You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना विषाणू : ट्रंप यांच्या जंतूनाशक आणि सूर्यकिरणांद्वारे कोरोना विषाणू नष्ट करण्याच्या दाव्यात तथ्य आहे का?
- Author, रिअॅलिटी चेक
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या शरीरात जंतुनाशक (डिसइन्फेक्टंट) टोचून किंवा अतिनील किरणांच्या (अल्ट्रा-व्हायलेट रेज) मदतीने विषाणू नष्ट करता येतील का, यावर संशोधन करायला हवं, असा सल्ला ट्रंप यांनी दिला आहे.
बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने या दोन्ही पर्यायांची पडताळणी केली.
पहिला दावा
व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रंप म्हणाले, "मला जंतूनाशकं दिसतात. ते एका मिनिटात जंतू नष्ट करतात. अशाप्रकारचं काही करण्याचा काही मार्ग आहे का? म्हणजे शरीरात टोचून किंवा शरीराची संपूर्ण स्वच्छताच करता येईल का? कारण हा विषाणू फुफ्फुसात जातो आणि फुफ्फुसाचं मोठं नुकसान करतो."
या वक्तव्यातून राष्ट्राध्यक्ष ट्रंप हे सुचवू इच्छितात की फरशी किंवा इतर स्वच्छता करण्यासाठी वापरले जाणारे जंतुनाशक शरीरात टोचून घेऊन फुफ्फुसात गेलेले कोरोना विषाणू नष्ट करण्यात मदत होऊ शकते.
जंतूनाशकांमुळे एखाद्या पृष्ठभागावरचे किंवा वस्तूवरचे विषाणू नष्ट होतात. मात्र, इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की जंतूनाशक द्रव प्यायल्याने किंवा टोचून घेतल्याने विषबाधा आणि मृत्यू तर ओढावू शकतोच. पण या जंतूनाशकाचा शरीरात गेलेल्या विषाणुंवर काहीही परिणाम होत नाही.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या वक्तव्यामुळे जंतूनाशक प्यायलाने शरीरातले विषाणू मरतील, असा समज होऊन लोक खरोखरीच जंतूनाशकाचं सेवन करतील, अशी काळजी डॉक्टरांना वाटतेय आणि म्हणूनच अमेरिकेतल्या डॉक्टरांनी असं न करण्याचं आवाहन केलं आहे.
हर्टफोर्डशायर विद्यापीठात टॉक्सिकॉलॉजीचे प्राध्यापक असलेले रॉब किलकॉट म्हणतात, "शरीरातले विषाणू नष्ट करण्यासाठी जंतूनाशक किंवा ब्लिचचं इंजेक्शन शरीरात टोचल्यास त्याचे गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होऊ शकतो. अत्यंत वेदनादायी मृत्यूही ओढावू शकतो. "
ते पुढे म्हणतात, "शिवाय, या जंतूनाशकांचा शरीरातल्या विषाणुंवरही फारसा परिणाम होत नाही."
लायझॉल आणि डेटॉलसारख्या जंतुनाशकांचं उत्पादन करणारे रेकिट बेंकिसर यांनी तर ट्रंप यांच्या वक्तव्यानंतर एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकात ते म्हणतात, "आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मार्गाने (टोचून घेऊन, सेवन करून किंवा इतर कुठल्याही मार्गाने) आमची जंतूनाशक उत्पादनं मानवी शरीरात सोडू नका."
वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी "मी पत्रकारांना उपहासाने प्रश्न विचारत होतो", अशी सारवासारव केली आहे.
दुसरा दावा
पत्रकार परिषदेत ट्रंप असंदेखील म्हणाले की "समजा तुम्ही शरीराच्या आत किरणं सोडली. मग ती त्वचेच्या मार्गाने किंवा इतर कुठल्याही मार्गाने. मला वाटतं तुम्ही म्हणाला की तुम्ही लवकरच याचीही चाचणी करणार आहात. तर आपण बघू. पण लाईट ज्या पद्धतीने मिनिटभरात जंतूचा नाश करतो, हे खूप शक्तीशाली माध्यम आहे."
मानवी शरीरावर अतिनील किरणांचा वापर करण्यासंबंधीही ट्रंप बोलले होते.
ज्या पृष्ठभागांवर सूर्यप्रकाश थेट पडतो तिथले जंतू नष्ट होतात, हे खरं असलं तरी किती काळ त्यांच्यावर सूर्याची अतिनील किरणं पडायला हवी, याबद्दल आपल्याकडे खात्रीशीर माहिती नाही.
शिवाय, जंतूनाशकांप्रमाणेच अतिनील किरणंसुद्धा केवळ विषाणू असलेल्या वस्तू किंवा पृष्ठभागांवरचेच जंतू नष्ट करतात. मानवी शरीरातले नाही.
एकदा का विषाणुने तुमच्या शरीरात प्रवेश केला की तुम्ही कितीही अतिनील किरणं शरीरावर घेतली तरीही त्याचा उपयोग होत नाही.
लंडनमधल्या किंग्ज कॉलेजमध्ये औषध निर्मिती शास्त्राचे व्हिजिटिंग प्रोफेसर असलेले पेन्नी वार्ड सांगतात, "अतिनील किरणं आणि उष्णता यामुळे पृष्ठभागावरचे विषाणू नष्ट होतात. मात्र, उन्हात बसल्याने किंवा उष्णतेने एखाद्या रुग्णाच्या शरीरात वाढत असलेले विषाणू मरत नाहीत."
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व'