You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरससंबंधी संशोधन करणाऱ्या चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या एका चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. या मृत्यूवरून जगभरात 'कॉन्स्पिरसी थेअरीज' म्हणजेच षड् यंत्राच्या कहाण्यांचं पेव फुटलं आहे.
37 वर्षांचे प्रा. बिंग ली शनिवारी (2 मे) अमेरिकेतल्या पीट्सबर्ग शहरातल्या आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. ते युनिव्हर्सिटी ऑफ पीट्सबर्गमधल्या स्कूल ऑफ मेडिसीन विभागात सहप्राध्यापक होते.
प्रा. बिंग ली कोव्हिड-19 आजारासंबंधी एक महत्त्वाचं संशोधन पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, असं त्यांच्या सहकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा खून झाल्याची बातमी आली. या प्रकरणात दोघांचा जीव गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एकाची हत्या झाली तर दुसऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रा. बिंग ली यांच्या डोक्यात, धडात, हात आणि पायात आणि मानेत गोळ्या लागल्या. सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या हाऊ ग्यू (46) नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
कारमधून परतत असताना हाऊ ग्यू याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
प्रा. बिंग ली आणि हाऊ ग्यू एकमेकांना ओळखायचे. प्रेयसीवरून या दोघांमध्ये मोठं भांडणही झालं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र, ली यांच्या हत्येचा त्यांच्या संशोधनाशी संबंध असल्याचे ठोस पुरावे नसल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
ली एक उत्तम संशोधक होते आणि कोरोनासंबंधी एक महत्त्वाचं संशोधन पूर्ण करण्याच्या ते अगदी जवळ पोहोचले होते, असं त्यांचे सहकारी सांगतात. ली यांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करणं, हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असले, असं त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.
ली मूळचे चीनचे होते. त्यांनी सिंगापूरहून पदवी आणि पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर ते संशोधनासाठी अमेरिकेला रवाना झाले.
कॉन्स्पिरसी थेअरीज
चीनमधल्या विबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या हत्येची बरीच चर्चा सुरू आहे. एका यूजरने लिहिलं आहे, "बापरे, ही तर 'मिशन इम्पॉसिबल'ची पटकथा वाटते. कदाचित ते हा विषाणू अमेरिकेतल्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याच्या निष्कर्षापर्यंत आले असावेत."
अमेरिकेतल्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करून अमेरिकी लष्कराच्या मदतीने तो वुहानला आणण्यात आल्याचा आधारहीन दावा काही दिवसांपूर्वी चिनी अधिकारी आणि चिनी सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला होता.
काही विबो यूजर्स म्हणतात, "हा योगायोग वाटत नाही. हे सरळसाधं प्रकरण आहे आणि यात अनेक रहस्य दडलेली असू शकतात." अनेक विबो यूजर्सचं म्हणणं आहे की, प्रा. बिंग ली चिनी असल्यामुळे अमेरिकेत ते सुरक्षित नव्हते.
मात्र, ते चिनी असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा कुठलाच पुरावा तपासात सापडलेला नाही.
या हत्येसंबंधी चिनच्या सरकारी प्रसार माध्यमाशी संबंधित ग्लोबल टाईम्स या वेबसाईटने एक लेख प्रसिद्ध केला आहे. यात ली यांची हत्या का झाली असावी, याचे अनेक अंदाज बांधण्यात आले आहेत. या हत्येत चीनचाही हात असू शकतो, असाही आरोप होतोय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)