांड्यात पडलाय.
'बायको थकली की तिला प्रोत्साहन द्यायचो'
राकेश सांगतात, "बाळ झाल्यानंतर चालत असताना अनेकदा शकुंतलाने ती खूप थकल्याचं सांगितलं. तिला चालवत नव्हतं. पण मी तिला प्रोत्साहन देत राहिलो. हळुहळू चालण्यासाठी सांगत राहिलो. यानंतर जवळपास 150 किलोमीटर्स चालल्यानंतर एका चेकपॉइंटवर आमची चौकशी करण्यात आली. या गटातल्या एका महिलेने बाळाला जन्म दिल्याचं लोकांनी सांगितलं. मग आम्हाला रात्री एका कॉलेजमध्ये थांबवण्यात आलं."
बाळाच्या जन्मानंतर 150 किलोमीटर चालून शकुंतला महाराष्ट्र - मध्य प्रदेशाच्या सीमेवरच्या बिजावनला पोहोचल्या.
सतना जिल्ह्याचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर ए. के. राय यांनी सांगितलं, "मजुरांचा एक गट नाशिकमधून मध्य प्रदेशातल्या सतनाला यायला निघाल्याचं आम्हाला समजलं होतं. या गटात एक गर्भवती महिला असल्याचंही आम्हाला समजलं होतं. या गटाबद्दलची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. सुमारे 60 किलोमीटर्स चालल्यानंतर या महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या आणि गटातल्या इतर महिलांच्या मदतीने तिने एका मुलीला जन्म दिला."
जननी सुरक्षा सेवे'च्या गाडीने आपण स्वतः तिथे गेल्याचं राय सांगतात.
ते म्हणाले, "बाळाला हातात घेऊन शकुंतला मोठ्या धैर्याने तिथे उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही त्रास नव्हता. त्यांनी सगळ्या चाचण्या करून घेतल्या आणि कोव्हिड टेस्टही करून घेतली. बाळालाही जन्मानंतर देण्यात येणाऱ्या सगळ्या लशी देण्यात आलेल्या आहेत. शकुंतला यांचं हिमोग्लोबिन 9.8 आहे आणि त्यांना व्हिटॅमिन आणि इतर सप्लिमेंट्स देण्यात आलेल्या आहे. बाळ - बाळंतीण व्यवस्थित असल्याने त्यांना सोडण्यात आलंय."
जिल्ह्याच्या कलेक्टरनी या कुटुंबाला 10 हजार रुपये आणि अन्नधान्य दिलंय.
'गावातच रोजगार शोधू'
राकेश आता आपल्या कुटुंबासह गावी पोहोचले आहेत. बाळाचं नाव काय ठेवलं विचारल्यानंतर ते अजून याबाबत विचार केला नसल्याचं सांगतात.
मग आता हे 6 जणांचं कुटुंब ते पोसणार कसं? आता गावातच रोजगार शोधणार असल्याचं राकेश सांतात. पण काम मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच लॉकडाऊन संपल्यानंतर ते काम शोधायला गावाबाहेर पडतील.
स्थलांतरित मजूरांना आपल्या घरी जाता यावं यासाठी सरकारने विशेष ट्रेन्स सुरू केल्या आहेत. पण असं असूनही अनेक भागांतून मजूर अजूनही पायी घरी जायला निघाल्याच्या बातम्या येत आहेत. कदाचित त्यांच्यातही मदतीची गरज असणारी एखादी शकुंतला असेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)