इलॉन मस्क : टेस्ला शेअर्सची किंमत 'जरा जास्तच', एका ट्वीटमुळे गमावले 14 अब्ज डॉलर्स

स्पेसएक्स, टेस्ला आणि द बोरिंग कंपनी अशा अनेक मोठ्या आणि अनोख्या उद्योगांचे संस्थापक इलॉन मस्क यांनी केलेलं एक ट्वीट त्यांना फारच महागात पडलंय.

त्यांच्या या ट्वीटमुळे टेस्ला या कार उत्पादक कंपनीचं बाजार मूल्य तब्बल 14 अब्ज डॉलर्सनी कमी झालंय.

आपल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत "जरा जास्तच (Too High)" असल्याचं मस्क यांनी ट्वीट केलं, आणि त्याचा परिणाम म्हणून काही गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला.

या सगळ्यात टेस्लाच्या शेअर्सचं मूल्य तर घसरलच, शिवाय मस्क यांच्या स्वतःच्या हिश्श्याचं मूल्यही तीन अब्जांनी कमी झालं.

इलॉन मस्क यांनी केलेल्या अनेक ट्वीट्सपैकी एक होतं - "Tesla stock price too high imo," म्हणजेच 'माझ्यामते टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती फारच जास्त आहेत."

याशिवाय आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी आपण आपली सर्व मालमत्ता विकायचं ठरवलंय, त्यामुळे गर्लफ्रेंड त्यांच्यावर चिडली आहे, असंही सांगितलं.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकाराने याच बाबत शुक्रवारी मस्क यांच्याशी संपर्क साधला. शेअर्सच्या किंमतीबाबत ते मस्करी करत होते का, आणि हा मजकूर त्यांनी पोस्ट करण्यापूर्वी तपासण्यात आला होता का, असं विचारल्यानंतर मस्क यांचं 'नो' असं उत्तर या पत्रकाराला मिळालं.

इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती करणाऱ्या टेस्लाच्या शेअर्सच्या किमती यावर्षी अतिशय वाढल्या आहेत. आता या कंपनीचं मूल्य सुमारे 100 अब्ज डॉलर्स आहे.

सेक्युरिटी अॅनालिस्ट डॅनियल ईव्हज रॉयटर्सशी बोलताना म्हणाले, "इलॉन मस्क यांची ही विधान काहीशी बेजबाबदार आहेत आणि अशी विधान त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरताहेत. वॉल स्ट्रीय याला वैतागलाय."

असं पहिलं ट्वीट नव्हे

2018मध्ये मस्क यांनी टेस्लाच्या न्यूयॉर्क स्टॉक एक्स्टेंजमधल्या भविष्याबद्दल असंच एक ट्वीट केलं होतं. आपल्याकडे मोठं आर्थिक पाठबळ असून टेस्लाची शेजर बाजारातली नोंदणी रद्द करत कंपनीला 'प्रायव्हेट' करण्याचा मी विचार करतोय, असं मस्क यांनी तेव्हा ट्वीट केलं होतं. यामुळे कंपनीचे शेअर्सच्या अचानक गडगडले होते.

अशा विधानांमुळे शेअर बाजारावर परिणाम होतो, असं म्हणत अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने इलॉन मस्क यांना 2 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला होता.

एवढंच नव्हे तर यानंतर कुठेही काहीही पोस्ट करण्यापूर्वी ते वकिलांकडून तपासून घेणार, अशी कबुलीसुद्धा मस्क यांना द्यावी लागली होती. आणि असं पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याची तंबी टेस्लाला देण्यात आली होती.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सध्या अमेरिकेत अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याच आठवड्याच्या सुरुवातीला मस्क यांनी याविषयी कडवट टीका करणारी ट्वीट्स केली होती.

2019मध्ये थायलंडच्या एका गुहेत अडकलेल्या लहान मुलांना सोडवण्यासाठी झटत असलेल्या एका ब्रिटिश डायव्हरबद्दल केलेल्या वादग्रस्त ट्वीटमुळे मस्क यांना कोर्टासमोरही हजर व्हावं लागलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)