You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना टिप्स: लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?
- Author, व्हिबेके वेनेमा
- Role, बीबीसी स्टोरीज
लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.
लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे. घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.
मात्र, अशा पद्धतीने तेलकट-तुपकट, चमचमीत आणि गोड पदार्थ खाल्ल्यानं आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेकांनी तर वजन वाढायला लागल्याच्या तक्रारीही सुरू केल्या आहेत.
बरं फक्त भारतातच नाही तर लॉकडाऊन असलेल्या जगातल्या सगळ्याच भागात थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे.
इंग्लंडमध्ये राहणारी 19 वर्षांची क्लोए टेलर-विथॅम सांगते, "पूर्वी ऑफिसमधून घरी येताना मी ताजी फळं, भाज्या घरी आणायचे. आता मात्र, मॅक्डोनल्ड चीजसारख्या वस्तू फ्रीजमध्ये भरून ठेवल्या आहेत. तेच खाणं होतं."
इंग्लंडमधलेच 43 वर्षांचे अँडी लॉईड सांगतात, "मला डायबेटीस आहे. पण सध्या माझं चॉकलेट आणि बिस्कीट खाणं वाढलं आहे."
लॉईड यांना ओसीडी आहे आणि त्यासाठीची औषधंही सुरू आहेत. या औषधांमुळे त्यांचं वजनही वाढतंय. मात्र, ते म्हणतात, "मी कसा दिसतोय याचा मी फारसा विचार करत नाही. या कठीण काळात कसं जगायचं, हे अधिक महत्त्वाचं आहे. हे सगळं कधी संपणार आणि कामावर कधी परत जाता येईल, याचे विचार माझ्या मनात सुरू असतात."
मुंबईत राहणारे आनंदी कुलकर्णी सांगतात, "मला चार वर्षांची मुलगी आहे. शाळा बंद असल्याने आणि बाहेर खेळायला जाता येत नसल्यानं दिवसभर घरात बसून आता ती काहीशी कंटाळली आहे. खेळून, टीव्ही बघून कंटाळली की ती काहीतरी खायला मागते. फुटाणे, शेंगदाणे, राजगिऱ्याचे लाडू असं थोडफार पौष्टिक खाणं होत असलं तरी जंकफूडही थोड्या प्रमाणात देणं होतंच. तिला देताना दोन बिस्किटं, एक चॉकलेट आपलंही खाणं होतं. शिवाय, तेलकट आणि गोड खाणंही पूर्वीच्या तुलनेत वाढलं आहे."
अशी सगळी परिस्थिती बघता आपलं खाणं वाढलं आहे का, हा प्रश्न पडतो. याच प्रश्नाभोवती युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियामधले संशोधक अभ्यास करत आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनशैलीत कोणते बदल झाले आहेत, हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.
प्रा. अॅनेमॅरी मिनिहॅने म्हणतात, "मी याची तुलना सुट्ट्यांशी करते. सुट्ट्यांमध्ये आपण अरबट-चरबट खातो, उशिरा उठतो. व्यायाम टाळतो. पण सुट्ट्याच तर आहेत, असं कारण त्यावेळी आपण देतो. यावेळीसुद्धा आपल्याला कोव्हिड-19 चं कारण मिळालं आहे. आपल्या वाईट सवयींसाठी आपण कोरोनाची सबब पुढे करतोय."
प्रा. मिनिहॅन आणि त्यांची टीम करत असलेलं संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही. मात्र, प्रा. मिनिहॅन यांना वाटतं की, लॉकडाऊनमध्ये लोकांच्या सवयी बिघडत आहेत. विशेषतः खाण्यापिण्याच्या. अपौष्टिक किंवा अनारोग्य वाढवणारे पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतंय.
अशा वर्तणुकीमागे काही मानसिक कारणं असल्याचंही त्या सांगतात. ताण वाढला की शरीरात कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक (हॉर्मोन) अधिक प्रमाणात तयार होतं. या संप्रेरकामुळे आपल्याला जास्त भूक लागते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खातो. विशेषतः फॅट आणि शुगर जास्त असलेले पदार्थ.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
लॉकडाऊनमध्ये आहारावर नियंत्रण कसं ठेवाल?
- भरपूर पाणी प्या किंवा हर्बल टी प्या
- खेळ खेळून किंवा मित्रांना कॉल करून मन रमवा
- पटकन होतील असे व्यायाम करा
- चौरस आणि ताजं अन्न शिजवा आणि त्याचा आस्वाद घेऊन खा
- वाणसामान खरेदी करताना नियोजनपूर्वक करा. आरोग्याला अपायकारक असणारे पदार्थ खाऊ नका.
- तुम्हाला काय आवडतं, त्यानुसारच विविध पदार्थ बनवा
आहारावर नियंत्रण कसं ठेवायचं?
ब्रिटीश डायटेटिक असोसिएशनच्या आहारतज्ज्ञ क्लेअर टॉर्टोन-वुड सांगतात की, "रुटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसातून तीन वेळा खा. यात तुम्हाला स्नॅक्स म्हणजे खाऊ खायची इच्छा असेल तर जरूर खा. पण मग आहार हलका ठेवा."
दिवसभरात किती सटरफटर खायचा, त्याचं प्रमाण ठरवा. तेवढंच एका डब्यात भरून ठेवा आणि दिवसातून ते कधीही खा. पण एकदा का त्या डब्यातला खाऊ संपला की मग दिवसभरात दुसरं काहीही आरोग्याला अहितकारक असेल असं खायचं नाही.
वेगवेगळे पदार्थ बनवून बघण्यात काहीच हरकत नाही. फक्त त्याचा अतिरेक होऊन तुमच्या आरोग्यवर, वजनावर परिणाम होता कामा नये.
शिवाय या लॉकडाऊनच्या काळात चमचमीत खाण्याची सवय झाली तर पुढे ती सवय मोडणं अवघड होईल आणि याचा परिणाम सहाजिकच तुमच्या आरोग्यावर होईल. त्यामुळे वेळीच स्वतःवर ताबा ठेवा.
घरी असल्यामुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे. सगळेच नित्यनेमाने व्यायाम करतात, असंही नाही. त्यामुळे अतिगोड पदार्थ खाऊ नका.
हेही लक्षात असू द्या की कोव्हिड-19 वर मात करायची असेल तर रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं गरजेचं आहे आणि चौरस आहारातूनच रोगप्रतिकार शक्ती वाढवता येते.
लॉकडाऊनमध्ये पौष्टिक आहारासाठीच्या टिप्स
- ग्लासभर पाणी प्या. कारण कदाचित तुम्हाला भूक नाही तर तहान लागलेली असेल आणि कधी-कधी या दोघांमध्ये गोंधळ होतो.
- व्यायाम केल्याने आणि गप्पा मारल्याने कॉर्टिसॉल हॉर्मोनचं प्रमाण कमी होतं. याव्यतिरिक्त वाचन, मेडिटेशन अशा तुमच्या आवडत्या गोष्टीनेही तुमचं मन शांत होतं.
- प्रोटीन आणि फायबर यांचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थाने पोट भरल्याची भावना जास्त वेळ असते. उदा. अंडी, डाळी, शेंगदाणे, फुटाणे इत्यादी.
- हवाबंद भाजीपाला उत्तम असतो. ताज्या भाजीपाल्याहूनही जास्त. त्यामुळे तुम्ही डबाबंद भाजीपाला आणि फळही वापरू शकता.
इटिंग डिसॉर्डर
इटिंग डिसॉर्डर असणाऱ्या व्यक्तींवर लॉकडाऊनचा जास्त परिणाम झाला आहे. इटिंग डिसॉर्डर खाण्या-पिण्याच्या सवयीशी संबंधित आहे. काही जण खूप कमी खातात तर काही खूप जास्त. याला वेगवेगळी कारणं असतात. पण लॉकडाऊनच्या काळात सर्वजण आपापल्या घरात बंद आहेत. अशावेळी इटिंग डिसॉर्डर असणारे लोक आपल्या सवयीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे त्यांचा ताण अधिक वाढतो.
याविषयी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ बर्नी राईट म्हणतात, "स्वतःवर अत्याचार करू नका. प्रेमाने आणि शांतपणे वागा."
लॉकडाऊनने खाण्या-पिण्याच्या सवयी बिघडल्या आहेत का?
लॉकडाऊनमुळे खाण्या-पिण्याच्या सवयी अगदीच हाताबाहेर गेल्या आहेत का? तर नाही. बहुतेक जणांच्या आहारात बदल झाला असला तरी या लॉकडाऊनने संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणलं आहे. आज घरातले सगळे एकत्र जेवायला बसतात. मनस्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी ही फार मोठी संधी आहे.
राहता राहिला प्रश्न आहाराचा, तर आहार पौष्टिक आणि संतुलित असायला हवा. त्यासाठी प्रयत्न करावे.
पण सकस आहार घेण्याचा प्रयत्न करूनही त्यात पुरेसं यश येत नाही, असं वाटत असेल वाईट वाटून घेऊ नका.
आहारतज्ज्ञ टॉर्टोन-वुड म्हणतात, "नकारात्मक भावना दूर ठेवा. कारण आपण खरंच एका अत्यंत वाईट काळातून जातोय. त्यामुळे आपल्या आहारात थोडे बदल होतील, हे स्वीकारा आणि त्याबद्दल खूप वाईट वाटून घेऊ नका."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)